- पनीर हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे.
- तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही पनीरपासून अनेक पदार्थ तयार करु शकता.
- आज आपण पनीर यखनीची रेसिपी जाणून घेणार आहोत.
पनीरचे अनेक पदार्थ तुम्ही खाल्ले असतील पण तुम्ही कधी यखनी पनीर रेसिपी ट्राय केली आहे का? कश्मीरी स्वादाची खास ओळख असलेली यखनी पनीर ही एक सौम्य, सुगंधी आणि अतिशय स्वादिष्ट डिश आहे. दह्याच्या ग्रेव्हीमध्ये तयार होणारी ही रेसिपी मसाल्यांचा अतिरेक न करता हलक्या चवीतही अप्रतिम लागते.
पनीरचे मऊ तुकडे, बडीशेप आणि सुंठ पावडरचा खास फ्लेवर यामुळे या पदार्थाला वेगळीच चव मिळते. जेवणात काहीतरी रॉयल आणि वेगळं बनवायचं असेल तर यखनी पनीर हा उत्तम पर्याय ठरतो. ही डिश नान, जीरा राईस किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते. घरी पाहुणे येत असतील किंवा खास प्रसंग असल्यास त्यावेळी तुम्ही ही रेसिपी करुन पाहू शकता. चला रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
- 250 ग्रॅम पनीर
- 1 कप घट्ट दही
- 2 टेबलस्पून तेल किंवा तूप
- 1 तमालपत्र
- 1 दालचिनी तुकडा
- 2 हिरव्या वेलदोड्या
- 1 टीस्पून बडीशेप पावडर
- 1/2 टीस्पून सुंठ पावडर
- 1/2 टीस्पून हळद
- चवीनुसार मीठ
- 1 कप पाणी
- थोडी कोथिंबीर सजावटीसाठी
- सर्वप्रथम पनीरचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून बाजूला ठेवा.
- एका भांड्यात दही व्यवस्थित फेटून त्यात बडीशेप पावडर, सुंठ पावडर आणि हळद मिसळा.
- कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात तमालपत्र, दालचिनी आणि वेलदोडे परता.
- आता तयार दह्याचे मिश्रण मंद आचेवर घाला आणि सतत हलवत शिजवा, जेणेकरून दही फाटणार नाही.
- मिश्रणाला हलकी उकळी आल्यावर त्यात पाणी आणि मीठ घालून ग्रेव्ही थोडी घट्ट होईपर्यंत शिजवा.
- त्यानंतर पनीरचे तुकडे घालून 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या, त्यामुळे मसाल्याचा स्वाद पनीरमध्ये मुरेल.
- शेवटी कोथिंबीर घालून गरमागरम यखनी पनीर नान किंवा भातासोबत सर्व्ह करा.