Giorgio Armani Passes Away (Photo Credit- X)
Giorgio Armani Passes Away: जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जियो अरमानी (Giorgio Armani) यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले आहे. ‘अरमानी’ या ब्रँडने कपड्यांच्या जगात एक वेगळीच ओळख निर्माण केली होती, जी आजही कायम आहे. या ब्रँडचे कपडे वापरणे म्हणजे एक प्रकारचा ‘स्टेटस सिम्बॉल’ मानला जातो. अरमानी यांच्या निधनाने फॅशन जगतातील एका गौरवशाली युगाचा अंत झाला आहे. अरमानी ग्रुपने एका शोक संदेशात म्हटले आहे की, ‘असीम दु:खाने अरमानी ग्रुप हे जाहीर करत आहे की, आमचे संस्थापक आणि प्रेरणास्थान जॉर्जियो अरमानी यांचे निधन झाले आहे.’
जॉर्जियो अरमानी काही काळापासून अस्वस्थ होते. याच कारणामुळे जूनमध्ये मिलान मेन्स फॅशन वीकमध्ये ते सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच त्यांनी आपल्या ब्रँडचा एखादा इव्हेंट चुकवला होता. या वर्षीच्या सुरुवातीला पॅरिस, फ्रान्स येथे आयोजित ‘जॉर्जियो अरमानी प्रिवेची हाऊते कूचर स्प्रिंग/समर २०२५’ कलेक्शन शोच्या शेवटी त्यांची उपस्थिती ही त्यांची सार्वजनिक मंचावरील शेवटची उपस्थिती ठरली.
‘रे जॉर्जियो’ म्हणजेच किंग जॉर्जियो म्हणून ओळखले जाणारे जॉर्जियो अरमानी हे जागतिक फॅशन जगतातील एक प्रतिष्ठित नाव होते. त्यांच्या साध्या, पण अत्यंत आकर्षक आणि आधुनिक डिझाइनसाठी ते ओळखले जात. १९३४ मध्ये इटलीतील पियाचेंझा येथे जन्मलेल्या अरमानी यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘विंडो ड्रेसिंग’ने केली. १९७० च्या दशकात डिझायनर म्हणून त्यांना खरी ओळख मिळाली आणि त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे फॅशन जगताचे नेतृत्व केले.
१९७५ मध्ये सुरू झालेल्या त्यांच्या ‘अरमानी’ ब्रँडने पुरुषांच्या कपड्यांमध्ये क्रांती घडवली. नंतर त्यांच्या व्यवसायाचा विस्तार महिलांचे फॅशन, अॅक्सेसरीज, फ्रेगरन्स आणि लक्झरी लाइफस्टाइलपर्यंत झाला. ‘किंग ऑफ फॅशन’ म्हणून ओळखले जाणारे अरमानी यांचा वारसा त्यांच्या कालातीत लक्झरी डिझाइन्समुळे नेहमीच जिवंत राहील, ज्यांनी अनेक पिढ्यांतील डिझायनर्स आणि फॅशनप्रेमींना प्रेरणा दिली. त्यांचे डिझाइन केवळ फॅशन शोपुरते मर्यादित नव्हते, तर हॉलिवूड रेड कार्पेट्स, बॉलिवूड, जगभरातील नेते आणि जागतिक स्टाइल स्टेटमेंटमध्येही त्यांची ख्याती पसरली होती.
मिळालेल्या वृत्तानुसार, शनिवार आणि रविवार रोजी मिलानमध्ये त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याची व्यवस्था केली जाईल. त्यानंतर अज्ञात दिवशी आणि ठिकाणी खाजगी अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती कंपनीने दिली आहे.