Koregaon Nagar Panchayat Election फोटो सौजन्य सोशल मिडिया  Koregaon Nagar Panchayat Election फोटो सौजन्य सोशल मिडिया
महाराष्ट्र

Koregaon Nagar Panchayat Election : राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव नगरपंचायतीवर भगवा फडकविणार; शंभूराज देसाईंचा निर्धार

कोरेगाव नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रशांत ऊर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सर्व १७ प्रभागांत उमेदवार उभे करणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नगरपंचायतीवर भगवा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला. चौथाई येथे झालेल्या कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

sanman jadhav
  • सर्व १७ प्रभागांत शिवसेनेचे उमेदवार

  • राजाभाऊ बर्गे यांना दिलेला शब्द पाळणार

  • चौथाई परिसर भगवेमय; फटाक्यांची आतषबाजी

Koregaon Nagar Panchayat Election : सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले आणि जनतेच्या हिताची काळजी घेणारे कोरेगावचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रशांत ऊर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या पाठीशी शिवसेना आणि पालकमंत्री म्हणून आपण सख्या भावाप्रमाणे ठामपणे उभे राहणार आहोत. राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

शिवसेना नेते तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी चौथाई येथील श्री भैरवनाथ मंदिरासमोर मान्यवरांचा जाहीर सत्कार आणि पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, तर अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

सर्व १७ प्रभागांत शिवसेनेचे उमेदवार

आगामी कोरेगाव नगरपंचायत निवडणूक राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार आहे. नगरपंचायतीच्या सर्व १७ प्रभागांत शिवसेनेचे उमेदवार उभे करून सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर नगरपंचायतीवर भगवा फडकविण्याचा निर्धार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

शहरात शिवसेनेची मजबूत संघटनात्मक बांधणी करण्यासाठी वॉर्डनिहाय कार्यकर्त्यांची फळी उभारण्यात येणार आहे. महिला संघटन, युवक संघटन आणि शिवसैनिकांची एकजूट मजबूत करून आगामी निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

राजाभाऊ बर्गे यांना दिलेला शब्द पाळणार

राजाभाऊ बर्गे यांच्या शिवसेना प्रवेशाचा मोठा कार्यक्रम साताऱ्यातील गांधी मैदानावर झाला होता. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. राजाभाऊ बर्गे यांना दिलेला शब्द आजपर्यंत पाळला असून, पुढील काळातही तो कायम पाळणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

कोरेगाव शहरासाठी १०० टक्के नव्हे, तर ८० ते ९० टक्के विकासकामे प्राधान्याने मंजूर केली आहेत. आगामी काळात शहराबरोबरच ग्रामीण भागातील विकासकामांसाठीही निधीची तरतूद करण्यात येईल. कोणत्याही कार्यकर्त्यावर अथवा शिवसैनिकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शिवसेनेच्या सातारा जिल्हा संपर्कप्रमुखपदी शरद कणसे यांची फेरनिवड झाल्याबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी एकसळ येथील महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सचिन शेलार, शिवथर येथील आकाश साबळे, कोरेगावचे माजी नगरसेवक दीपक फडतरे, भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी गणेश भोसले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीला नवी दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

शिवसेनेकडून मिळालेल्या सहकार्यामुळे संघटनात्मक कामाला बळ मिळाले आहे. मात्र, शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना असून, हा अन्याय थांबविण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली. ग्रामीण भागातील विकासकामांसाठीही निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, हणमंतराव जगदाळे आणि शरद कणसे यांनीही मनोगत व्यक्त केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल आणि राजाभाऊ बर्गे यांनी सुचविलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

चौथाई परिसर भगवेमय; फटाक्यांची आतषबाजी

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या आगमनानिमित्त चौथाई परिसरात जोरदार तयारी करण्यात आली होती. परिसरात भगवे ध्वज लावण्यात आले होते. पालकमंत्र्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी ग्रामदैवत श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांचे दर्शन घेतले.

शिंग-तुताऱ्यांचा निनाद, हलगी पथकांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पैलवान सचिन शेलार आणि आकाश साबळे यांनी समर्थकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन करत कार्यक्रमस्थळी प्रवेश केला.

कार्यक्रमाचे नियोजन लोकनियुक्त नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी केले होते. विजय जगताप यांनी प्रास्ताविक केले, तर संतोष नलावडे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. बाळासाहेब साळुंखे यांनी कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. माजी नगरसेवक मुन्नाभाई काझी यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला शिवसेना नेते तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, पश्चिम महाराष्ट्र शिवसेना संपर्कप्रमुख हणमंतराव जगदाळे, जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, युवा सेना जिल्हाप्रमुख संभाजी पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रेश्मा ताई जगताप, विद्याताई बर्गे, उद्योजक दयानंद भोसले यांच्यासह शिवसैनिक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Satara News : वाईत चेलाराम बेल एअर हॉस्पिटलच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; हृदयरोग, मधुमेहाच्या तपासण्या

Satara News : साताऱ्यातील ऐतिहासिक तलावात प्लास्टिकचा खच; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त, रोगराईचा धोका

USA News : पिझ्झा हटचे सह-संस्थापक डॅन कार्नी यांचे निधन; वयाच्या ९५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Wai: चिखलीच्या आंबेडकर नगरला पाणीप्रश्नातून दिलासा; दहा लाखांच्या कामांचे भूमिपूजन, रोहित वाडकरांच्या प्रयत्नांना यश

Nepal Viral Video: बायबल, येशू ख्रिस्त आणि जागतिक अर्थव्यवस्था! पशुपतिनाथ मंदिरातील साधूचा व्हिडिओ व्हायरल