बारामतीत 'अजितदादामय' उत्साह; मॅरेथॉन मार्गावर दादांच्या गाजलेल्या विधानांचे फलक  
महाराष्ट्र

Baramati News: बारामतीत 'अजितदादामय' उत्साह; मॅरेथॉन मार्गावर दादांच्या गाजलेल्या विधानांचे फलक

‘NECC आणि व्हेंकोब चिकन प्रस्तुत बारामती पॉवर मॅरेथॉन २०२६’ चे आयोजन रविवारी (२९ नोव्हेंबर २०२६) बारामती शहरात करण्यात आले असून, यंदाची स्पर्धा लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांना समर्पित करण्यात आली आहे.

anuradha sagar
  • रविवारी २९ नोव्हेंबरला आयोजन आणि अजित पवारांना समर्पण

  • २५ फुटी प्रतिमा आणि दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

  • गाजलेल्या विधानांचे फलक आणि ‘मिस यू दादा’ व्हिडिओ

Baramati News : धावण्याचा उत्साह, आरोग्याचा संदेश आणि हजारो धावपटूंचा सहभाग अशा उत्साही वातावरणात सुरू असलेल्या ‘NECC आणि व्हेंकोब चिकन प्रस्तुत बारामती पॉवर मॅरेथॉन २०२६’ ला यंदा भावनिक किनार लाभली आहे. लोकनेते अजितदादा पवार यांना समर्पित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनच्या माध्यमातून संपूर्ण बारामतीत ‘अजितदादामय’ वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या आठवणींनी नागरिक गहिवरून जात आहेत. रविवारी (दि २९) नोव्हेंबर रोजी बारामती शहरात या पॉवर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

मॅरेथॉन मार्गावर अजितदादांची जनमानसात लोकप्रिय असलेली गाजलेली विधाने आणि विचार आकर्षक फलकांद्वारे मांडण्यात आले आहेत. धावपटूंसह नागरिकांचेही हे फलक लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची, कामाचा झपाटा आणि जनतेशी असलेल्या थेट संवादाची आठवण या माध्यमातून पुन्हा जागवली जात आहे.

मॅरेथॉनचे मुख्य केंद्र असलेल्या रेल्वे स्टेशन ग्राउंडवरही विशेष सजावट करण्यात आली आहे. अजितदादांची हात जोडलेली २५ फुटी भव्य प्रतिमा, सेल्फी पॉईंट आणि त्यांच्या जीवनप्रवासातील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन हे प्रमुख आकर्षण ठरत आहे. प्रदर्शनातील छायाचित्रे पाहताना अनेक नागरिक जुन्या आठवणींमध्ये रमून जात आहेत.

‘मिस यू दादा’ या संकल्पनेवर आधारित व्हिडिओलाही सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. अजितदादांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे विकासकामांतील योगदान आणि बारामतीशी असलेले जिव्हाळ्याचे नाते या व्हिडिओतून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.

मॅरेथॉनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जगताप म्हणाले, “अजितदादांचे बारामतीशी असलेले नाते आणि शहराच्या विकासातील योगदान प्रत्येकाच्या मनात कायम आहे. त्यांच्या आठवणी जिवंत ठेवण्याच्या भावनेतून मॅरेथॉनमध्ये हे विशेष उपक्रम राबवले आहेत. हा केवळ ब्रँडिंगचा भाग नसून त्यांच्याप्रती असलेल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे.”

बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश ननवरे म्हणाले, “अजितदादांनी विकासाबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही नेहमी प्रोत्साहन दिले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना मॅरेथॉनच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचे विचार आणि कार्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

एकीकडे हजारो धावपटूंच्या सहभागातून आरोग्याचा जागर सुरू असताना दुसरीकडे अजितदादांच्या आठवणींनी भारावलेले बारामतीकर असे भावनिक चित्र यंदाच्या मॅरेथॉनमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही स्पर्धा केवळ क्रीडा महोत्सव न राहता अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करणारा भावनिक सोहळा ठरत आहे.

Bank FD : नोकरीशिवाय दरमहा हवीय मोठी कमाई? 50 लाखांच्या FD वर 7% व्याजाने किती मिळेल उत्पन्न? पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Asia Cup rising Stars: बांग्लादेशला लोळवलं, आता श्रीलंकेचं आव्हान! पाकिस्तानची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; ट्रॉफीसाठी रंगणार महामुकाबला

Jalgaon Municipal Corporation: जमीन आरक्षणातून कोटींचा घोटाळा! नगरसेवक अरविंद देशमुखः मक्तेदारासोबत संगनमताचा केला आरोप

Divyanka Bedi Wedding: बॉलिवूडच्या दिग्गज खलनायकाच्या घरी लगीनघाई! रंजीत यांची मुलगी दिव्यांका अडकली विवाहबंधनात

Space War : चीनच्या मदतीने पाकिस्तान अंतराळात वाढवत आहे लष्करी ताकद; CDS जनरल सुब्रमणी यांचा गंभीर इशारा, मांडली 'ती' 3 मोठी आव्हाने