- भाऊबीजेच्या दिवशी कुठल्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे, असे शास्त्रात सांगितले आहे.
- एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत आहे.
- यमद्वितीयेला यमराज आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला जातो. त्यामुळे या दिवशी नरकात खितपत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो. त्यामुळे भाऊबीजेला वेगळे महत्व आहे.
- यमीचे पृथ्वीवरचे रूप म्हणजे यमुना नदी. भाऊबीजेच्या दिवशी यमुना नदीत स्नान करणाऱ्याला अपमृत्यू येत नाही, तसेच मोक्षप्राप्ती होते, असे मानले जाते.
- अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीयेस मृत्यूची देवता यमधर्म याचे पूजन केले जाते. तसेच त्याच्या चौदा नावांनी तर्पण करण्यास सांगितले आहे..अपमृत्यू निवारणार्थ `श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ।` असा संकल्प करून तर्पण करावयाचे.
काय कराल? कसे कराल?
- भाऊबीजला बंधूना पूर्वेकडे तोंड करून पाटावर बसवावे. पाटाभोवती रांगोळी काढलेली असावी. तसेच समोर दीप तेवता असावा.
- बहिणीने बंधूंच्या कपाळी टिळा लावून त्याना ओवाळावे.
- त्यानंतर बहिणीने भावाच्या हातावर लाल-पिवळा धागा बांधावा.
- त्यानंतर गोड पदार्थ भावाला खाऊ घालावा.
- भावाने बहिणीला चरणस्पर्श करुन तिचा आशीर्वाद घ्यावा आणि तिला भेटवस्तू द्यावी.