Modi Bhutan visit : बौद्ध धर्मातील कालचक्र सशक्तीकरण म्हणजे काय? ज्याचे पंतप्रधान मोदींनी भूतानमध्ये केले होते उद्घाटन ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानमध्ये “कालचक्र सशक्तीकरण” या बौद्ध विधीचे उद्घाटन केले.
हा विधी भूतानमध्ये सुरू असलेल्या १५ दिवसांच्या “जागतिक शांती प्रार्थना महोत्सवा”चा एक प्रमुख भाग आहे.
या दौऱ्याद्वारे भारत-भूतान मैत्री अधिक दृढ होणार असून, जलविद्युत प्रकल्प व ऊर्जा सहकार्याचे करार होणार आहेत.
Modi Bhutan visit : भूतानच्या (Bhutan) शांत आणि अध्यात्मिक वातावरणात या दिवसांत एक अनोखा उत्सव रंगला आहे ‘जागतिक शांती प्रार्थना महोत्सव’. हा आंतरराष्ट्रीय बौद्ध उत्सव जगभरातील बौद्ध परंपरांना एका सूत्रात बांधतो. या ऐतिहासिक कार्यक्रमाचा विशेष भाग म्हणजे ‘कालचक्र सशक्तीकरण’ (Kalachakra Empowerment) एक प्राचीन वज्रयान बौद्ध विधी, ज्याचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी केले. या समारंभाला भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि माजी राजा जिग्मे सिंग्ये वांगचुक उपस्थित होते. या प्रसंगी मोदींनी बौद्ध धर्माच्या जागतिक वारशाला आणि भारत-भूतान यांच्या आध्यात्मिक नात्याला अधोरेखित केले.
‘कालचक्र’ म्हणजे “काळाचे चक्र”, जे बौद्ध धर्मातील अतिशय गूढ आणि शक्तिशाली तत्त्वज्ञान मानले जाते. वज्रयान परंपरेत हा एक दीर्घ व ध्यानात्मक विधी आहे, ज्याद्वारे साधक आपल्या अंतःशक्तीला जागृत करून विश्वातील शांततेसाठी प्रार्थना करतो. हा विधी जगभरातील बौद्धांसाठी अत्यंत पवित्र आहे. दलाई लामा स्वतःही अनेकदा कालचक्र सशक्तीकरण समारंभाचे नेतृत्व करतात. भूतानमध्ये यंदा या विधीचा उद्देश जागतिक शांतता, परस्पर समज आणि करुणा वाढविणे असा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Delhi Bomb Blast : लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटानंतर मुस्लिम जगाचं मोठं विधान; सौदी-युएई-इराणची अनपेक्षित प्रतिक्रिया
भूतानमध्ये ४ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान चालणारा हा महोत्सव थेरवाद, महायान आणि वज्रयान या सर्व बौद्ध परंपरांना एकत्र आणतो.
या उत्सवात आशिया, युरोप आणि अमेरिका येथील भिक्षू, बौद्ध विद्वान आणि साधक सहभागी होत आहेत. उत्सवात बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीचा उत्सव साजरा केला जातो तसेच मानवतेसाठी प्रार्थना केली जाते. भूतानचे राजा स्वतः या संपूर्ण कार्यक्रमाचे निरीक्षण करतात, ज्यातून त्या देशाची धर्मनिष्ठा आणि सांस्कृतिक बांधिलकी दिसून येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दोन दिवसांचा दौरा केवळ धार्मिक नव्हे तर राजनैतिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
भूतान हा भारताचा निकटतम शेजारी आणि धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील देश आहे. चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशशी सध्या भारताचे संबंध ताणलेले असताना, भूतानसोबतची मजबूत मैत्री भारतासाठी सुरक्षित सीमांचे प्रतीक ठरते. या दौऱ्यात मोदी राजांच्या ७०व्या वाढदिवसाला उपस्थित राहणार आहेत तसेच ऊर्जा सहकार्य आणि जलविद्युत प्रकल्पांवरील करारांनाही अंतिम रूप दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, दोन्ही देशांनी संयुक्तरित्या उभारलेला ‘पुनतसांगछू-२ हायड्रॉलिक प्रकल्प’ देखील या दौऱ्यात उद्घाटनासाठी तयार आहे जो दोन्ही राष्ट्रांसाठी धोरणात्मकदृष्ट्या निर्णायक ठरणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : S400 Theft : रशियन S-400 तंत्रज्ञान चोरण्याच्या प्रयत्नानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले; रशियाने बसवली जबर वचक
भूतानमधील हा कार्यक्रम भारताच्या “वसुधैव कुटुंबकम्” या तत्त्वज्ञानाचे सजीव उदाहरण आहे. मोदींनी केलेले कालचक्र सशक्तीकरणाचे उद्घाटन केवळ धार्मिक विधी नव्हे, तर भारत-भूतान सांस्कृतिक मैत्रीचे प्रतीक ठरले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून दोन्ही देशांनी जागतिक शांततेचा, करुणेचा आणि सहजीवनाचा संदेश दिला आहे.






