रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करणाऱ्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १,००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी चाहत्यांसाठी एक मोठी बातमी दिली आहे. ‘रामायण’वर आधारित GTA स्टाइल गेम तयार करण्याची त्यांची योजना असून, या गेममध्ये खेळाडूंना जटायूसोबत उडण्याची आणि रावणाशी लढण्याची संधी मिळणार आहे.
नमित मल्होत्रा यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत या गेमबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “आम्ही GTA स्टाइल गेमही आणत आहोत. मात्र, योग्य वेळ आल्यावर त्याबद्दल अधिक तपशील सांगेन. हा गेम रामायणावर आधारित असेल. प्रत्येक मुलाने GTA खेळल्याप्रमाणे रामायणाचाही गेम खेळावा, अशी माझी इच्छा आहे. हा गेम खेळताना मुलांना मनोरंजनासोबतच काहीतरी शिकायलाही मिळावे.”
या गेमची संकल्पना स्पष्ट करताना नमित मल्होत्रा पुढे म्हणाले की, प्रेक्षकांना चित्रपटातील विश्वाचा आनंद घेता यावा, यासाठी त्यांना या जगाचा विस्तार करायचा आहे. खेळाडूंना जटायूसोबत आकाशात उडता येईल आणि रावणाशी लढताही येईल. या गोष्टी गेममध्ये दाखवण्यात येणार असून, सध्या गेमच्या निर्मितीचे काम सुरू आहे. याबाबत योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केवळ गेमपुरतीच नमित मल्होत्रा यांची योजना मर्यादित नाही. ‘रामायण’च्या जगाचा विस्तार करण्यासाठी थीम पार्क, संग्रहालय आणि ॲनिमेशनसारखे विविध प्रकल्प उभारण्याचाही त्यांचा विचार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवलेले रामायणाचे विश्व वेगवेगळ्या स्वरूपांत अनुभवता येणार आहे.
‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी
दरम्यान, ‘रामायण’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरूच आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, प्रदर्शनाच्या २३ व्या दिवशी चित्रपटाने देशभरातील ६,५८४ शोमधून ८.४५ कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये हिंदी आवृत्तीचा वाटा ४,९७६ शोमधून ५ कोटी रुपये, तर कन्नड आवृत्तीने ३२७ शोमधून १.२५ कोटी रुपये कमावले. मल्याळम आवृत्तीने ५१६ शोमधून १ कोटी रुपयांची कमाई केली. तेलुगू आवृत्तीची कमाईही चित्रपटाच्या एकूण कलेक्शनमध्ये जमा झाली आहे.
या आकडेवारीनुसार, ‘रामायण: भाग १’ची भारतातील निव्वळ कमाई १,०००.५५ कोटी रुपयांवर पोहोचली असून, देशांतर्गत एकूण कमाई १,१९५.१० कोटी रुपये झाल्याचे सांगितले जात आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय सनी देओलने हनुमानाची, तर रवी दुबेने लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाला ए. आर. रहमान आणि हान्स झिमर यांचे संगीत लाभले आहे. प्राइम फोकस स्टुडिओज आणि मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या सहयोगाने हा भव्य प्रकल्प साकारण्यात आला आहे.