China-Pakistan military cooperation : दक्षिण आशियातील सुरक्षेला धोका निर्माण करणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर संस्थेच्या (Defense Intelligence Agency – DIA) अहवालानुसार, चीन पाकिस्तानला सामूहिक विनाशकारी शस्त्रे (WMD) विकसित करण्यात मदत करत आहे, आणि यामागचा मुख्य उद्देश म्हणजे भारतावर दबाव निर्माण करणे.
हा अहवाल अमेरिकन प्रतिनिधी सभागृहाच्या गुप्तचर व विशेष ऑपरेशन्सवरील उपसमितीपुढे सादर करण्यात आला. यामध्ये DIA चे संचालक लेफ्टनंट जनरल जेफ्री क्राउस यांनी स्पष्टपणे नमूद केले की, पाकिस्तान भारताला अस्तित्वासाठी धोका मानतो आणि म्हणूनच सतत अण्वस्त्रे व WMD विकसित करत आहे, विशेषतः युद्धभूमीवर वापरता येतील अशी सामरिक अण्वस्त्रे (Tactical Nuclear Weapons – TNW) निर्माण केली जात आहेत.
WMD म्हणजे काय?
WMD म्हणजे सामूहिक विनाश घडवणारी शस्त्रे, जी अण्वस्त्रे, रासायनिक शस्त्रे आणि जैविक शस्त्रांचा समावेश करतात. ही शस्त्रे लाखो लोकांचा काही क्षणांत मृत्यू घडवू शकतात. हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुहल्ल्यांनी या शस्त्रांच्या विनाशक क्षमतेची भयावहता जगासमोर मांडली आहे. WMD शस्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या जैविक घटकांमध्ये विषाणू, जीवाणू आणि इतर घातक सूक्ष्मजीवांचा समावेश होतो, जे साथीचे रोग पसरवून जनतेचा मोठा बळी घेऊ शकतात. त्याचप्रमाणे, सरीन आणि मस्टर्ड गॅससारखे रासायनिक वायू देखील विनाश घडवू शकतात.
चीनकडून पाकिस्तानला थेट मदत
अहवालात नमूद केल्याप्रमाणे, पाकिस्तानला WMD संबंधित साहित्य व तंत्रज्ञान मुख्यतः चीनमधून मिळते. याशिवाय, हाँगकाँग, सिंगापूर, तुर्की आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या ठिकाणांहूनही हे साहित्य पाकिस्तानमध्ये पाठवले जाते. पाकिस्तान आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे आधुनिकीकरण करत असून, परदेशी पुरवठादारांकडून घटक खरेदी करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा आला जगासमोर! ‘हा’ बहुचर्चितब फोटो निघाला चीनच्या रॉकेट फोर्सचाच अन् नाव भारताचं
धोक्याचा मुख्य बिंदू, अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती?
अहवालात सर्वात गंभीर इशारा असा आहे की, सामरिक अण्वस्त्रे (TNW) अधिक पोर्टेबल आणि मोबाईल असल्याने ती दहशतवादी संघटनांच्या हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता, आर्थिक संकट आणि दहशतवाद्यांची उपस्थिती यामुळे ही शक्यता अधिकच भीषण ठरते.
भारतावर पाकिस्तानचा दबाव वाढवण्याचा डाव
पाकिस्तानने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केली नाही, आणि तो अण्वस्त्र पुरवठादार गटाचाही सदस्य नाही. भारताच्या तुलनेत पारंपरिक लष्करी क्षमतेत मागे असल्याने पाकिस्तान WMD वापरून भारताला तोडीस तोड उत्तर देण्याच्या तयारीत आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, 2023 मध्ये भारताकडे 180 अण्वस्त्रे होती, तर पाकिस्तानची संख्या 170 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील अणुशस्त्र स्पर्धा आता धोक्याच्या टोकावर पोहोचली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायल-गाझा युद्धात नरसंहाराची परिसीमा; बालवाडी शाळेवर हल्ला, 25 जण जिवंत जळाले; गाझातील 70% इमारती उद्ध्वस्त
भारतासाठी मोठा धोका, आंतरराष्ट्रीय पातळीवर सजगतेची गरज
चीन-पाकिस्तान युतीतून उभा राहत असलेला WMD कार्यक्रम केवळ भारतासाठी नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी धोकादायक आहे. अशा विनाशकारी तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे प्रादेशिक स्थिरतेला गालबोट लागण्याचा धोका वाढला आहे. भारताच्या गुप्तचर संस्था आणि लष्करी नियोजक या घटनांकडे बारकाईने लक्ष देत आहेत. परंतु, जगभरातील महासत्तांनीही या घातक युतीच्या विरोधात कडक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून WMD चा वापर होण्याआधीच रोखता येईल. या पार्श्वभूमीवर, भारताने डिप्लोमॅटिक आणि लष्करी दोन्ही पातळ्यांवर सजग राहून योग्य रणनीती आखण्याची गरज आहे, कारण ही लढाई आता केवळ शस्त्रांची नाही, तर सुरक्षित भविष्यासाठीच्या अस्तित्वाची झाली आहे.