फोटो सौजन्य - एआय career
Career

Sinhagad Medical College: तपासणीत दिरंगाई केल्याबद्दल हायकोर्टाने MUHS आणि NMC ला फटकारले; विश्वस्तांना हद्द सोडण्यास बंदी

Sinhagad Medical College Case: सिंहगड वैद्यकीय महाविद्यालयाच्या तपासणीत दिरंगाई केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने MUHS आणि NMC ला फटकारले. विश्वस्तांना हद्द सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.

श्रेया देशमुख
  • सिंहगड वैद्यकीय महाविद्यालय तपासणीत दिरंगाई

  • हायकोर्टाने एमयूएचएस, एनएमसीला फटकारले

  • विश्वस्तांना परवानगीशिवाय हद्द सोडण्यास बंदी

Sinhagad Medical College Case: सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी (एसटीईएस) च्या वैद्यकीय महाविद्यालयाची तपासणी करण्याच्या आदेशाचे पाच दिवसांतही पालन न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयूएचएस) आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला (एनएमसी) जोरदार फटकारले. वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आल्याची गंभीर चिंता न्यायालयाने व्यक्त केली.

न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. निला गोखले यांच्या खंडपीठासमोर २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. विद्यार्थ्यांचे वकील शेखर जगताप यांनी ऑक्टोबर २०२६ पासून महाविद्यालयातील अध्यापन आणि इतर कामकाज पूर्णपणे ठप्प झाल्याचे न्यायालयाला सांगितले होते. त्यामुळे २० नोव्हेंबरच्या आदेशात एमयूएचएस आणि एनएमसीच्या प्रतिनिधींना तातडीने संस्थेला भेट देऊन वस्तुस्थिती कळवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, काहीही झाले नाही.

“पाच दिवस वाया गेले, यामुळे आमच्या सद्सद्विवेकबुद्धीला धक्का बसला आहे,” असे तीव्र निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. आता दोन्ही यंत्रणांनी प्रतिज्ञापत्रावर महाविद्यालयाची सद्यस्थिती कळवावी. तसे न झाल्यास २७ नोव्हेंबर रोजी एमयूएचएसचे कुलसचिव आणि एनएमसीचे सचिव यांनी स्वतः न्यायालयात हजर राहावे, असा इशारा देण्यात आला. परदेशी नागरिक असलेले विश्वस्त डॉ. रोहित मारुती नवले यांचे प्रतिज्ञापत्रही न्यायालयासमोर ठेवण्यात आले. पुढील सुनावणी ९ डिसेंबर रोजी होणार आहे.

विश्वस्तांच्या हालचालींवर निर्बंध

सीबीआय आणि ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी केलेल्या विनंतीवरून न्यायालयाने एसटीईएसच्या सर्व विश्वस्त व सदस्यांना तपास अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रादेशिक हद्द सोडण्यास मनाई केली. एसटीईएसतर्फे सादर करण्यात आलेल्या पाच प्रतिज्ञापत्रांमध्ये राज्य सरकारकडून मिळालेली रक्कम, बँक खाती, जमा व काढलेली रक्कम यांचा तपशील आहे. तपास यंत्रणांनी त्याचा बारकाईने अभ्यास करून तपास सुरू ठेवावा, असे निर्देश देण्यात आले.

आकडेवारीतील तफावतीचा खुलासा

धर्मादाय आयुक्त, पुणे कार्यालयाकडून सादर करण्यात आलेल्या तक्त्यावरून एसटीईएसला ११ विश्वस्त आणि ३४ सदस्य असल्याचे समोर आले. यापूर्वी न्यायालयाला केवळ ४ ते ५ विश्वस्त असल्याचे सांगण्यात आले होते. या सर्वांची भूमिका आणि प्रकरणातील सहभाग याबाबत पुढील सुनावणीत खुलासा करावा लागणार आहे. तसेच १९९४ पासून ७२ बदल अहवाल प्रलंबित असल्याचेही उघड झाले. ते इतकी वर्षे का निकाली काढले गेले नाहीत, याचा खुलासा करण्याचे निर्देश महाधिवक्त्यांना देण्यात आले. संस्थेने विविध बँकांकडून घेतलेल्या २४ मोठ्या कर्जांची स्थिती आणि महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमाच्या कलम ४१-अ अन्वये प्रलंबित चौकशी याबाबतही माहिती मागवण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने MUHS आणि NMC ला का फटकारले?

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या (STES) वैद्यकीय महाविद्यालयाची तपासणी करण्याच्या २० नोव्हेंबरच्या आदेशाचे पाच दिवसांतही पालन न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला (NMC) फटकारले.

या प्रकरणात विश्वस्तांबाबत काय निर्देश देण्यात आले आहेत?

विश्वस्तांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय हद्द सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या प्रकरणाची सुनावणी कोणाच्या खंडपीठासमोर झाली?

न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. निला गोखले यांच्या खंडपीठासमोर २५ नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली.

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम

Fashion: पश्मीना शाल खरेदी करताय? जाणून घ्या तिचे वैशिष्ट्य, प्रकार आणि ओळखण्याच्या 'या' खास टिप्स

वाळू माफियांची मुजोरी! महसूल अधिकाऱ्याला रॉड अन् दांडक्याने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई