Nepal Protest : 'लाठ्या-काठ्या घेऊन पळत होता जमाव...'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय पर्यटकाने सांगितला हिंसाचाराचा थरार (फोटो सौजन्य-X)
काठमांडू : नेपाळच्या काठमांडूमधील परिस्थिती बिघडताना दिसत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. मंगळवारी सकाळपासून नेपाळच्या संसद भवनाबाहेर मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसून आले. नेपाळमध्ये पसरलेल्या हिंसाचाराचा सामना एका भारतीय पर्यटकालाही करावा लागला आहे.
नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिला पर्यटकाने सोशल मीडियावर तिच्या अडचणी शेअर केल्या. यामध्ये पर्यटक महिलेने सांगितले की, ‘मी राहत असलेल्या हॉटेलला आग लावण्यात आली. मी स्पामधून परत आले तेव्हा जमाव काठ्यांनी माझ्या मागे धावला. मी कशीतरी पळून जाऊन माझा जीव वाचवला. आता भारत सरकारने आम्हाला या परिस्थितीत मदत करावी, असे आवाहन केले आहे.
हेदेखील वाचा : KP Sharma Oli Resigns : नेपाळमध्ये सत्तापालट! अखेर पंतप्रधान केपी ओली यांचा राजीनामा,आंदोलकांनी पेटवली संसद
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये उपासना गिल नावाच्या महिलेने ती व्हॉलीबॉल लीगमध्ये भाग घेण्यासाठी नेपाळमध्ये आली असल्याचे सांगितले. पोखरा येथील राहत असलेल्या हॉटेलमध्ये आग लावण्यात आली. खोलीत ठेवलेले सर्व सामान जळून खाक झाले. मी तिथून परत आले तेव्हा लोक मोठ्या काठ्या घेऊन धावत होते. मी तिथून पळून जाऊन माझा जीव वाचवला.
नेपाळमधील परिस्थिती वाईट
नेपाळमधील परिस्थिती खूप वाईट आहे. सर्वत्र रस्ते पेटवले जात आहेत. आंदोलक पर्यटकांनाही सोडत नाहीत. त्यांना कोणी पर्यटक आहे की कोणी कामासाठी आला आहे याची पर्वा नाही. ते विचार न करता सर्वत्र जाळपोळ करत आहेत. आम्हाला माहित नाही की आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये किती काळ राहणार आहोत. पण मी भारतीय दूतावासाला विनंती करते की, कृपया हा व्हिडिओ, संदेश त्यांना पाठवा. मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो. कृपया आम्हाला मदत करा. माझ्यासोबत येथे बरेच लोक आहेत आणि आम्ही सर्वजण येथे अडकलो आहोत’, असे महिलेने व्हिडिओत म्हटले आहे.
भारतीय दूतावासाने जारी केल्या सूचना
काठमांडूमधील भारतीय दूतावासाने नेपाळमधील परिस्थितीबाबत नेपाळमधील सर्व भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. जर त्यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागत असेल किंवा मदतीची आवश्यकता असेल तर ते संपर्क साधू शकतात.