एमएमआर प्रदेशातील लोकसंख्या आज झपाट्याने वाढत आहे. देशात सर्वाधिक नागरीकरण होत असलेला हा प्रदेश आहे. त्यामुळे स्वाभाविकच येथील वाहतुकीवर ताण आहे. रेल्वेच्या विस्ताराला मर्यादा आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर सर्व भार आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या उपनगरांतून लाखो लोक रोज ठाणे व मुंबईच्या दिशेला नोकरी-धंद्यानिमित्त जातात. त्यांच्यासाठी जलवाहतूक हा अत्यंत किफायतशीर, सुलभ आणि प्रभावी पर्याय ठरणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे यांचा केंद्राकडे त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहेच. परंतु, नितीनजी यांनी महाराष्ट्राच्या वतीने केंद्राकडे या प्रकल्पासाठी पुढाकार घ्यावा.
देशाचे रस्ते व महामार्ग निर्माण मंत्री नितीन गडकरी यांना आज संपूर्ण देश एक अत्यंत धडाडीचे, कार्यक्षम आणि कल्पक मंत्री म्हणून ओळखतो. पण महाराष्ट्राला त्यांची ही ओळख नवीन नाही. नितीनजींच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली आज देशभरात महामार्ग आणि द्रुतगती मार्गांचे जाळे विणले जात आहे. देशभरात त्यांचे कौतुक होत आहे. आणि ते योग्यही आहे. २०१४ मध्ये नितीनजी यांनी या खात्याची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी रस्ते बांधकामाचा वेग कमालीचा मंदावला होता. जमीन अधिग्रहणाच्या अडचणी असतील, पर्यावरणविषयक मंजुऱ्या असतील, बँकांकडून होणारा अर्थपुरवठा असेल, अशा विविध कारणांमुळे नवीन रस्त्यांची कामे अत्यंत कूर्मगतीने होत होती. देशात दिवसाला सरासरी अवघे तीन ते सात किमी इतक्याच वेगाने नवे रस्ते निर्माण होत होते. रस्त्यांची कामे रखडल्यामुळे या कंपन्यांना बँकांनी दिलेली कर्जे मोठ्या प्रमाणावर बुडीत खाती निघण्याची (एनपीए) भीती होती. त्यामुळे नवीन कामांना अर्थपुरवठा करण्यास बँका तयार नव्हत्या. परिणामी रस्त्यांची कामे करणाऱ्या कंपन्यांची अवस्थाही बिकट बनली होती.
चांगले, दर्जेदार रस्ते ही सक्षम अर्थव्यवस्थेची मूलभूत गरज आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे या संदर्भातील एक विधान खूप प्रसिद्ध आहे. ते म्हणाले होते, ‘अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत आहे म्हणून तिचे रस्ते चांगले आहेत, असे नाहीतर अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिकेची अर्थव्यवस्था सक्षम आहे.’ माझ्या माहितीप्रमाणे नितीनजी यांच्या कार्यालयातील टेबलवर हे विधान बोधचिन्हासारखे ठेवलेले आहे. पण ते नुसतेच ठेवलेले नाही, तर ते स्वतः त्याप्रमाणे अविरत कार्यरत असतात.
त्यामुळेच सन २०१४ मध्ये नितीनजींनी खात्याची सूत्रे हाती घेताच कामाचा धडाका लावला, रस्ते बांधकाम प्रकल्पांसमोरील अडचणी एक-एक करून दूर केल्या आणि रस्ते निर्मितीचा वेग वाढवला. परिणामी २०१४ पूर्वी दिवसाला सरासरी तीन ते सात किमीपर्यंत घुटमळणारा हा वेग आता ३० किमीच्या पुढे गेलाय. २०२०-२१ हे आर्थिक वर्ष कोरोनामुळे किती आव्हानात्मक गेले, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. देशव्यापी लॉकडाऊनमुळे अनेक महिने कामे बंद होती. संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प होती. बांधकाम क्षेत्रावरही याचा अर्थातच परिणाम झाला. अशा आव्हानात्मक परिस्थितीही गेल्या आर्थिक वर्षात देशभरात १२ हजारांहून अधिक किमीच्या महामार्गांची कामे पूर्णत्वास नेण्यात यश आले.
या यशाची अनेक कारणे आहेत आणि या यशातून दिसून येते ती नितीनजी यांची निर्णयक्षमता. रस्त्यांची कामे नेमकी कशामुळे रखडली आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी धडाडीने निर्णय घेतले. जमीन अधिग्रहण हा रस्त्यांच्या कामांसमोरील सर्वात मोठा अडथळा होता. अनेक रस्त्यांची कामे सुरू तर झाली होती, पण त्यासाठी लागणारी जमीन संपूर्णपणे सरकारच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या ताब्यात नव्हती. परिणामी कामे एका टप्प्यावर येऊन ठप्प होत किंवा रडतखडत सुरू असत. बँकांचा खूप मोठा निधी अशा अर्धवट अवस्थेतील कामांमध्ये अडकला होता. त्यांनीच गेल्या वर्षी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या खात्याची सूत्रे स्वीकारली तेव्हा जवळपास चार लाख कोटींचे ४०३ प्रकल्प रखडले होते. ही खूप मोठी रक्कम आहे आणि ही सर्व बुडीत खाती जाण्याची शक्यता होती. त्यामुळे बँकांना तर फटका बसला असताच, पण भविष्यातील रस्त्यांच्या कामांना निधी मिळण्यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले असते. त्यामुळे नितीनजी यांनी या सर्व समस्यांचा आढावा घेऊन काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले.
