ताज्या बातम्या

कोरोनाकाळातील राजकारण आणि नेत्यांची बदलत चाललेली मानसिकता

देशात कोरोनाचे संकट अधिकाधिक गहिरे होत चालले असताना, या काळातही अनेकांना राजकारण सुचत होते. खरे तर या संकटकाळात राजकीय नेत्यांनी संयम बाळगून सरकारच्या प्रयत्नांना बळ द्यायला हवे होते, परंतु तसे काही होताना दिसले नाही. याउलट राज्यातील विरोधकांनी अधिकाधिक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आणि सत्तेत असणारे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे किंबहुना महाविकास आघाडी सरकार कसे कचखाऊ आहे. कोरोनाचे संकट, कोरोनाची परिस्थिती या आघाडी सरकारला कशी हाताळता येत नाही, हे महाविकास आघाडी सरकार कसे अपयशी ठरत आहे, हे वारंवार दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच काहींनी आपले पूर्वीचे हिशोब चुकते करण्यातच धन्यता मानली. कोरोना संकटाच्या आडून सरकार हुकूमशाही राबवत आहे, असे विरोधकांनी म्हटले. तर, काही जणांना ही सार्वजनिक आरोग्यसेवेची वाताहत झाली, कोरोनाचे संकट म्हणजे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारचं अपयश आहे, असा दिंडोरा विरोधकांनी पिटला.

Amrut Sutar

देशात जेव्हापासून कोरोनाने शिरकाव केला, तेव्हापासून देशातील राजकारणातील दिशा आणि दशा बदलल्याचे आणि राजकारणाचा दर्जा खालावल्याचा आपण पाहिले. राजकारण या शब्दाला खूप व्यापक अर्थ आहे. अर्थकारण, धर्मकारण, समाजकारण, युद्धनीती, दंडनीती आणि न्याय अशा अनेक बाबींनी मिळून, राजकारणाची व्याख्या अनेकांनी केली आहे. देशात कोरोनाचे संकट अधिकाधिक गहिरे होत चालले असताना, या काळातही अनेकांना राजकारण सुचत होते. खरे तर या संकटकाळात राजकीय नेत्यांनी संयम बाळगून सरकारच्या प्रयत्नांना बळ द्यायला हवे होते, परंतु तसे काही होताना दिसले नाही. याउलट राज्यातील विरोधकांनी अधिकाधिक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आणि सत्तेत असणारे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे किंबहुना महाविकास आघाडी सरकार कसे कचखाऊ आहे. कोरोनाचे संकट, कोरोनाची परिस्थिती या आघाडी सरकारला कशी हाताळता येत नाही, हे महाविकास आघाडी सरकार कसे अपयशी ठरत आहे, हे वारंवार दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच काहींनी आपले पूर्वीचे हिशोब चुकते करण्यातच धन्यता मानली. कोरोना संकटाच्या आडून सरकार हुकूमशाही राबवत आहे, असे विरोधकांनी म्हटले. तर, काही जणांना ही सार्वजनिक आरोग्यसेवेची वाताहत झाली, कोरोनाचे संकट म्हणजे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारचं अपयश आहे, असा दिंडोरा विरोधकांनी पिटला.

कोरोना विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीचा उपाय म्हणून, देशभरात २३ मार्चपासून टाळेबंदी करण्यात आली. ही कृती योग्य होती की, अयोग्य हा स्वतंत्र विषय आहे. पण यामुळे अनेक राज्यात आणि शहरात स्थलांतरित मजूर देशभर अडकून पडले होते. कित्येक लोक चालत पायी आपल्या राज्यात पोचले, कित्येक जणांचे या काळात उपासमारीने  मृत्यूही झाले. फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी सर्व प्रकारचे म्हणजे २४ तास प्रयत्न करणारे राजकीय पक्ष,  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संपूर्ण देशात अतिशय बिकट स्थिती असताना, मात्र जवळपास महिनाभर गायब होते. याचे कारण नंतर असे समजले की, ते बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराचे गुप्त आणि सुक्ष्म नियोजन करत होते. पुढे त्यांनी बिहारमधील गावोगावी जेव्हा टीव्हींचे वाटप करून, एक प्रसारीत प्रचार सभा घेतली, त्यावरून हे सिद्धही झाले. स्थलांतरित मजुरांच्या संख्येत बिहारी लोकांची संख्या प्रचंड होती, मात्र त्यांना इतर सोयी सुविधा देण्यापेक्षा, टीव्ही देऊन त्यावर पंतप्रधान मोदीजींचे भाषण ऐकायला लावले, हे सुद्धा देशातील नागरिकांनी कोरोना काळात अनुभवले.

