मराठवाडा या शब्दाची व्युत्पत्तीच कदाचित 'मराठी' या शब्दापासून झाली असावी असे मला वाटते. 'मराठीचा वाडा' तोच 'मराठवाडा', वाडा म्हणजे मोठे, प्रशस्त, विस्तीर्ण घर. या वाड्यातील मराठी भाषा हीच कदाचित मूळ मराठी असावी. महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेल्या याच प्रदेशातून मराठीचा उगम व प्रसार झाला असावा असे मला वाटते. परंतु कालांतराने, या प्रदेशावर निजामाची सत्ता आल्याने या प्रदेशात उर्दू शिक्षण सक्तीचं करण्यात आलं आणि शिक्षणाची माध्यम भाषा मराठी काढून उर्दू करण्यात आली. किंबहुना ती लादली गेली आणि मग मराठी भाषेत लिलया उर्दू भाषेच मिश्रण व्हायला सुरु झालं. परिणामी मराठी भाषेवर अत्याचार झाले, मूळ बोली भाषा बाजूला सरकली आणि त्याजागी उर्दूमिश्रित मराठी आली. शाळा, सरकारी कचेऱ्यांतून उर्दू भाषेचा वापर होऊ लागल्याने मराठी माणसाला नाईलाजाने उर्दू भाषेचा वापर करणे भाग पडले आणि मूळ भाषेची मोड-तोड व्हायला लागली. निजामाची राजधानी हैद्राबाद असल्याने त्या ठिकाणी तेलगुमिश्रित उर्दू मराठवाड्यात येऊन पोचली. परिणामी तेलगू-मराठी-उर्दू या तीन भाषेचा संगम झाला आणि एक वेगळीच मराठवाडी भाषा अस्तित्वात आली असावी. मराठवाड्याला आंध्र कर्नाटक आणि मध्यप्रदेश ही तीन राज्ये लागून आहेत. मराठवाडा आणि विदर्भ प्रांत हे पण शेजारी शेजारी. त्यामुळे मराठवाड्याच्या बोलीभाषेत अनेक बोलीभाषांची सरमिसळ झालेली दिसते .
ज्ञानोबा माउलींच्या जन्माच्या ७५ वर्ष आधी, 'विवेकसिंधु' लिहिणारे मराठीतील आद्य कवी मुकुंदराज हे मराठवाड्यातल्या अंबाजोगाईचे. त्यांनी १२ व्या शतकात लिहिलेल्या विवेकसिंधुमधील मराठी भाषा आणि ज्ञानोबा माउलींच्या ज्ञानेश्वरीतील भाषा जवळपास सारखीच वाटते. याचाच अर्थ असा, महाराष्ट्रातील इतर ठिकाणची व मराठवाड्यातील बोलीभाषेत फारसा फरक नसावा. किंबहुना सगळीकडे सारख्याच प्रकारची मराठी भाषा बोलली जात असावी.
विवेकसिंधूतील प्रारंभीच्या नमनात कवी मुकुंदराज म्हणतात;
जय जयाजी चंद्र मौळी | माते कृपादृष्टी न्याहाळी | मग पावेन नभाळी | ब्रह्मसुखाची |
तू निर्गुण निराकारू | नि:संगु निर्वीकारु | तुझेया स्वरूपाचा पारू | नेणती ब्रह्मादिक |
ही भाषा आणि माऊलीच्या ज्ञानेश्वरीतील प्रारंभीच्या नमनातील;
ओम नमोजी आद्या| वेदप्रतिपाद्या | जयजय स्व संवैद्या | आत्मरुपा |
या दोन्हीतील मराठी भाषेची धाटणी जवळपास सारखीच वाटते. त्यावरून, मराठवाड्यातील बोलीभाषा आत्ता आहे तशी पूर्वी नव्हती, तर ती सर्वत्र बोलली जाणारी एकच भाषा होती असेच म्हणावे लागेल. पण पुढे पुढे बदलत्या काल-मान-परिस्थितीनुसार, इतर संतांच्या वाङ्मयात थोडाफार बदल जाणवतो. मग एकनाथ महाराजांची भारुडे, गवळणी, अभंग असो किंवा गोरोबा, जनाबाई, नामदेव यांचे अभंग असो, त्या त्या वाङ्मयावर त्या त्या काळातील बदलत्या समाज बोलीभाषेचा प्रभाव पडलेला आढळून येतो. समर्थ रामदासांच्या दासबोधातील मराठी भाषा ही अत्यंत शुद्ध, सुलभ व सर्व-मान्य असल्याचे दिसून येते. एकूणच मराठवाड्याच्या बोली भाषेचा इतिहास प्रगल्भ आणि वैभवशालीच असल्याचे दिसून येते. त्यानंतर मात्र जसजसा निजामी राजवटीचा अंमल अधिक तीव्र होत गेला, तसतशी मराठवाड्यातील बोलीभाषा स्थानपरत्वे बदलत गेलेली दिसते. मराठवाड्यातील प्रत्त्येक जिल्ह्यातील बोलीभाषेत थोडाफार फरक जाणवतो. विदर्भ प्रांताला लागून असलेल्या मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील लोकांच्या बोलीभाषेवर विदर्भाचा प्रभाव पडल्याचे जाणवते.
