crime news 
क्राईम

इन्स्टाग्रामवर मैत्री, गणपती दर्शनाच्या बहाण्याने तरुणीला बोलावले अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

सोशल मीडियावर ओळख करून मैत्री संपादन केल्यानंतर विश्वासाचा गैरफायदा घेत तरुणीची फसवणूक केल्याची घटना पुण्यातील बुधवार पेठ परिसरात घडली आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dnyaneshwar more

पुणे : सोशल मीडियावर ओळख करून मैत्री संपादन केल्यानंतर विश्वासाचा गैरफायदा घेत तरुणीची फसवणूक केल्याची घटना पुण्यातील बुधवार पेठ परिसरात घडली आहे. दगडूशेठ गणपतीचे दर्शन घडवून आणण्यासह पूजा करून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणीला बुधवार चौकात बोलावण्यात आले. त्यानंतर पार्किंग करून देण्याच्या बहाण्याने तिची दुचाकी घेऊन गेलेला तरुण परतलाच नाही. दुचाकीसह मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज घेऊन आरोपी पसार झाला. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित २३ वर्षीय तरुणीची इन्स्टाग्रामवर ओमकार तातिया (वय अंदाजे २२, रा. पुणे) याच्याशी ओळख झाली होती. सोशल मीडियावरील संवादातून दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. काही काळानंतर आरोपीने तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शन घडवून आणण्याचे आणि पूजा करून देण्याचे आमिष दाखवले.

या आमिषाला बळी पडून तरुणी २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास बुधवार चौकात पोहोचली. तेथे बुधवार चौकातील गणराज लॉजसमोर आरोपी तिच्या भेटीला आला. यावेळी त्याने तरुणीला दुचाकी पार्किंग करून देतो, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणीने आपली दुचाकी त्याच्या ताब्यात दिली.

मात्र, दुचाकी घेऊन गेलेला आरोपी बराच वेळ होऊनही परतला नाही. त्यामुळे तरुणीला संशय आला. दुचाकीच्या डिक्कीत मोबाइल आणि सात हजार रुपये रोख ठेवले होते. आरोपीने दुचाकीसह मोबाइल आणि रोकड असा सुमारे ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे तिच्या लक्षात आले.

त्यानंतर तरुणीने फरासखाना पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी ओमकार तातिया याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना सावधगिरी बाळगण्याची गरज या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे. केवळ ऑनलाइन ओळखीवर विश्वास ठेवून वैयक्तिक वस्तू किंवा वाहन अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात देणे धोकादायक ठरू शकते.

पुण्यात तरुणीची फसवणूक कशी करण्यात आली?

तरुणीची इन्स्टाग्रामवर ओमकार तातिया याच्याशी ओळख झाली होती. त्याने दगडूशेठ गणपतीचे दर्शन आणि पूजा करून देण्याचे आमिष दाखवून तिला बुधवार पेठेत बोलावले. त्यानंतर पार्किंगच्या बहाण्याने तिची दुचाकी घेऊन तो पसार झाला.

आरोपीने किती रुपयांचा ऐवज लंपास केला?

आरोपीने तरुणीची दुचाकी, मोबाइल आणि सात हजार रुपये रोख असा एकूण सुमारे ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

या प्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली?

पीडित २३ वर्षीय तरुणीने फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ओमकार तातिया याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे पुढील तपास करीत आहेत.

भारतात सुरू होणार Apple चे सातवे अधिकृत रिटेल स्टोअर, कंपनीने केली या शहराची निवड

Alpana art: अल्पना आर्टचा वाढतोय ट्रेंड! जाणून घ्या बंगालच्या या पारंपरिक कलेचे महत्त्व आणि खास वैशिष्ट्ये

अमरावती विमानतळावरून रात्रीच्या विमानसेवेचा मार्ग अखेर मोकळा; आता केवळ अंतिम मंजुरीची प्रतीक्षा

Israel : इस्रायलमध्ये सत्तांतराची नांदी! आयझेनकोट आणि गोलान यांच्यात युती; अरब पक्ष 'रा'आम'ही सरकारमध्ये सामील होणार?

MSRTC: एसटी महामंडळाचा विद्यार्थ्यांसाठी नवा प्लॅन! आता शाळा-महाविद्यालयांच्या बस धावणार विनावाहक