युरोप थरारला! कीवमध्ये रशियाचा विध्वंसक हल्ला; ईयू व ब्रिटिश कॉन्सिल कार्यालये जमीनदोस्त ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Russia Attack on EU British Council offices Kyiv : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या दीर्घकाळच्या युद्धाने आता निर्णायक वळण घेतले आहे. शांतता करारासाठी कोणतीही ठोस प्रगती न झाल्यानंतर रशियाने थेट युरोपियन युनियन (EU) आणि ब्रिटिश कौन्सिलच्या कार्यालयांवर हल्ला करून जगभरात खळबळ उडवून दिली आहे. व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशावरून झालेल्या या हल्ल्यामुळे केवळ युक्रेनच नव्हे, तर संपूर्ण युरोपभर धोक्याची घंटा वाजली आहे.
गुरुवारी (२८ ऑगस्ट) संध्याकाळी युरोपियन युनियनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांनी पुतिन यांच्यासाठी कठोर शब्दांत विधान केले होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “शांततेच्या चर्चेसाठी पुतिन यांच्याकडे वाटाघाटी टेबलावर बसण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही.” त्यानंतर अवघ्या काही तासांतच रशियन सैन्याने कीवमधील युरोपियन युनियनचे कार्यालय तसेच ब्रिटिश कौन्सिलची इमारत लक्ष्य करून ती उद्ध्वस्त केली. या कारवाईद्वारे पुतिन यांनी जगाला स्पष्ट संदेश दिला आहे “रशिया युद्धविराम करारासमोर झुकणार नाही.” गेल्या तीन वर्षांच्या या युद्धकाळात रशियाने पहिल्यांदाच थेट युरोपियन युनियन व ब्रिटनच्या संस्थांना लक्ष्य केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US–Japan Trade Deal: जागतिक राजकारण ‘असे’ फिरले, पंतप्रधान मोदींच्या जपान दौऱ्यामुळे अमेरिकेने अब्जावधी रुपये झटक्यात गमावले
या विध्वंसक हल्ल्यात दोन्ही कार्यालयांचे संपूर्ण अस्तित्व नष्ट झाले. इमारतींचे ढिगारे, आगीचे लोळ आणि बचावपथकांचा गोंधळ यामुळे कीवचे वातावरण भयभीत झाले. युक्रेनियन हवाई दलाच्या माहितीनुसार, रशियाने फक्त एका रात्रीत तब्बल ६२९ हल्ले केले. यामध्ये ५९८ ड्रोन आणि ३१ क्षेपणास्त्रांचा समावेश होता. हा युक्रेनवरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यात चार बालकांसह २३ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर ब्रिटनने तात्काळ कठोर भूमिका घेतली. लंडनमधील रशियन दूतावासातील अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. त्याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प हे काही दिवसांपासून पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यात शांतता चर्चेचा पूल उभारण्याच्या प्रयत्नात होते. मात्र रशियाचा हा हल्ला त्यांच्या प्रयत्नांनाही धक्का पोहोचवणारा ठरला आहे. ईयू व ब्रिटनचे पंतप्रधानांनी एकत्रितपणे जाहीर केले की, “रशियाने आता केवळ युक्रेनशी नाही, तर संपूर्ण युरोपशी युद्ध घोषित केले आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Voyager 2 : व्हॉयेजर 2 चा जगाला अखेरचा नजराणा; नेपच्यून व ट्रायटनचे खास छायाचित्र 36 वर्षांनी आले समोर
आता संपूर्ण जगाचे लक्ष पुढील पावलांकडे लागले आहे. युरोपियन युनियन व ब्रिटन रशियाला कसे प्रत्युत्तर देतील? अमेरिकेच्या निर्णयाची दिशा काय असेल? हे महत्त्वाचे ठरणार आहे. काही तज्ज्ञांचे मत आहे की, या हल्ल्यामुळे युक्रेन युद्ध अधिक भयंकर होण्याची शक्यता आहे. तर काहींना वाटते की, या घटनेतून उलट आंतरराष्ट्रीय दबाव वाढून पुतिन यांना चर्चेला यावे लागेल. सध्या तरी युक्रेनचे नागरिक भीती व अस्वस्थतेच्या छायेत आहेत. सलग साडेतीन वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षाने आता नवा टप्पा गाठला आहे. युरोपभर वाढलेला तणाव जगासाठीही गंभीर धोका ठरत आहे.