पश्चिम बंगालमधील निवडणुका देशाच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या ठरला. देशातील सत्ताधारी भाजपाने प्रचंड अशी ताकद पश्चिम बंगालच्या निवडणुकीत लावली होती, दस्तुरखुद पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा लाखोंच्या प्रचार सभा घेत, येथे जोर लावला होता. मागील दिड दोन वर्षात कोरोनाच्या महामारीत विविध क्षेत्रावर परिणाम झाला, अनेकांच्या रोजगार गेले, कित्येकांचे आर्थिकचक्र मंदावल्याने आत्महत्या केली. रोजगार नसल्याने खायचे काय? आणि जगायचे कसे? ही भ्रांत असल्यामुळं लोकांनी कंटाळून टोकाची भूमिका घेत आपली जीवनयात्रा संपवली. कोरोनाचे संकटात मजुरांचे स्थालंतर, प्रवासाची समस्या, रेमडिसिव्हिर, ऑक्सिजन, लसीकरण इत्यादी प्रश्न ‘आ’ वासून उभा असताना, केंद्रीतील आणि राज्यातील राजकीय नेते, मंत्री मात्र कोरोनाचे राजकारण करण्यात मश्गुल होते. मागील दिड दोन वर्षात या जागतिक महामारीत काय-काय घडले? कोरोनाच्या आधीचे राजकारण, कोरोना काळातील राजकारण, आणि कोरोनानंतर आता आपण कोरोनाच्या सर्व परिस्थितीवर, संकटावर ‘सीमोल्लंघन’ करत आहोत, आणि हळूहळू राजकीय क्षेत्रातील सार्वजनिक कार्यक्रम, निवडणुका इत्यादी खुले होत आहे. त्यामुळे आता मागील दिड दोन वर्षात कोरोना काळात काय-काय घडले याचा आपण वेध घेणार आहोत.

कोरोना पूर्वीचे राजकारण

जानेवारी २०२० मध्ये भारतात कोरोनाचा विषाणू आढळून येत, केरळात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्याआधी चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत अशी महिती समोर येत होती. त्याआधी भारतात मे २०१९ मध्ये लोकसभेच्या आणि ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. देशात भाजपाने दुसऱ्यांदा बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. तर महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांनी युती करत, एकत्र निवडणूक लढवली होती. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरल्यामुळं आणि भाजपानं त्यांची मागणी मान्य न केल्यामुळं शिवसेनेनं भाजपाशी फारकत घेत, अनपेक्षितपणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना बरोबर घेत सरकार स्थापन केले. आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन नुकतेच तीन-चार महिने होत नाही, तोच कोरोनाचे संकट आले. आणि संपूर्ण देशात २३ मार्च २०२० पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र कोरोना आधी राज्यात पाच वर्ष सत्तेत असणारे शिवसेना-भाजप पुन्हा सरकार स्थापन करतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र असं न होता ज्या शिवेसेनेच्या जन्म काँग्रेसमुळं झाला, किंवा ज्या शिवसेनेनं आयुष्यभर काँग्रेसला शिव्या देत विरोधक मानला, ज्यांची पूर्णत: विचारधारा वेगळी आहे, त्याच काँग्रेसबरोबर मांडीला मांडी लावून सत्ता स्थापन केली. याचा आश्र्चयांचा धक्का सर्वांनाच बसला. आणि  महाराष्ट्राने एक आगळा-वेगळा राजकीय मंचावरी नाट्यप्रयोग पाहिला. तसेच राजकीय नेते ‘सत्तेसाठी काहीही’ करु शकतात, सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे सुद्धा अख्या महाराष्ट्राने पाहिले. कोरोना आधी सर्वं निवडणुका, सार्वजनिक कार्यक्रम, अधिवेशन राजकीय कार्यक्रम हे सुरळीतपणे पार पडत होते, मात्र कोरोनानंतर या सर्वांना आडकाठी येत, यांच्यावर बंधने आली.

