पुण्यात पोर्शे कारच्या झालेल्या अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. अल्पवयीन आणि त्याच्या पालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. तसेच अल्पवयीन मद्यधुंद अवस्थेत 200 किमी प्रतितास वेगाने कार चालवत होता, ज्यामुळे दोन दुचाकीस्वारांचा टक्कर होऊन मृत्यू झाला. पण या अपघातात चूक कोणाची, त्या अल्पवयीनाची की त्याच्या वडिलांची ज्याने त्याला गाडीची चावी दिली?
तुमच्या कार किंवा बाईकने एखाद्याला धडक दिली आणि त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला, तर कोण दोषी मानला जाईल आणि कोणाला शिक्षा होईल? तुम्हीही तुमच्या कार किंवा बाईकची चावी दुसऱ्याला गाडी चालवण्यासाठी देत असाल तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित असणे आवश्यक आहे. बरेच पालक विचार न करता गाडी चालवण्यासाठी त्यांच्या अल्पवयीन मुलांना त्यांच्या गाडीची चावी देतात. तुम्हीही असेच काही करत असाल तर जाणून घ्या अपघाताच्या वेळी कोणाला जबाबदार धरले जाईल.
अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास ही शिक्षा होणार
अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याची परवानगी देणे हा कायदेशीर गुन्हा आहे. मोटार वाहन कायद्यानुसार, कार, दुचाकी किंवा इतर कोणतेही वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचे किमान वय १८ वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. जर तुमची मुले अल्पवयीन असतील आणि तुम्ही त्यांना दुचाकी किंवा कारची चावी चालवायला दिली तर तो गुन्हा मानला जाईल. त्या वाहनाच्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाल्यास, या प्रकरणात अल्पवयीन मुलासह पालकांनाही आरोपी ठरवण्यात येईल. मोटार वाहन कायद्यानुसार, या प्रकरणात पालकांना तीन वर्षांपर्यंत कारावास आणि 25,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. याशिवाय 12 महिन्यांपर्यंत वाहन नोंदणीही रद्द केली जाऊ शकते.
कायदा काय म्हणतो?
मोटार वाहन कायद्याच्या कलम 005 आणि 195 मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, जर तुम्ही एखाद्या अल्पवयीन व्यक्तीला गाडीची चावी दिली आणि रस्तावर अपघात झाला, तर या प्रकरणात पालकही अल्पवयीन व्यक्तीइतकेच दोषी ठरतात. त्यामुळे पुढच्या वेळी तुमच्या वाहनाची चावी कोणालाही देण्यापूर्वी तुम्ही ज्या व्यक्तीला चावी देत आहात ती व्यक्ती प्रौढ आहे की अल्पवयीन आहे हे लक्षात घ्या.
जर ती व्यक्ती प्रौढ असेल तर त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. जर तुम्ही एखाद्या प्रौढ व्यक्तीला गाडीची चावी दिली आणि असे काही घडले तर या प्रकरणात चालकाला जबाबदार धरले जाईल.