विदर्भात म्हटल्या जाणारं ‘काय करून राहिला बे ?’ हेच वाक्य नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या तालुक्यात ‘काय करायलास बे?’ असं उच्चारलेलं आढळत. तर, कर्नाटकलगत असणाऱ्या काही भागात जसे की, उदगीर, देगलूर, लातूर या जिल्ह्यातील बोली भाषेत कानडी हेल जाणवतो. ई... तुम्ही येता कि मग ?, ई.. तुम्ही जेवणार कि मग ? ई.. तुम्ही करता कि मग ? अशा सुरावटीतील बोलीभाषा ऐकू येते. प्रत्येक वाक्याच्या आधी हेल काढलेला ई बोलीभाषेत कुठून आला हे समजायला मात्र मार्ग नाही. तर नांदेड जिल्ह्यातील देगलूर व मुखेड आणि लातूर जिल्ह्यातील उदगीर या भागात जाऊलालस की? येऊललास की ? करुलालास की ? अशी बोलीभाषा आढळते. आंध्रा-तेलंगणाच्या च्या सीमे लगत असणारा, नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुका हा जो भाग आहे, या भागात मराठी भाषेत बोलणारा माणूस, मराठी बोलतो की तेलगू बोलतो हेच काळत नाही. तर नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्याची एक गम्मत आहे.
पूर्वी आणि आत्ताही या भागातील व्यापारी स्रोत हा हैद्राबाद आहे. मराठवाड्यासाठी हैद्राबाद हे एक मोठ्ठ व्यापार केंद्र आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेकडो लोक हैद्राबादला व्यापार - व्यवसायाच्या निमित्ताने जात असतात. त्यामुळे आपसूकच या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून हैद्राबादी हिंदीने घुसखोरी केलेली दिसते.
करायलेत, व्हायलेत, खायलेत, झोपायलेत, जेवायलेत अशी ढंगदार शब्दछटा कानावर पडली की ही व्यक्ती मराठवाड्यातली आहे हे आपसूक ओळखायला येत. काही शब्दांना जोडून दुसरे विशेषण लावणे आणि जागोजागी बोलीभाषेत म्हणींचा वापर करणे हे या भाषेच वैशिष्ठ्यच म्हणावं लागेल. तिखट-आग यात तिखटाला आग हे विशेषण जोडून तीव्र तिखटपणा दर्शवणारा शब्द तयार झाला. कडूंडक या शब्दात कडूच्या पुढे डक हे विशेषण जोडून कडुपणाची तीव्रता दिसते. त्याचप्रमाणे, आंबटचिंच, थंडगार, बूळचट असे कितीतरी शब्द मूळ शब्दाचा स्थायी गुणधर्म अधिक तीव्र दाखवण्यासाठी निर्माण झालेले दिसतात. तर, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव किंवा घडलेल्या प्रसंगाचं वर्णन अधिक स्पष्ट करण्यासाठी म्हणींचा वापरही वेळोवेळी केल्या जातो.
‘आपल्या खाली जळते अन दुसऱ्याच विझवायला पळते’,
‘नमाज पडायला गेलो तर मस्जिद गळ्याला पडली’,
‘त्याच गावच्या बोरी अन त्याच गावच्या बाभळी’,
‘आपलं ठेवा झाकून अन दुसऱ्याच बघा वाकून’,
‘घेणं न देणं कंदील घेऊन येणं’
अशा म्हणींचा वापर सातत्यानं या भागात होताना दिसतो. सर्दी झाली तर भाम्बारा आला, कावीळ झाली तर कौळ झाला, स्मशानच्या जागी मसन, नागड्याला भोंगळं, धुराला धुपट, मातीला माटोडा, नाव्ह्यास वारिक, केस कर्तनास हजामत म्हणतात तर थोबाड फोडणेला थ्थुतरित मारणे, दात काढणेला दात इचकावणे, वगैरे वगैरे अशा अनेक गमतीदार शब्दांचा भांडार मराठवाडी बोलीभाषेत आढळून येतो.
मराठवाड्यात नदीवर कपडे धुताना होणारी महिलांची चर्चा, दोन घरातील शेजाऱ्यांचे भांडण आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या अस्सल मराठवाडी शिव्या अंगावर काटा आणतात. लग्नातील सूत्रसंचालन, कार्यक्रमातील सूत्रसंचालन, जाहीर सभेतील राजकीय नेत्यांची भाषणे या सर्व जागी मराठवाड्याची रसभरीत मनाला वेगळा आल्हाद देणारी हवीहवीशी वाटणारी, बोलीभाषा ऐकण्यास मिळते. एवढंच नाहीतर घरातील एखादी व्यक्ती मृत्यू पावते त्यावेळी होणाऱ्या हृदनातही वेगळा हेल, वेगळी लय आणि वेगळा बाज ऐकण्यास मिळतो. एकूण काय तर मराठवाड्यातील बोलीभाषा ही सर्वांगांनी नटलेली, मन प्रसन्न करणारी आल्हाददायी बोलीभाषा आहे. ती ऐकताना माणूस निश्चितच बोलीभाषेची वेगळी अनुभूती घेऊ लागतो हे मात्र नक्की.
अॅड. गजानन रामकृष्णराव पिंपरखेडे
pimparkhede55@gmail.com