कोरोना काळातील राजकारण

कोरोनाकाळात बरेच राजकारण बदलल्याचे आपण पाहिले. तसेच राजकारणाच दर्जा सुद्धा घसरल्याचे आपण पाहिले. कोरोनाकाळात केद्रात असो किंवा राज्यात विरोधकांनी बरीच टिका सत्ताधाऱ्यांवर करत, सत्ताधारी पक्षांना अधिकाधिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याच कालावधीत कोण मंत्री काम करत आहे, आणि कोण मंत्री काम करत नाहीय, हे सुद्धा जनतेला कळत होते.  याच दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे दररोज माध्यमांसमोर येत कोरोनारुग्णांची, रुग्णालयाची, राज्यातील सद्य कोरोनाची परिस्थिती याबाबत माहिती देते होते, त्यामुळं राजेश टोपे हे लोकांच्या लक्षात राहिले. कोरोनाकाळात निवडणुका, सार्वजनिक कार्यक्रम रोखण्यात आले होते, अधिवेशन मर्यादित दिवसापुरते घेण्यात आले होते. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राजकीय कार्यक्रम, नगरपालिकांच्या निवडणुका, महानगरपालिका, नगरपंचाय़त, जिल्हापरिषद, पोटनिवडणुका, सार्वजनिक कार्यक्रम यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, त्यामुळं अनेक ठिकणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

हे सर्व होत असताना, सर्वंच पक्षातील नेते, मंत्री कोरोनाचे राजकारण करण्यात मग्न होते, कोरोनाचे संकट अधिकाधिक गहिरे होत चालले असताना, या काळातही अनेकांना राजकारण सुचत होते. खरे तर या संकटकाळात राजकीय नेत्यांनी संयम बाळगून सरकारच्या प्रयत्नांना बळ द्यायला हवे होते, परंतु तसे काही होताना दिसले नाही. याउलट राज्यातील विरोधकांनी अधिकाधिक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. हेच चित्र देशपातळीवर सुद्धा दिसले. मध्य प्रदेशमध्ये ऐन कोरोनाच्या साथीच्या काळात, मध्य प्रदेशच्या आरोग्य मंत्री, राज्यातील आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर सोडून बंगळुरू येथे जाऊन राहिले. आणि पुढे तिथे सरकार कोसळून तिथे नवीन सरकार स्थापन झाले. यात राजकीय दोष कोणाचा हा भाग वेगळा परंतु ऐन कोरोनाच्या साथीच्या काळात अनेक लोकं  मृत्यमुखी पडत असताना, राजकीय महत्वकांक्षा या प्राधान्याच्या विषय ठरल्या. राजस्थानातही असाच प्रकार घडला.

कोरोना काळातील पश्चिम बंगालमधील निवडणुका ह्या देशाच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या आणि प्रभावी ठरल्या. कोरोनाचे नियम, सोशल डिंन्सस्टिंग, सॅनेटाझर, आदी गोष्टींचे पालन करायचे असं सरकार सांगत असताना, दुसरीकडे पश्चिम बंगालमधील निवडणुकीत प्रचारसभांना मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने, तिथे टिका करण्यात आली. देशातील सत्ताधारी भाजपाने प्रचंड अशी ताकद पश्चिम बंगालच्या निवडणुकीत लावली होती, दस्तुरखुद पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सर्व दिग्जांनी लाखोंच्या प्रचार सभा घेत, पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजपाची सत्ता आणायची अशी भीष्मप्रतिज्ञा केल्याच्या अविर्भावात वावरत होते, तसे भाजपाने वातावरणनिर्मिती केली होती. हि सर्व गर्दीची परिस्थिती पाहून, मग स्वाभाविकपणे सामान्यांना प्रश्न पडला होता की, कोरोना फक्त सामान्यांनाच होतो? राजकारणी गर्दी करतात, त्यांना कोण का जाब विचारत नाही, गर्दीच्या ठिकाणी राजकारण्यांना कोरोना होत नाही का? असा संताप त्यावेळी जनतेनं करत राजकारण्यांवर रोष व्यक्त केला होता. याच दरम्यान पंढरापुरात पोटनिवडणुका झाल्या होत्या, त्याठिकाणी सुद्धा मोठी गर्दी करण्यात आली होती, त्यावर सुद्धा सरकारच्या कोरोना नियमांवर लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळं कोरोना काळातील हे सर्व खालच्या दर्जांचे पाहून, राजकारणीही संवेदनशील असतात, परंतू अशा महामारीत मदत करण्याचे सोडून या राजकीय नेत्यांना त्यांचे भांडवल, राजकारण करण्याचे कसे काय सुचते? हा एक अनुत्तरीत प्रश्न होता आणि आहे.

