इराणचे लष्करप्रमुख मोहम्मद बघेरी कोण होते? इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झालाय मृत्यू
13 जूनच्या पहाटे इस्रायलने इराणवर ‘प्रीएम्प्टिव स्ट्राईक’ केला, ज्यामध्ये इराणच्या सशस्त्र दलांचे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद बघेरी यांचा मृत्यू झाला. इस्रायलचे संरक्षणमंत्री इसराइल कात्ज यांनी या कारवाईची अधिकृत माहिती दिली असून इराणचा मीडियानेही बघेरी यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. हल्ल्यात इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्सचे प्रमुख कमांडर हुसैन सलामी यांचा देखील मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. हा हल्ला केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूपुरता मर्यादित नसून, तो इराणच्या लष्करी नेतृत्वाच्या केंद्रावरच केलेला आघात असल्याचं मानलं जात आहे.
मोहम्मद बघेरी हे इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सचे (IRGC) ज्येष्ठ आणि प्रभावशाली अधिकारी होते. 2016 पासून ते इराणच्या सशस्त्र दलांचे चीफ ऑफ स्टाफ या सर्वोच्च लष्करी पदावर कार्यरत होते. त्यांचा अनुभव केवळ रणांगणापुरता मर्यादित नव्हता, तर ते एक अत्यंत अनुभवी सैन्य धोरणकार, गुप्तचर ऑपरेशन्सचे जाणकार, आणि आंतरराष्ट्रीय युद्धनितीचे अभ्यासक मानले जात होते.
त्यांचा जन्म इराणच्या राजधानी तेहरानमध्ये झाला. मूळ नाव मोहम्मद-हुसैन अफशोर्दी असून, जन्मवर्ष 1958 किंवा 1960 असल्याचे वेगवेगळ्या सूत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यांनी इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली होती आणि पुढे तर्बियत-ए मोदरेस विद्यापीठातून ‘Political Geography’ मध्ये डॉक्टरेट मिळवली होती.
बघेरी यांनी 1980 मध्ये IRGC मध्ये प्रवेश केला आणि तत्काळ इराण-इराक युद्धात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या लष्करी कारकीर्दीची सुरुवातच अत्यंत प्रतिकूल आणि निर्णायक युद्धातून झाली होती. त्यांनी युद्धातील बहुतेक मोठ्या मोहिमांमध्ये सहभाग घेतल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे, त्यांच्या थोरल्या भावाचा – हसन बघेरी (गुलाम हुसैन अफशोर्दी) – युद्धात मृत्यू झाला होता. हसन बघेरी IRGC मधील एक अत्यंत आदरणीय कमांडर होते.
2016 मध्ये मोहम्मद बघेरी यांची इराणच्या जनरल स्टाफ ऑफ आर्म्ड फोर्सेस (AFGS) च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. या पदावर ते हसन फिरोजीबादी यांच्यानंतर आले, जे तब्बल 27 वर्षे या पदावर होते. या पदावर असताना बघेरी यांनी देशाच्या लष्करी धोरणात्मक आघाड्यांवर नेतृत्व केले, ज्यामध्ये गुप्तचर संचालन, युद्धनीती आखणी, सीरिया युद्धातील सहभाग आणि ड्रोन्ससारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश होता.
अमेरिकन एंटरप्राइज इन्स्टिट्यूटसारख्या थिंक टँक संस्थांनी मोहम्मद बघेरी, मोहम्मद अली जाफरी, अली फदवी आणि गुलाम अली रशीद यांना IRGC च्या लष्करी नेटवर्कचे मुख्य केंद्र मानले होते. हे नेटवर्क केवळ आंतरराष्ट्रीय सैन्य मोहिमांवर लक्ष केंद्रित करत नव्हते, तर देशांतर्गत सुरक्षा आणि गुप्तचर कामकाजावरही वर्चस्व राखत होते. बघेरी यांचा संबंध 1979 च्या इस्लामी क्रांतीपासून आहे. त्यावेळी त्यांनी अमेरिकन दूतावासावर करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या हल्ल्यात भाग घेतल्याचा उल्लेख मीडिया अहवालांमध्ये आहे. यामुळेच ते कट्टर इस्लामी क्रांतीचे समर्थक आणि त्याच्या मूलतत्त्वांचा प्रचारक मानले गेले.
‘आता अणुकरार करा, नाहीतर विनाश अटळ… ’इस्रायल-इराण युद्धात पुन्हा डोनाल्ड ट्रम्पची मध्यस्ती
मेजर जनरल मोहम्मद बघेरी यांचा मृत्यू इराणसाठी केवळ एका वरिष्ठ लष्कराधिकाऱ्याचा अंत नाही, तर एक संपूर्ण सैन्य धोरणशास्त्राचा कोसळलेला आधारस्तंभ आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील IRGC हे केवळ इराणपुरते मर्यादित नव्हते, तर संपूर्ण पश्चिम आशिया क्षेत्रातील सामरिक समीकरणांवर प्रभाव टाकणारे होते. इस्रायलचा हा हल्ला त्या ताकदीला थोपवण्याचा स्पष्ट प्रयत्न आहे, आणि त्यामुळे इराण-इस्रायल संघर्ष आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे.