Raigad News: माणगावच्या राजकारणात जनहित हरवले? राजकीय वर्चस्वाच्या लढाईत विकास रखडल्याची चर्चा, नागरिकांनी व्यक्त केली नाराजी  
रायगड

Raigad News: माणगावच्या राजकारणात जनहित हरवले? राजकीय वर्चस्वाच्या लढाईत विकास रखडल्याची चर्चा, नागरिकांनी व्यक्त केली नाराजी

माणगाव शहराचे राजकारण सध्या चर्चेत आहे. जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी वैयक्तिक स्वार्थ, सत्तेची गणिते यांना अधिक महत्त्व दिले जात असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हर्षदा जाधव
  • माणगावच्या राजकारणात विकासापेक्षा स्वार्थ आणि सत्तेच्या गणितांना महत्त्व

  • माणगावकरांच्या समस्या कधी सुटणार?

  • निवडणुकीची आश्वासने नकोत, विकासकामे दाखवा! माणगावकरांची लोकप्रतिनिधींकडे मागणी

माणगाव: रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र आणि मुंबई-गोवा हायवेवरील प्रमुख ठिकाण असलेल्या माणगाव शहराचे राजकारण सध्या कोणत्या दिशेने चालले आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे. जनतेच्या समस्या सोडविणे, सर्वांगीण विकास साधणे आणि मूलभूत सुविधा देणे हा राजकारणाचा मुख्य उद्देश असायला हवा; मात्र सद्यस्थिती पाहता जनहितापेक्षा वैयक्तिक स्वार्थ, सत्तेची गणिते, आर्थिक हितसंबंध आणि राजकीय वर्चस्व यांनाच अधिक महत्त्व दिले जात आहे का? अशी चर्चा शहरात सुरू आहे.

विकासासाठी एकत्र येण्याऐवजी कोण कोणाच्या जवळ आहे? कोणाची ताकद वाढणार? आणि कोणाचे अस्तित्व धोक्यात येणार? याभोवतीच राजकीय चर्चा फिरताना दिसते. सोयीच्या युती, बदलत्या भूमिका आणि आरोप-प्रत्यारोपांच्या खेळात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. रेल्वे स्थानक, बाजारपेठ, शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि ग्रामीण भागाशी जोडलेले केंद्र असूनही माणगावकरांना विविध नागरी समस्यांचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. (फोटो सौजन्य – AI Created)

राजकारण हे जनसेवेचे माध्यम आहे, स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजण्याचे साधन नाही. सत्ता कोणाचीही असो; पण माणगावचा विकास खुंटला तर त्याची किंमत सामान्य जनतेलाच मोजावी लागणार आहे.- संतोष दोषी, स्थानिक नागरिक, माणगाव नगरपंचायत

जनतेच्या भावनांचा वापर स्वार्थासाठी किती दिवस?

रस्ते रुंदीकरण, वाहतूक नियोजन, आधुनिक बाजारपेठ, आरोग्य सुविधा, क्रीडांगणे, उद्याने, पाणीपुरवठा योजना व ड्रेनेज व्यवस्था यांसारख्या कामांसाठी निधी आणणे, मंजूर प्रकल्पांचा पाठपुरावा करणे आणि रखडलेल्या कामांना गती देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी मानली जाते. मात्र, प्रकल्पाचे श्रेय कोणाला मिळणार? आणि कोणत्या गटाचा प्रभाव वाढणार? यालाच अधिक प्राधान्य दिले जात असल्याची भावना आहे. केवळ उद्घाटन वा भूमिपूजन म्हणजे विकास नसून काम पूर्ण होऊन त्याचा लाभ नागरिकांना मिळणे महत्त्वाचे असल्याचे मानले जाते. निवडणुकीपुरत्या आश्वासनानंतर प्रश्नांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा होत नसल्याबद्दलही नाराजी असून, मतदार हे केवळ सभा-मोर्चासाठीचे साधन नसल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

समस्या, गरजा व अपेक्षा

नागरी समस्याः अंतर्गत रस्ते, वाहतूक कोंडी, अपुरी पार्किंग, पाणी साचणे, नालेसफाई, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, पाणीपुरवठा, सांडपाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा व पादचारी मार्ग.

प्रशासकीय व विकास अपेक्षाः दीर्घकालीन विकास आराखडा, निधीचा पाठपुरावा, रखडलेल्या प्रकल्पांची पूर्तता आणि सर्वपक्षीय बैठकीतून प्राधान्यक्रम निश्चिती.

जनतेची मागणीः आश्वासनाऐवजी निधी, पूर्ण कामे, रखडलेले प्रकल्प व तक्रार निवारणाचा पारदर्शक हिशोब.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Phulwara Movie: लावणीच्या परंपरेला मानाचा मुजरा! ‘फुलवरा’च्या नायिकांनी हुतात्मा स्मारकाला दिली मानवंदना

भारतीय ऑटो पार्ट्स कंपन्या चीनपेक्षा सरस! एथर एनर्जीचे तरुण मेहता यांचे मोठे विधान

Syed Mushtaq Ali Trophy : सौराष्ट्रच्या पराभवाने पंजाबला सुपर लीगचं तिकीट; त्रिपुरा, यूपी आणि गुजरातचे विजयासह आव्हान संपुष्टात

पुणे कोर्ट हल्ल्यामागील धक्कादायक ट्विस्ट! पहिलं टार्गेट होतं..., पण किवळे बाहेर येताच बदलला प्लॅन.

Climate Change : मुसळधार पाऊस पडूनही नद्या आणि तलाव का पडत आहेत कोरडे ? जगभरातील नद्यांचा प्रवाह 5.7 टक्क्यांनी घटला