दरम्यान ‘कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे. आता हे परमेश्वरी कार्य म्हणूनच शुद्ध मनाने काम केले तरच, परिस्थिती आटोक्यात आणता येणे शक्य आहे. यासाठी एखाद्या शिस्त लावणाऱ्या कडक उपाययोजना करण्याची गरज आहे,’ अशी साद आदर्शगाव हिवरेबाजारचे उपसरपंच पोपटराव पवार यांनी सरकार आणि विरोधकांना घातली होती. पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांना एक पत्र लिहून त्याद्वारे ही साद घातली होती. समाजाला जागविण्याच्या दृष्टीने इतर सर्व क्षेत्रातील ऑक्सिजन पुरवठा बंद करून फक्त दवाखान्यांसाठी ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करावा, अन्यथा अतिशय भयानक असे चित्र आपल्यासमोर असेल,’ अशा परिस्थितीतही सध्या पक्षीय राजकारण आणि आरोपप्रात्यारोप बंद कारावेत, व सर्वांनी एकजूटीने कोरोनाच्या संकटावर मात करुया, असे पोपटराव पवार यांनी म्हटले होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव हे एक वैश्विक संकट आहे. कोरोनामुळे भारतातही बिकट सामाजिक आणि आर्थिक प्रश्न उभे राहिले होते. सर्वत्र भीतीचे वातावरण, अनिश्चितता आणि संभ्रमांमुळे राजकीय नेतृत्वाचा कस लागला होता, यावेळी देशपातळीवर पंतप्रधान मोदींनी लोकांचा, कोरोना योद्धांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहान देण्यासाठी ‘थाळ्या-टाळ्या वाजवणे’, दिवा लावणे इत्यादी लोकांकडून करवून घेतले होते, आरोग्यसेवक, पोलीस व इतर सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा सकारात्मकतेच्या शोधात अनेकांनी हे कोरोनाकाळात केले होते.

तर दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी ‘लाइव्ह’ संवाद साधत होते. राज्यातील जी कोरोनाची परिस्थिती आहे, ती खरी-खरी स्थिती लोकांसमोर मांडत होते. त्यातून त्यांना लोकांकडून सहानुभूती मिळाल्याचे आपण पाहिले. मुख्यमंत्री संवाद थेट व मुद्देसूद साधत होते,  मुख्यमंत्र्यांची भाषा मवाळ, सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यातून दिलासा व विश्वास देण्याचे काम महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. त्यामुळं राजकीय आणि वैचारिक विरोधकांकडूनही त्यांच्या कामाचे सातत्याने कौतुक होताना दिसले. कोरोना महासाथीमुळे महाराष्ट्राची परिस्थिती इतर राज्यांच्या तुलनेने काहीशी चिंताजनक होती, राज्य सरकारवर प्रचंड ताण होता, अशात राज्याचे उद्धव ठाकरे हे एक खंबीर आणि आश्वासक नेते म्हणून यशस्वीपणे पुढे आल्याचे आपण पाहिले.

या महामारीच्या संकटात मदत व मूलभूत सेवा लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम हे राज्यांवरच अवलंबून असते. यावेळी राज्य खंबीर असल्याचे दिसले. मात्र विरोधकांनी खासकरुन भाजपच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टिका करण्याची एकही संधी सोडली नाही. सत्ताधाऱी कसे काय अडचणीत सापडतील याची विरोधक संधी शोधत होते. याच काळात तबलीगी जमात मरकज प्रकरणाने कोरोना प्रादुर्भावाचे सांप्रदायिकीकरण झाले. बातम्यांचा सूर असा की जणू भारतातील कोरोना प्रादुर्भावास केवळ मुस्लीमच दोषी आहेत की काय, असे वाटावे. व्हॉटसॅप व फेसबुक या समाजमाध्यमांमध्ये अनेक व्हिडिओ फिरत होते. मुख्य प्रवाहातील टीव्ही माध्यमांनी फारशी पडताळणी न करता याच बातम्या चालवल्या. कोरोनाशी दोन हात करताना अफवांचा आणखी एक व्हायरस समोर आला होता.

