पाकमध्ये गृहयुद्ध सुरु! 'आठवड्याभरात इस्लामाबाद ताब्यात घेऊ... ' मौलाना फजल-उर-रहमान यांचा पाकिस्तान सरकारला इशारा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Fazl‑ur‑Rehman warns govt : पाकिस्तानात सध्या राजकीय वातावरण अधिकच तापले असून जमियत-उलेमा-ए-इस्लाम पाकिस्तान (JUI-F) चे प्रमुख मौलाना फजल-उर-रहमान यांनी शाहबाज शरीफ सरकारविरोधात थेट लढाईचे रणशिंग फुंकले आहे. त्यांनी एका जाहीर रॅलीत इशारा दिला की, “आमचे कार्यकर्ते आठवड्याभरात इस्लामाबाद ताब्यात घेतील,” आणि सत्ताधाऱ्यांना राजीनामा द्यावा लागेल, असा धमकीवजा इशारा दिला आहे.
बट्टाग्राममध्ये आयोजित रॅलीत मौलानांनी भाषण करताना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते, या निवडणुका पूर्णपणे बनावट आणि लबाडीच्या होत्या. “हे सरकार बेकायदेशीर आहे. त्यांच्याकडे कोणताही नैतिक आधार उरलेला नाही. जनतेच्या मर्जीशिवाय सत्तेत आलेले लोक मला डोळे दाखवू शकत नाहीत,” असे फजल-उर म्हणाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सर्बियामध्ये वाहू लागले क्रांतीचे वारे; विद्यार्थ्यांच्या बंडाने ‘राष्ट्राध्यक्ष वुचिक’ यांची सत्ता डळमळीत
मौलाना फजल-उर-रहमान यांनी आपल्या भाषणात सरकारला जाहीर आव्हान दिले. त्यांनी ठामपणे सांगितले की, “तुम्हाला आमच्या लोकांची ताकद माहिती नाही. आम्ही २०१८ पूर्वीही असेच एक बनावट सरकार पाडले होते, हे विसरू नका.” त्यांच्या मते, जर सरकारने जनतेचा आवाज ऐकला नाही, तर रस्त्यावर उतरून इस्लामाबादवर कब्जा करणे हे त्यांच्या पक्षासाठी अशक्य नाही.
फजल-उर रहमान यांनी आपल्या भाषणात सरकारकडून त्यांच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार होत असल्याचा आरोप केला. “सरकार आमच्या कार्यकर्त्यांना धमकावत आहे, अटक करत आहे. आम्ही राष्ट्रीय एकतेसाठी आवाज उठवत आहोत. पण जर आम्हाला कोपऱ्यात ढकलले, तर आम्ही पाकिस्तानमध्ये जिहाद करू,” असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.
आपल्या भाषणात मौलानांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावरही सडकून टीका केली. त्यांनी प्रश्न केला की, “ज्या अमेरिकेने मुस्लिम देशांमध्ये लाखो मुसलमानांची हत्या केली, त्या अमेरिकेशी तुम्ही हातमिळवणी करताय? पॅलेस्टाईन, लिबिया, सीरिया – सर्वत्र अमेरिका मुसलमानांवर अत्याचार करत आहे. आणि आता पाकिस्तानचे नेते त्यांच्याशीच मैत्री करत आहेत?”
फजल-उर रहमान यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही धारेवर धरले. त्यांनी म्हटले, “जर ट्रम्प असतील, तर शांतता नसेल; आणि जर शांतता असेल, तर ट्रम्प नसेल.” यावरून त्यांनी ट्रम्प यांना “अशांततेचे दूत” असे संबोधले.
या सगळ्या वक्तव्यांमुळे पाकिस्तानमधील राजकीय वातावरण अधिकच स्फोटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे सरकार अस्थिरतेच्या सावटाखाली आहे, तर दुसरीकडे मौलाना फजल-उर-रहमान यांच्यासारखे शक्तिशाली विरोधी नेते थेट इस्लामाबाद काबीज करण्याची भाषा करत आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, जर JUI-F ने मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले, तर देशात आणखी अस्थिरता निर्माण होऊ शकते. यामुळे शाहबाज शरीफ सरकारसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हिमाचलमध्ये 72 तासांची गुप्त बैठक; चीनची अस्वस्थता वाढली, भारताचे धोरण ठाम
फजल-उर-रहमान यांची घोषणा आणि त्यांचे इशारे पाकिस्तानातील राजकीय तापमान आणखी वाढवणार आहेत. सत्ताधाऱ्यांनी याची दखल घेऊन संवादाचा मार्ग निवडला नाही, तर पाकिस्तान एका नव्या राजकीय संघर्षाच्या उंबरठ्यावर उभा राहू शकतो.