All Party Delegation: 'जवाहरलाल नेहरूंपासून PM मोदींपर्यंत...' कनिमोळींच्या शिष्टमंडळाने रशियामध्ये पाकिस्तानचा पाडला फडशाच ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
All Party Delegation : भारताच्या राजनैतिक धोरणात अलीकडे मोठा बदल पहायला मिळत आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताने आता अधिक आक्रमक आणि स्पष्ट भूमिका स्वीकारली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली रशियामध्ये गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पाकिस्तानचा निषेध करत दिलेला ठाम इशारा.
मॉस्को येथे झालेल्या द्विपक्षीय बैठकीत भारताने पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाचा पर्दाफाश करत, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्याचा निर्णायक प्रयत्न केला. या शिष्टमंडळात विविध राजकीय पक्षांचे सदस्य, माजी राजदूत, आणि धोरणविशेषज्ञ सहभागी होते. या बैठकीत रशियाने भारताच्या भूमिकेचा पूर्ण पाठिंबा दर्शवत, दहशतवादाविरोधातील संयुक्त लढ्याची तयारी दर्शवली.
द्रमुक खासदार कनिमोळी यांनी मॉस्कोमध्ये माध्यमांशी बोलताना पाकिस्तानवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “पाकिस्तान आपल्या हद्दीत दहशतवादी तळ चालवतो आणि त्यांना पाठीशी घालतो. आम्ही केवळ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करतो. जोपर्यंत पाकिस्तान आपल्यावर हल्ला करत राहील, तोपर्यंत शांततेसाठी चर्चा होऊ शकत नाही.” त्यांनी असेही स्पष्ट केले की, भारताचा विरोध पाकिस्तानातील सामान्य नागरिकांशी नाही, तर तेथे राज्य पुरस्कृत दहशतवादाला आहे. याचबरोबर, जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंत सर्व पंतप्रधानांनी पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला नेहमी हल्ल्यांनी उत्तर देण्यात आले, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan News: भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर पाकिस्तानात बेकायदेशीर जमावाचा हल्ला
शिष्टमंडळाने रशियाचे उप परराष्ट्र मंत्री आंद्रे रुडेन्को, माजी पंतप्रधान मिखाईल फ्राडकोव्ह, तसेच रशियाच्या उच्चस्तरीय संसदीय सदस्यांशी चर्चा केली. या बैठकीत भारताने अलीकडील पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी रशियाने भारताच्या दहशतवादाविरोधी भूमिकेला पाठिंबा दर्शवून संयुक्त सहकार्याची तयारी व्यक्त केली. यामुळे भारताचे सुरक्षा विषयक आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक दृढ झाले आहे.
शिष्टमंडळातील आप नेते डॉ. अशोक कुमार मित्तल यांनी पाकिस्तानातील लोक चांगले असले तरी सरकार आणि लष्कर भारतविरोधी असल्याचे मत मांडले. ते म्हणाले, “मी पंजाबी असून पाकिस्तानला भेट दिली आहे. तेथील सामान्य नागरिक शांतताप्रिय आहेत, पण शासन आणि सैन्य भारताविरोधात जहरी मानसिकता बाळगतात.” माजी राजदूत मंजीव पुरी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करावा, अशी भूमिका मांडली. “जर पाकिस्तान स्वतःच्या हद्दीतील दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवू शकत नसेल, तर जगाने त्यात लक्ष घालणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
रशिया हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य असून, जागतिक राजकारणात त्याचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे भारताचे हे शिष्टमंडळ मोठ्या रणनीतिक डावपेचाचा भाग असल्याचे मानले जाते. यामधून भारताने हे स्पष्ट केले की, पाकिस्तानचा दहशतवादी अजेंडा केवळ भारतापुरता मर्यादित नसून जागतिक शांततेसाठी धोका आहे. शिष्टमंडळाने मॉस्कोतील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून भारताच्या अहिंसेच्या परंपरेचे स्मरण करून दिले, मात्र त्याचवेळी, ‘दहशतवाद्यांसोबत कोणतीही सहानुभूती शक्य नाही’, हा कणखर संदेशही दिला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्धाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले, भारताच्या ‘S-400’ ने पाकच्या AWACS चा उडवला धुवा; रचला विश्वविक्रम
या शिष्टमंडळाच्या दौऱ्यामुळे भारताने राजनैतिक आणि रणनीतिकदृष्ट्या रशियासारख्या सामर्थ्यशाली मित्रदेशाची पाठराखण मिळवण्यात यश मिळवले आहे. कनिमोळींच्या नेतृत्वात दिलेला संदेश केवळ पाकिस्तानसाठी नव्हे, तर संपूर्ण जागतिक समुदायासाठी आहे. दहशतवाद सहन केला जाणार नाही आणि जबाबदारी टाळणाऱ्यांना आता शांततेच्या टेबलावर जागा नाही.