दरम्यान याच कालावधीत इतर प्रांतातून आलेल्या कामगारांना निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्याची हमी दिली गेली. मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर भागात परप्रांतीय मजुरांची व विद्यार्थ्यांची संख्या कुठल्याही इतर राज्यांपेक्षा जास्तच होती. अशा मंडळींची उपासमार होऊ नये म्हणून शिवभोजन योजनेचा विस्तार तालुका स्तरावर करण्यात आला होता, यासाठी महाराष्ट्र शासनाने १६० कोटी रुपयांची तरतूद देखील केली होती. आरोग्यसेवा, औषधे, किराणामाल, भाज्या व इतर अत्यावश्यक सेवांवर परिणाम होऊन लोकांची गैरसोय होणार नाही याची राज्य सरकारने काळजी घेतली होती. कोरोनाकळात देशात महाराष्ट्र हे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण मुंबईत होते. एकूणच सधन व प्रगतिशील राज्यांना कोरोनाचा अधिक फटका बसला होता. आणखी एक याठीकाणी आवर्जून उल्लेख करावा असं म्हणजे, देशपातळीवर कोरोनाची आपत्ती देशावर कोसळली, तेव्हापासून भाजपचे राज्यांमध्ये सत्ता मिळवण्याचे आक्रमक प्रयत्न दिसले. राजकारणी मतभेद, पक्षभेद विसरुन, एकोपाने कोरोनावर मात करतील अशी भाबडी आशा बाळगत होते, मात्र राजकारण्यांनी सामान्यांच्या आशा, अपेक्षांना छेद देत कोरोनाकाळात अगदी हीन दर्जांचे राजकारण केल्याचा इतिहास सांगतो.

कोरोनानंतरचे राजकारण

देशात आता बऱ्यापैकी कोरोनावर आपण मात केली आहे, त्यामुळं कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळं देशपातळीवर आणि राज्य पातळीवर अनेक कोरोनाच्या नियमात, निर्बंधात सुट देण्यात आली आहे, आता हळूहळू सकारात्मक बदल होताना दिसत आहे, त्यामुळं कोरोनाच्या संकटावर, महामारीवर आपण ‘सीमोल्लंघन’ करत आहोत, राज्यातील सर्वंच क्षेत्र सामान्यांसाठी खुली होत आहेत. कला, क्रीडा, चित्रपट, रंगभूमी, शिक्षण, मंदिर, अर्थकारण, विज्ञान, राजकारण आदी खुले होत असताना, आपण आरोग्याची काळजी घेत ‘सीमोल्लंघन’ केलं पाहिजे. जेव्हापासून देशात लॉकडाऊन लागला, तेव्हापासून राजकीय क्षेत्रातील अनेक घडामोंडी ठप्प झाल्या होत्या.

कोरोनाकाळात निवडणुका, सार्वजनिक कार्यक्रम रोखण्यात आले होते, अधिवेशन मर्यादित दिवसापुरते घेण्यात आले होते. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राजकीय कार्यक्रम, नगरपालिकांच्या निवडणुका, महानगरपालिका, नगरपंचाय़त, जिल्हापरिषद, पोटनिवडणुका, सार्वजनिक कार्यक्रम यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, त्यामुळं अनेक ठिकणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. याच दरम्यान शिवसेना दसरा मेळावा, आरएसएसचा दसरा मेळावा, इत्यादी राजकीय कार्यक्रमांवर बंदी आली होती. परंतू आता सर्व हळूहळू सकारात्मक खुले झाले आहे, ‘सीमोल्लंघन’ झाल्यामुळं आता राजकीय कार्यक्रम, निवडणुका, प्रचारसभा, अधिवेशन, सार्वजनिक कार्यक्रम, शिवसेनेचा दसरा मेळावा, आरएसएसचा दसरा मेळावा इत्यादी होतील. आणि यात राजकारण सुद्धा होताना बघायला मिळेल. आजकालचे राजकीय नेते आपण सतत प्रसार माध्यमात राहावे, आपले अस्तित्व चोवीस तास सामाजिक आणि राजकीय पटलावर असावे, म्हणून चोवीस तास राजकारण करत असतात. आगामी काळात मुंबई महानगर पालिकेची महत्त्वपूर्ण निवडणूक होत आहे, तसेच अनेक निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यामुळं या सर्वांची जय्यत तयारीसाठी नेते कामाला लागतील. आता कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळं लसीकरण, रेमीडिसिव्हीर, ऑक्सिजन, आदीवर नेत्यांना राजकारण करण्यास मिळणार नाही एवढे मात्र नक्की.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू