फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सियोल: सध्या दक्षिण कोरियामध्ये मार्शल लॉ प्रकरणावरुन राजकीय खळबळ सुरू आहे. सध्या याप्रकरणाचा तपास सुरू असून दरम्यान या प्रकरणी अटक माजी संरक्षण मंत्री किम योंग-हू्यून यांना अटक करण्यात आली होती. सध्या त्यांनी जीव देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी जीव देण्यासाठी अंतर्वस्त्रांचा वापर केला आहे. न्याय मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.
संरक्षण मंत्र्यांचा राजीनामा
3 डिसेंबर रोजी दक्षिण कोरियाचे माजी संरक्षण मंत्री किम योंग-ह्यून यांनी मार्शल लॉ लागू करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या या आदेशानंतर देशात खळबळ उडाली होती आणि विरोधी पक्षांच्या तीव्र विरोधामुळे हा नियम त्यांना सहा तासांत मागे घ्यावा लागला होता. त्यानंतर संरक्षण मंत्री किम योंग-ह्यून यांना राजीनामा दावा लागला होता. तसेच मार्शल लॉ लागू करण्याच्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती.किम यांची अटक आणि मार्शल लॉच्या घोषणेने देशात मोठा राजकीय कलह उभा केला आहे.
मार्शल लॉ निर्णयाशी संबंधित देशद्रोहाच्या आरोपांची चौकशी सुरू
राष्ट्रपती युन-सुक येओल यांनी मार्शल लॉ लागू केल्यानंतर संबंधित निर्णयाशी संबंधित देशद्रोहाच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. किम यांनी या तात्पुरत्या निर्णयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. मिळालेल्या कागदपत्रांनुसार आणि एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या साक्षीने असे सिद्ध झाले आहे की किम यांनी राष्ट्राध्यक्षांना मार्शल लॉ लागू करण्याचा सल्ला दिला होता. या घटनेनंतर दक्षिण कोरियाच्या राजकीय व्यवस्थेत मोठा गोंधळ निर्माण झाला.
राष्ट्राध्यक्ष कार्यालयासह इतर ठिकाणी छापे
विशेष चौकशी यंत्रणांनी राष्ट्राध्यक्ष कार्यालयासह राष्ट्रीय पोलीस यंत्रणा, सियोल मेट्रोपॉलिटन पोलीस यंत्रणा आणि संसद सुरक्षा सेवा या ठिकाणी छापे मारले.दक्षिण कोरियाच्या पोलिसांनी बुधवारी (11 डिसेंबर) राष्ट्रपतींच्या कार्यालयावर छापा टाकला. अध्यक्ष यून सुक येओल यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या गुन्हेगारी तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
समरी मार्शल लॉ लागू केल्याच्या संदर्भात राष्ट्रपतींवर बंडखोरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्ष यून सुक येओल यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही किंवा त्यांची चौकशीही करण्यात आलेली नाही.
देशातील राजकीय वातावरण ढवळले
राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांनी आपत्कालीन परिस्थितीत मार्शल लॉ लागू केले होते. मात्र, विरोधी पक्षांच्या विरोधामुळे आणि संसदेमध्ये मतदानानंतर दुसऱ्या दिवशी हा निर्णय रद्द करण्यात आला. मार्शल लॉ फक्त काही तासांपुरतेच लागू झाले असले, तरी यामुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. या घटनेची विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षानेही निंदा केली आहे. किम यांच्यावर होणाऱ्या चौकशीचा आणि या घटनेचा देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.