ट्रम्पवरील जीवघेण्या हल्ल्यासंदर्भात अमेरिकेची मोठी कारवाई; सुरक्षा व्यवस्थेतील एजंट्स निलंबित (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेतील सहा सीक्रेट सर्व्हिस एजंट्सना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे हल्ला झाल्या असल्याचे सांगून त्यांना निलंबित केले आहे.
गेल्या वर्षी १३ जुलै पेनसिलव्हेनियात एका प्रचार सभेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यावेळी एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला लागून गेली होती. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. या गोळीबारात एकाचा मृत्यू तर दोन जखमी झाले होते.
सीक्रेट सर्व्हिसच्या स्नायपरने हल्लेखोर थॉमस क्रूसला जागीच ठार केले होते.दरम्यान या हल्ल्यात सुरक्षा व्यवस्थेत निष्काळजीपणा दिसून आल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. यामुळे कोणताही बेजाबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही असे अधिकाऱ्यांना निलंबित करताना सांगण्यात आले.
या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेला वेग मिळाल होता. त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली जात होती. या घटनेवर १८० पानांचा एक तपशीलवार अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. या अहवालात सांगण्यात आले होते की, ही घटना टाळता येण्याजोगी होती. परंतु सीक्रेट एजंट्सच्या दुर्लक्षतेमुळे ही दुर्दैवी घटना घडली. अहवालात सीक्रेट सर्व्हिसच्या कामकाजात त्रुटी असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते.
दरम्यान या संदर्भात सीबीएस न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत डिप्टी डायरेक्टर मॅट क्विन यांनी, सीक्रेट एजंट्सना १० ते १२ दिवसांसाठी बिना वेतन रजेवर पाठवण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर कमी जबाबदाऱ्या असलेल्या विभागाच्या कामे दिली जाणार आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा स्वीकारला जाणार नाही.
सीक्रेट सर्व्हिसची स्थापना १८६५ मध्ये करण्यात आली होती. अमेरिकेतील बनावट चलनांवर नियंत्रण ठेवणे हा याचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर १९०१ मध्ये तत्कालीन अध्यक्ष विल्यम मॅकिनले यांच्यावरही हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर सीक्रेट सर्व्हिसवर राष्ट्राध्यक्षांच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या एजन्सीमध्ये ३, २०० स्पेशल एजंट्स, १,३०० डिव्हिजन ऑफिसर्स आण २,००० तांत्रिक व सहाय्याक कर्मचारी हे. या एजंट्सना वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार आहे.