१२ दिवस बंकरमध्ये लपून खामेनेईंनी कसा केला स्वतःचा बचाव? 'या' हालचालींमुळे सापडले नाहीत मोसादच्या तावडीत ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Khamenei bunker hiding : इराण-इस्रायल संघर्षाच्या काळात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना लक्ष्य करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न इस्रायलने केल्याचा मोठा खुलासा समोर आला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी स्वतः या गोष्टीची कबुली दिली असून, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की इस्रायली सैन्य आणि गुप्तचर संस्था मोसादने खामेनेईंना संपवण्याची योजना आखली होती. मात्र, युद्धाच्या १२ दिवसांच्या काळात खामेनी यांनी अत्यंत हुशारीने हालचाली करत स्वतःचा बचाव केला आणि मोसादसारख्या बलाढ्य गुप्तचर संस्थेच्या नजरेतूनही बचाव केला.
१३ जून रोजी इस्रायलने इराणवर अचानक हवाई आणि सायबर हल्ले सुरू केले. या हल्ल्यांमध्ये इराणच्या आयआरजीसी (IRGC) प्रमुखांसह अनेक वरिष्ठ सैन्याधिकारी आणि शास्त्रज्ञ मारले गेले. त्याच वेळी, इस्रायली गुप्तचर यंत्रणा आणि सैन्याच्या टार्गेट लिस्टमधील एक प्रमुख नाव होतं – अयातुल्ला अली खामेनी. इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनीही सार्वजनिकपणे म्हटले होते की खामेनी इस्रायलच्या “रडारच्या बाहेर नाहीत”, म्हणजेच त्यांनाही लक्ष्य केले जाऊ शकते.
मात्र, युद्ध सुरू झाल्यानंतर खामेनी यांनी तातडीने आपले ठिकाण बदलले आणि तेहरानच्या ईशान्य उपनगरातील एका गुप्त बंकरमध्ये आश्रय घेतला. या ठिकाणाची माहिती फक्त त्यांचे सुरक्षा रक्षक, अत्यंत जवळचे सल्लागार आणि काही कुटुंबीयांपुरती मर्यादित होती. विशेष बाब म्हणजे, या काळात खामेनींनी सर्व इलेक्ट्रॉनिक संपर्क पूर्णतः बंद केला, त्यामुळे कोणतीही ट्रॅकिंग शक्य झाली नाही.
चॅनल १३ या इस्रायली माध्यम संस्थेशी बोलताना, संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी म्हटले की, “हो, आम्ही खामेनींना ठार करण्याची योजना आखली होती. जर ते आमच्या नजरेत आले असते, तर ते आज जिवंत राहिले नसते. पण आम्ही त्यांना शोधण्यात अपयशी ठरलो.” ही पहिलीच वेळ आहे की इस्रायली सरकारने इराणच्या सर्वोच्च नेत्याला ठार करण्याच्या प्रयत्नाची खुली कबुली दिली आहे. याआधी, इस्रायली हल्ल्यांबाबत चर्चा होत असली तरी खामेनी यांना थेट लक्ष्य केल्याचे कधीच मान्य केले गेले नव्हते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मध्यपूर्व पुन्हा धगधगणार? इस्रायली संरक्षक मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले, ‘खामेनेईंच्या हत्येचा कट…’
या प्रकरणाशी संबंधित एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेची भूमिका. काही अहवालांनुसार, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला खामेनींना ठार करण्यापासून परावृत्त केले होते. मात्र, इस्रायल काट्झ यांनी स्पष्टपणे सांगितले की, “खामेनींना मारण्यासाठी आम्हाला कोणत्याही परवानगीची गरज नाही. आम्ही स्वतःच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी स्वतंत्र निर्णय घेऊ शकतो.”
बंकरमधून बाहेर आल्यावर, अयातुल्ला खामेनी यांनी राष्ट्रीय टेलिव्हिजनवरून जनतेशी संवाद साधला. त्यांनी ठामपणे सांगितले की, “इराण कधीही अमेरिका किंवा इस्रायलसमोर झुकणार नाही.” त्यांच्या या संदेशाने इराणमधील जनतेचे मनोबल वाढवले आणि सरकारच्या विरोधातील असंतोष काही प्रमाणात कमी झाला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्प यांची घोषणा; ‘लवकरच भारतासोबतही मोठा व्यापार करार’, चीन-अमेरिका करारानंतर नवा संकेत
या प्रकरणातून स्पष्ट होते की, इराणवर इस्रायलकडून होणारे हल्ले केवळ लष्करी किंवा अणुस्थळांपुरते मर्यादित नसून, सर्वोच्च नेतृत्वालाही थेट लक्ष्य केले जात आहे. खामेनींच्या हुशारीमुळे त्यांचा जीव वाचला असला, तरी या प्रकारामुळे इराणच्या अंतर्गत सुरक्षेची गंभीर परीक्षाही झाली आहे. जगातील दोन कट्टर वैर्यांमधील संघर्षात आता सामान्य युद्धाच्या पुढे जाऊन नेतृत्वच उध्वस्त करण्याचे धोरण राबवले जात असल्याचे हे उदाहरण आहे. या संघर्षाचे पडसाद केवळ पश्चिम आशियापुरते मर्यादित राहतील का, की जागतिक स्थैर्यावरही परिणाम करतील, हे आगामी काळात स्पष्ट होईल.