रखडलेली कामे सुरू करण्यासाठी बीओटीची पद्धत बदलून हायब्रिड अन्युईटी पद्धत आणली. केंद्र सरकारने स्वत: रस्ते प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक केली. त्यामुळे बँकांनाही विश्वास मिळाला. सगळ्यात महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय म्हणजे एखाद्या रस्ते प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या किमान ८० टक्के जमीन अधिग्रहीत होईपर्यंत त्या प्रकल्पाचे काम सुरू करायचे नाही. त्यामुळे जमिनीअभावी प्रकल्प रखडण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली. याचाच परिणाम म्हणून गेल्या आर्थिक वर्षात कोविडसारखी आव्हानात्मक परिस्थिती असतानाही नितीनजी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात एनएचएआयने १२ हजार किमीहून अधिक लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण केली. ही खूप मोठी कामगिरी आहे.
सध्या आपण सर्वच कोरोनाशी लढा देत आहोत. साधारण दीड महिन्यांपूर्वी कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. याचा स्वाभाविकपणे ऑक्सिजन पुरवठ्यावर ताण आला. राज्य सरकारने राज्यभरात अनेक ठिकाणी तातडीने ऑक्सिजन प्लांट्स उभारण्याचे काम सुरू केले. या काळात नितीनजी यांनीही देशपातळीवर ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पुढाकार घेतला. राज्याला ऑक्सिजनचे काही टँकर्स उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे, देशभरात जे ऑक्सिजन प्लांट्स उभारले जाणार आहेत, त्यांची नोडल एजन्सी म्हणून नितीनजी यांच्या अखत्यारीतल्या नॅशनल हायवे ऑथॉरिटीची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑक्सिजन प्लांटसाठी जागा मिळाल्यापासून पंधरा दिवसांत हा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट एनएचएआयला देण्यात आले आहे.
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात नौकानयन मंत्री म्हणून देखील त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांच्या नेतृत्वाखाली देशांतर्गत जलवाहतुकीला मोठी चालना मिळून गंगा, तसेच ब्रह्मपुत्रा नदीत अनेक जलमार्ग कार्यान्वित झाले. कल्याण ठाणे वसई या जलमार्गाला देखील त्यांनी मंजुरी दिली होती. तसेच, पहिल्या टप्प्यासाठी साडे सहाशे कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला होता. परंतु, काही कारणास्तव त्यांच्या मंत्रिपदाच्या कालावधीत या मार्गाचे काम सुरू होऊ शकले नाही. २०१९च्या निवडणुकीनंतर अन्य मंत्र्यांकडे या खात्याची जबाबदारी आली. परंतु, माझी नितीनजी यांना विनंती आहे की, त्यांनी केंद्र सरकारला सांगून या महत्त्वाच्या प्रकल्पाला आवश्यक असलेली मदत मिळवून द्यावी आणि निधी उपलब्ध करून द्यावा.
एमएमआर प्रदेशातील लोकसंख्या आज झपाट्याने वाढत आहे, देशात सर्वाधिक नागरिकरण होत असलेला हा प्रदेश आहे. त्यामुळे स्वाभाविकच येथील वाहतुकीवर ताण आहे. रेल्वेच्या विस्ताराला मर्यादा आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर सर्व भार आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या उपनगरांतून लाखो लोक रोज ठाणे व मुंबईच्या दिशेला नोकरीधंद्यानिमित्त जातात. त्यांच्यासाठी जलवाहतूक हा अत्यंत किफायतशीर, सुलभ आणि प्रभावी पर्याय ठरणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे यांचा केंद्राकडे त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहेच. परंतु, नितीनजी यांनी महाराष्ट्राच्या वतीने केंद्राकडे या प्रकल्पासाठी पुढाकार घ्यावा, अशी माझी विनंती आहे.
देशातील जनतेला त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय अलिकडे झाला असला तरी महाराष्ट्रातील जनता मात्र पूर्वीपासून परिचित आहे. १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार असताना आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान गडकरी यांनी यशस्वीपणे पेलले. त्याचप्रमाणे, मुंबईतील ५५ उड्डाणपूलही गडकरी यांची व्हिजन व त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात.
एमएसआरडीसीच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक महत्त्वाच्या रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्याने माझा गडकरी यांच्यासमवेत गेल्या सात वर्षांत अनेकदा संपर्क आला. त्यांचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे ठरले. देशहिताची जाण ठेवत पक्षीय भिंतींच्या पलिकडे जाऊन काम करण्याची त्यांची पद्धत अनुकरणीय आहे. अनेक नवीन कल्पना ते सातत्याने मांडत असतात. त्यांच्याकडून नेहमीच नवे शिकायला मिळते. नितीन गडकरी यांना वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा मन:पूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांचे मार्गदर्शन देशाला आणि राज्याला नेहमीच मिळत राहील, असा विश्वास व्यक्त करतो.
एकनाथ शिंदे, नगर विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य