Sai Pallavi No Makeup Look: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्द अभिनेत्री साई पल्लवी सध्या तिच्या 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात ती सीतेची भूमिका साकारत आहे. मात्र, या भूमिकेतील तिच्या लूकवरून सोशल मीडियावर अनेकांनी टीका केली होती. तसेच चित्रपटात सीतेला राक्षसांशी लढताना दाखवल्यामुळेही वाद निर्माण झाला होता. आता या सर्व चर्चांवर साई पल्लवीने पहिल्यांदाच आपले मत व्यक्त केले आहे. अभिनेत्रीने टीकेला उत्तर देतानाच सीतेची भूमिका साकारल्यानंतर स्वतःमध्ये झालेले बदल आणि आशयपूर्ण भूमिका निवडण्याबाबतही भाष्य केले आहे.
‘वी द विमेन’ या कार्यक्रमात संवाद साधताना साई पल्लवीने ‘रामायण’ चित्रपटाविषयी मनमोकळेपणाने चर्चा केली. सीतेच्या भूमिकेसाठी तिची निवड आणि पडद्यावरील तिच्या लूकवरून सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चांबाबत तिला विचारण्यात आले. यावर उत्तर देताना ती म्हणाली, “सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चांबद्दल, जसे की सीतामाता किती सुंदर दिसल्या पाहिजेत, वगैरे गोष्टींबद्दल मी अनभिज्ञ नाही. पण जर त्यामुळे तुमचा आत्मविश्वास डगमगत असेल, तर मला वाटतं की दोष तुमच्यातच आहे. तुम्हाला स्वतःला अधिक कणखर बनवण्याची गरज आहे.”
ती पुढे म्हणाली, “मला वाटतं की मी कोणाही इतकीच आत्मविश्वासू आहे आणि मतं ही मतंच असतात. त्यामुळे, जर तुम्हाला लहानपणी कधी न्यूनगंड वाटला असेल, तर तुम्हाला फक्त हे सुनिश्चित करण्याची गरज आहे की तुम्ही आतून कणखर आहात. त्यानंतर तुम्ही उर्वरित जगाचा सामना करू शकता किंवा टीकेकडे दुर्लक्ष करू शकता.”
‘सीतेची भूमिका साकारल्यानंतर माझ्यात बदल झाले’
सीतेची भूमिका साकारल्यानंतर तिच्या आयुष्यात काय बदल झाले, असा प्रश्नही साई पल्लवीला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, “माझे आयुष्य नेहमीच एका चित्रपटातून दुसऱ्या चित्रपटात जाण्याचा प्रवास राहिले आहे. यामुळे तुमच्यात काही प्रमाणात बदल होतोच, कारण तुम्ही त्या पात्राचा एक अंश स्वतःसोबत घेऊन जाता. माझ्यातही काही बदल झाले आहेत, पण ते सर्व खूप वैयक्तिक आहेत. मला वाटत नाही की जगाला ते समजतील किंवा त्याबद्दल जाणून घेण्याची गरज असेल. ही काही मोठी गोष्ट नाही.”
केवळ ग्लॅमरस भूमिकांना साई पल्लवीचा नकार
यावेळी साई पल्लवीने तिला कोणत्या प्रकारच्या भूमिका साकारायला आवडणार नाहीत, याबद्दलही सांगितले. केवळ ग्लॅमरस दिसण्यापुरत्या मर्यादित असलेल्या भूमिका स्वीकारण्यास ती फारशी उत्सुक नसल्याचे तिने स्पष्ट केले. ती म्हणाली, “जर एखादी भूमिका केवळ ग्लॅमरसाठी वापरली जाणार असेल किंवा असे पात्र असेल ज्याला सहज बदलता येईल, तर मला ती भूमिका साकारायला आवडणार नाही. मी नेहमी अशा भूमिकांच्या शोधात असते ज्यात काहीतरी आशय असतो.”
ती पुढे म्हणाली, “कालांतराने, जेव्हा तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहता आणि काही गोष्टी करण्यास नकार देता, तेव्हा तुमची भूमिकाच खूप काही सांगून जाते. यानंतर तुम्हाला आशयपूर्ण भूमिका मिळू लागतात.”
दरम्यान, नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणारा महाकाव्यावर आधारित चित्रपट आहे. पहिल्या भागात रणबीर कपूर प्रभू राम, साई पल्लवी सीता, रवी दुबे लक्ष्मण आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील कलाकारांचे लूक आणि भूमिकांबाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता आहे.
साई पल्लवी अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या कोणत्याही मेकअपशिवायही सहज वावरताना दिसतात. चित्रपटाच्या सेटवर असो किंवा मुलाखतीदरम्यान, ती अनेकदा नो-मेकअप लूकमध्ये दिसते. मल्याळम चित्रपट ‘प्रेमम’मधून पदार्पण केल्यापासूनच तिने कमीत कमी मेकअप करण्याला प्राधान्य दिले आहे. बरखा दत्त यांच्याशी संवाद साधताना तिने आपल्या नो-मेकअप लूकबद्दलही भाष्य केले.
ती म्हणाली, “गेल्या १० वर्षांपासून प्रत्येकजण हा मुद्दा उपस्थित करत आहे. खरं सांगायचं तर, करिअरच्या सुरुवातीला मीही असुरक्षित होते. पण कालांतराने तुम्हाला जाणवतं की खरे प्रेक्षक आणि कलाकार यांच्यात एक वेगळंच नातं असतं. कारण मला वाटतं की प्रेक्षकांना पडद्यावर काहीतरी वास्तविक पाहायला आवडतं. मी अशाच भूमिका निवडल्या आहेत, ज्यामध्ये खऱ्या परिस्थितीत जगणाऱ्या सामान्य महिलांचं चित्रण आहे.”