ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताला आमंत्रण; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर राहणार उपस्थित (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉश्गिंटन: डोनाल्ड ट्रम्प लवकरच अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाची शपथ घेण्यास अगदी एकच आठवडा राहिला आहे. 20 जानेवारी 2025 रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपादाची जबाबादीरी स्वीकारतील. दरम्यान ट्रम्प यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्याला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांना आमंत्रण दिलं आहे. याशिवाय भारताला देखील शपथविधी आयोजन सोहळ्याच्या समितीने आमंत्रण पाठवले आहे. यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय, ट्रम्प प्रशासनातील मंत्री व इतर देशांमधून आलेल्या नेत्यांशीही ते संवाद साधणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीत कमला हॅरिस यांचा पराभव करून त्यांनी 312 इलेक्टोरल मतांसह विजय मिळवला. अध्यक्षीय निवडणुकीत विजयासाठी 270 इलेक्टोरल मतांची आवश्यकता असते. कमला हॅरिस यांना 226 मतांवर समाधान मानावे लागले. ट्रम्प यांच्या येता कार्यकाळ कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शपथग्रविधी सोहळ
20 जानेवारी रोजी वॉशिंग्टन डीसी येथे दुपारी 12 वाजता ट्रम्प यांचे शपथग्रहण होईल. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स ट्रम्प यांना शपथ देणार आहेत. 21व्या शतकात पहिल्यांदाच सुट्टीच्या दिवशी अमेरिकेच्या अध्यक्षांचा शपथविधी होत आहे. उपाध्यक्ष जेडी वेंस यांनाही या दिवशी शपथ देण्यात येणार आहे. शपथविधी सोहळ्यापूर्वी अमेरिकन संसदेच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
ट्रम्प यांची निवड अधिकृत
6 जानेवारी रोजी अमेरिकी संसदेने इलेक्टोरल कॉलेजच्या मतमोजणीनंतर ट्रम्प यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. निवडणुकीचे मतदान 5 नोव्हेंबर 2024 रोजी झाले होते, परंतु अधिकृत घोषणा दोन महिन्यांनंतर करण्यात आली. कमला हॅरिस यांनी उपाध्यक्ष म्हणून मतमोजणीच्या प्रक्रियेत ट्रम्प यांच्या विजयाची घोषणा केली.
विवादित अध्यक्ष
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या अध्यक्ष ठरले आहेत ज्यांना न्यायालयाने शिक्षाप्रदोषी ठरवले आहे. पोर्न स्टार प्रकरणाशी संबंधित 34 आरोपांमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले. मात्र, न्यूयॉर्कच्या न्यायालयाने त्यांना कोणतीही शिक्षा न लावता सशर्त मुक्त केले. ट्रम्प यांना कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित करण्यात आले होते. न्यायालयाने ही शिक्षा फक्त सांकेतिक स्वरूपाची असल्याचे सांगितले आहे. या शपथविधी सोहळ्यामुळे जागतिक राजकारणावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे, आणि भारत-अमेरिका संबंध बळकट करण्याच्या दृष्टीने जयशंकर यांचा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.