आईचा राग सहन झाला नाही
चिमुरड्याने थेट लोकल पकडली
१० तासांनी खडवलीत सुखरूप सापडला रोशन
Kalyan News: आईने रागावल्याचा राग मनात धरून अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरड्याने घर सोडल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. रोशन वर्मा असे या सहा वर्षीय मुलाचे नाव असून घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने थेट रेल्वे स्थानक गाठले आणि लोकल ट्रेन पकडून खडवलीपर्यंत प्रवास केला. मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. तब्बल १० तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांना रोशनचा शोध घेण्यात यश आले. सुदैवाने रोशन सुखरूप आढळला.(Kalyan News)
मिळालेल्या माहितीनुसार, रोशन वर्मा हा आपल्या आईसोबत एका नामांकित हॉटेलमध्ये गेला होता. रोशनची आई या हॉटेलमध्ये काम करते. हॉटेलच्या किचनमध्ये जाऊन रोशन मस्ती करत होता. त्यामुळे आईने त्याला रागावले. आईने रागावल्याचा राग मनात धरून रोशन घरातून निघून गेला.
घरातून बाहेर पडल्यानंतर रोशन थेट रेल्वे स्थानकावर पोहोचला. विशेष म्हणजे अवघ्या सहा वर्षांच्या या चिमुरड्याने एकट्याने लोकल ट्रेन पकडली आणि खडवली रेल्वे स्थानक गाठले. दरम्यान, रोशन घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा शोध सुरू झाला. मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलरामसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम सुरू करण्यात आली. पोलीस अधिकारी विकास मडके आणि अमित पवार यांच्या पथकाने रोशनचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर तब्बल १० तासांच्या शोधमोहिमेनंतर पोलिसांना रोशन वर्माचा शोध घेण्यात यश आले. रोशन सुखरूप सापडल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.
या घटनेमुळे रेल्वे प्रवासातील लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवघ्या सहा वर्षांचा मुलगा एकटाच रेल्वे स्थानकावर पोहोचतो, लोकल ट्रेनमध्ये चढतो आणि खडवलीपर्यंत प्रवास करतो, मात्र या संपूर्ण प्रवासादरम्यान त्याच्याकडे कोणाचेही लक्ष कसे गेले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रवासादरम्यान कोणत्याही प्रवाशाने त्याची विचारपूस केली नाही का? रेल्वे स्थानकावर किंवा लोकलमध्ये त्याला मदत करण्यासाठी कोणी पुढे आले नाही का? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. सुदैवाने पोलिसांच्या प्रयत्नांमुळे रोशन दहा तासांनंतर सुखरूप सापडला. मात्र, लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांसह रेल्वे प्रशासनानेही अधिक सतर्क राहण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.