इस्रायलने आखली होती अयातुल्ला खामेनींची हत्या! संरक्षण मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा, मध्यपूर्व पुन्हा धगधगणार? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Israel Defense Minister Katz admission : इराण आणि इस्रायलमधील वाढता संघर्ष आता एका अत्यंत धक्कादायक वळणावर पोहोचला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वीकारले आहे की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या करण्याची योजना तयार करण्यात आली होती, परंतु प्रतिकूल परिस्थितीमुळे ती योजना अमलात आणता आली नाही.
ही माहिती समोर येताच मध्यपूर्वेतील वातावरण अधिकच तापले आहे. अयातुल्ला खामेनेई हे इराणचे सर्वोच्च नेता असून त्यांच्या नेतृत्वाखाली इराणचा अणुकार्यक्रम आणि इस्रायलविरोधी धोरणे चालतात. त्यामुळे त्यांना लक्ष्य करण्याचा निर्णय हा केवळ सामरिक नाही, तर राजकीय आणि जागतिक परिणाम घडवणारा ठरू शकतो.
इस्रायलच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मंत्री काट्झ म्हणाले, “आमचा हेतू स्पष्ट होता. जर तो आमच्या रेंजमध्ये असता तर आम्ही त्याला संपवले असते. अशा कारवायांसाठी आम्हाला कोणाच्याही परवानगीची गरज नाही.” या विधानावरून स्पष्ट होते की ही योजना इस्रायलने स्वतंत्ररित्या आखली होती आणि अमेरिकेकडून कोणताही हिरवा कंदील मागितलेला नव्हता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तुर्की इस्रायलच्या मार्गावर; ‘Steel Dome’द्वारे हवाई संरक्षण यंत्रणा बळकट करण्याचा निर्णय
इस्रायलचे दुसरे मंत्री योव गॅलंट यांनी खामेनेई यांची तुलना थेट ‘आधुनिक हिटलर’ शी केली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, इस्रायली सैन्याला युद्धाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खामेनींना संपवण्याचे आदेश देण्यात आले होते. या विधानावरून खामेनी हे इस्रायलच्या डोळ्यांत कसे खुपत आहेत, हे दिसून येते.
२६ जून रोजी खामेनी १२ दिवसांच्या गायबीनंतर प्रथमच जनतेसमोर आले. तेव्हाच त्यांनी इराणी टीव्हीवरुन भाषणात अमेरिकेला थेट इशारा दिला. त्यांनी म्हटले, “कतारमधील अमेरिकन तळांवर हल्ला करून आम्ही त्यांच्या तोंडावर थप्पड मारली आहे. आमच्यावर चिथावणी दिल्यास आम्ही अधिक तीव्र उत्तर देऊ.” त्यांनी अध्यक्ष ट्रम्पच्या “इराणची अणुक्षमता नष्ट केली जाईल” या विधानाला खोटं ठरवलं आणि इराणची अणुशक्ती अधिक मजबूत असल्याचा दावा केला.
माहितीनुसार, १३ जूनपासून इस्रायली हवाई हल्ले सुरू झाल्यानंतर खामेनी आणि त्यांचा मुलगा मोज्तबा हे तेहरानमधील गुप्त भूमिगत बंकरमध्ये लपले होते. या हल्ल्यांत इराणचे अणुशास्त्रज्ञ, वरिष्ठ कमांडर मारले गेले. खामेनेई यांचे आयुष्य धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहणे पसंत केले.
१२ दिवसांच्या संघर्षानंतर, अमेरिकेने युद्धबंदीची मध्यस्थी करत इराण आणि इस्रायलमध्ये तात्पुरती शांतता प्रस्थापित केली. पण या युद्धबंदीमुळे दोन्ही देशांतील तणाव पूर्णतः शमलेला नाही. इस्रायलकडून अयातुल्ला खामेनेई यांची हत्या करण्याचा खुलासा झाल्याने ही शांतता पुन्हा भंग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणकडून प्रतिहल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या घटनेने फक्त मध्यपूर्वच नव्हे, तर संपूर्ण जागतिक राजकारणात खळबळ उडवली आहे. एक सार्वभौम देश आपल्या दुसऱ्या देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड होत असल्याने, आंतरराष्ट्रीय पातळीवर नवीन राजनैतिक वादळ उठण्याची शक्यता आहे. खामेनेईंच्या हत्येची ही योजना प्रत्यक्षात आली असती, तर संपूर्ण पश्चिम आशिया युद्धाच्या आगीत होरपळला असता, असा तज्ज्ञांचा इशारा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्प यांची घोषणा; ‘लवकरच भारतासोबतही मोठा व्यापार करार’, चीन-अमेरिका करारानंतर नवा संकेत
खामेनेई यांच्या विरोधात इस्रायलकडून आखलेली हत्या योजना हा मध्यपूर्वेतील संघर्षाचा धोकादायक टप्पा मानला जात आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या या संघर्षामुळे भविष्यात जगाला आणखी एका मोठ्या युद्धाचा सामना करावा लागण्याची भीती निर्माण झाली आहे. इस्रायलचा हा खुलासा शांततेसाठी नव्हे, तर आग पेटवण्याचा इशारा ठरू शकतो.