- बनराकस आणि दामादजीसोबत केविन पीटरसनचा फोटो व्हायरल (फोटो सौजन्य-सोशल मिडिया) 
Entertainment

Kevin Pietersen: ‘पंचायत ५’मध्ये दिसणार इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू? केविन पीटरसनच्या BTS फोटोने चर्चेला उधाण

Kevin Pietersen: ‘पंचायत ५’च्या BTS फोटोत केविन पीटरसन बनराकस आणि दामादजीसोबत दिसला. ३ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या मालिकेत तो झळकणार का?

अमृता यादव

Kevin Pietersen: ‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या पाचव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नवीन सीझन प्रदर्शित होण्यापूर्वीच मालिकेतील काही BTS फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधले आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन ‘पंचायत’च्या कलाकारांसोबत दिसत असल्याने तो आगामी सीझनमध्ये झळकणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

बनराकस आणि दामादजीसोबत केविन पीटरसनचा फोटो व्हायरल

केविन पीटरसनने नुकताच सोशल मीडियावर एक पडद्यामागील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो पारंपरिक भारतीय ग्रामीण वेशभूषेत दिसत आहे. त्याच्यासोबत मालिकेतील भूषण म्हणजेच बनराकसची भूमिका साकारणारा दुर्गेश कुमार आणि जावईजीच्या भूमिकेतील आसिफ खानही दिसत आहेत.

या फोटोमध्ये पीटरसनने कुर्त्यावर निळ्या रंगाचे नेहरू जॅकेट आणि डोक्याभोवती चौकडीचा स्कार्फ परिधान केला आहे. त्याचा हा गावठी अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे. विशेष म्हणजे, त्याने या फोटोला केवळ ‘पंचायत’ असे कॅप्शन दिले आहे.

केविन पीटरसन ‘पंचायत ५’मध्ये दिसणार का?

केविन पीटरसनचा हा फोटो समोर आल्यानंतर तो मालिकेच्या आगामी सीझनमध्ये दिसणार का, याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट्समधून आपला उत्साह व्यक्त केला आहे. एका चाहत्याने पीटरसन फोटोतील इतर दोघांपेक्षाही अधिक देसी दिसत असल्याची प्रतिक्रिया दिली. तर काहींनी त्याला ‘पंचायत’मध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

मात्र, या फोटोवरून पीटरसन मालिकेत भूमिका साकारणार असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा फोटो आगामी सीझनच्या प्रमोशनचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.

३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘पंचायत ५’

‘पंचायत’च्या पाचव्या सीझनमध्ये नीना गुप्ता, रघुबीर यादव, सुनीता राजवार, फैसल मलिक, चंदन रॉय, दुर्गेश कुमार आणि आसिफ खान यांसारखे कलाकार पुन्हा पाहायला मिळणार आहेत. हा नवीन सीझन ३ डिसेंबर २०२६ रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, २० नोव्हेंबर रोजी केविन पीटरसनने ‘एक्स’वर एक विनोदी पोस्ट शेअर करत आपल्या बॉलिवूड पदार्पणाबाबत भाष्य केले होते. त्यावेळी अनेक चाहत्यांनी त्याची पोस्ट विनोद म्हणून घेतली होती. मात्र, आता ‘पंचायत’च्या कलाकारांसोबतचा फोटो समोर आल्याने त्याच्या त्या पोस्टची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे केविन पीटरसनचा ‘पंचायत ५’शी नेमका काय संबंध आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

PoK Unrest: पाकिस्तानला आता घरातूनच मोठा हादरा! बलुचिस्ताननंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेटला वणवा; 'जानबाज फोर्स'ने फुंकले युद्धाचे रणशिंग

Lifestyle tips: मूड खराब असेल तर वापरा 'Dopamine Menu' ची ट्रिक! रोजच्या छोट्या अ‍ॅक्टिव्हिटीमुळे राहाल आनंदी

Narendra Modi : 'मन की बात'च्या 140 व्या भागाची देशभर चर्चा; भाजप नेत्यांकडून मोदींच्या उपक्रमाचे कौतुक

Russia Ukraine War : युक्रेनवरील रशियन ड्रोन हल्ल्यात 10 जण ठार; मॉस्कोने 1,246 युक्रेनियन ड्रोन पाडल्याचा दावा

Gold Price Outlook : सोनं 1 लाखांच्या खाली येणार? एक्सपर्टनी थेट सांगितलं; पुढील 6 महिन्यांत 'या' रेंजमध्ये राहणार भाव