Pune News : शहरात रिक्षा चालकांची मनमानी कायम; आरटीओच्या कारवाईचा परिणाम शून्य (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पुणे/चंद्रकांत कांबळे : पुणे शहरात रिक्षा चालकांकडून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची लूट होत आहे. ओला, उबेर, रॅपिडो या ॲपच्या माध्यमातून रिक्षा बुक केली असता, निश्चित ठिकाणी पोहोचल्यानंतर रिक्षा चालक ॲपमध्ये दाखवलेले दर न घेता मीटरनुसार सर्रासपणे प्रवाशांकडून जादा पैसे उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. यातून रिक्षा चालकांची मनमानी शहरात मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे (आरटीओ) कडून ५ हजार २३३ ऑटो रिक्षांची तपासणी करण्यात आली. यात २ हजार २१७ रिक्षांमध्ये दोष आढळले आहेत. दोषींवर दंडात्मक कारवाई आणि परवाना निलंबन करूनदेखील म्हणावी तशी वचक ऑटो रिक्षा चालकांवर आरटीओ प्रशासनाची राहिलेली नाही.
PMP पर्यटन बसला जोरदार प्रतिसाद; ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग, उत्पन्न ६८ लाखांवर
परिणामी रिक्षा चालकांकडून भाडे नाकारणे, उद्धट वर्तन, मीटर फास्ट, जादा भाडे घेणे असे प्रकार शहरात मोठ्या प्रमाणात घडताना दिसून येत आहेत. आरटीओकडून ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर दर महिन्याला १०० ते १५० तक्रारी वरील त्रासाबाबत प्राप्त होत आहेत. तसेच बहुतांश प्रवाशांना तक्रार कुठे करावी याची माहितीच नाही. त्यामुळे अनेक तक्रारी आरटीओ प्रशासनाकडे प्राप्तच होत नाहीत.
याचा फायदा घेत अजूनही ॲप किंवा मीटर ज्या पर्यायावर जास्त पैसे होतात तो दर रिक्षा चालक घेत आहेत. ॲपनुसार भाडे स्वीकारून प्रवास पूर्ण झाल्यानंतर मीटरनुसार जास्त पैशांची मागणी केली जात असून, प्रवाशांनी अधिकचे पैसे देण्यास नकार दिल्यास थेट रिक्षा चालक प्रवाशांच्या अंगावर धावून जात आहेत. तसेच अनेक ठिकाणी भांडणे व वाद-विवाद होताना देखील दिसून येत आहेत.
तक्रारदारांच्या तक्रारीचे नेमके काय झाले?
प्रवाशांनी आरटीओने जारी केलेल्या नंबरवर तक्रार केल्यानंतर संबंधित तक्रारीचे काय झाले? त्या ऑटो रिक्षा चालकावर कोणती कारवाई करण्यात आली, ही माहितीच तक्रारदारांना दिली जात नाही. त्यामुळे अनेक तक्रारदार संभ्रमात आहेत की, मी दिलेल्या तक्रारीचे नेमके काय झाले?
यावर पुण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी ऑटो रिक्षाचालकांनी आरटीईने ठरवलेले दर घेणे गरजेचे असल्याचे म्हटले. नियमांचे पालन न करणाऱ्यावर दंडात्मक व परवाना निलंबनाची कारवाईही करत असल्याचे स्पष्ट केले. प्रवाशाकडून जादा भाडेदर आकारणे, भाडे नाकारणे, मिटर फास्ट असणे, उध्दट वर्तन करणे अशा तक्रारी असल्यास आपले नाव, मोबाईल क्रमांक फोटोसह ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावे, प्राप्त तक्रारीवर तत्काळ कारवाई केली जाईल.
तक्रार नोंद कशी करावी?
८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर
महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ.केशव क्षीरसागर यांनी म्हटले की, ओला, उबर आणि रॅपिडो या तिन्ही कंपन्या स्वतःच्या युजर अॅग्रीमेंटचेही पालन करत नाहीत, तसेच मोटर वाहन कायदा, कॅब अॅग्रिगेटर नियम आणि शासनमान्य आदेश यांसारख्या सर्व नियमांना पायदळी तुडवत आहेत. राज्यात सरकारमान्य दर सर्व ॲप्लिकेशनवर स्पष्टपणे दर्शविणे बंधनकारक असतानाही, तसेच परिवहन आयुक्त कार्यालय आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वारंवार लेखी आदेश देऊनही या कंपन्या नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. जास्तीत जास्त नफेखोरीच्या प्रयत्नात नागरिक आणि चालकांना वेठीस धरले जात असून त्यामुळे वारंवार वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






