पुण्यात राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात
१० वर्षांनंतर पुण्यात प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन
देशभरातील ७५०० हजारांहून अधिक नेमबाजांचा सहभाग
Shooting: पुण्यात ६९ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेतील (एनएससीसी) रायफल प्रकारातील स्पर्धांना आजपासून सुरुवात झाली. येत्या २३ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्ताने तब्बल १० वर्षांनंतर राष्ट्रीय स्तरावरील ही प्रतिष्ठेची स्पर्धा पुन्हा एकदा पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेच्या (एनआरएआय) वतीने बालेवाडी-म्हाळुंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील नेमबाजी केंद्रावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त दीपक सिंगला यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे महासचिव पवन कुमार सिंह उपस्थित होते.
या स्पर्धेत देशभरातील सुमारे ७५०० हजार नेमबाज सहभागी होणार असून, यामध्ये पुरुष, महिला आणि पॅरा नेमबाजांचा समावेश आहे. रायफल प्रकारातील विविध स्पर्धांमध्ये हे खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतील. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणारा स्वप्नील कुसळे, आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेता ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, विश्वविजेता रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, ऑलिम्पियन अंजुम मौदगिल, माजी जागतिक क्रमवारीतील अव्वल नेमबाज आणि दोन वेळची ऑलिम्पियन एलावेनिल वलारिवन तसेच लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवलेला निरज कुमार यांसारखे देशातील आघाडीचे नेमबाज या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाजांना सुवर्णपदक
महानगरपालिका नेमबाजी प्रशिक्षण केंद्रांसाठी ३१ लाखाचे साहित्य देणारभारतीय नेमबाजीच्या राष्ट्रीय स्पर्धा दिनदर्शिकेत या अजिंक्यपद स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. नव्या स्पर्धात्मक हंगामाची सुरुवात या स्पर्धेने होत असते. तसेच भारतीय नेमबाजी संघाच्या निवड प्रक्रियेसाठी महत्त्वाचे ठरणारे रँकिंग गुण मिळवण्याची संधीही या स्पर्धेतून नेमबाजांना मिळते. त्यामुळे राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बालेवाडी येथील नेमबाजी केंद्राचे मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण करण्यात आले आहे. येथे नव्या इलेक्ट्रॉनिक टार्गेट्सची उभारणी करण्यात आली असून, खेळाडूंना अधिक आधुनिक आणि अद्ययावत स्पर्धात्मक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने करण्यात आलेल्या या सुधारणांमुळे सहभागी खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे महासचिव पवन कुमार सिंह म्हणाले, “१० वर्षांनंतर रायफल राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन पुण्यात करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. महाराष्ट्र शासनाने आम्हाला उत्कृष्ट सहकार्य केले असून, नेमबाजी केंद्राच्या नूतनीकरणासाठी आणि आधुनिकीकरणासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या ठिकाणी नेमबाजांना अतिशय चांगला अनुभव मिळेल, असा मला विश्वास आहे. येथील हवामानही अनुकूल असून, सर्व सहभागी खेळाडूंसाठी ही स्पर्धा संस्मरणीय आणि यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा आहे.”
महानगरपालिका नेमबाजी प्रशिक्षण केंद्रांसाठी ३१ लाखाचे साहित्य देणार
महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य (आमदार) आणि स्वतः नेमबाज असलेले विक्रम काकडे यांनीही पुण्यात या स्पर्धेचे पुनरागमन झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “मी स्वतः नेमबाजीचा खेळाडू असल्याने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पुन्हा पुण्यात, विशेषतः बालेवाडीच्या याच नेमबाजी केंद्रावर होत असल्याचा आनंद आहे. माझ्या नेमबाजीच्या प्रवासाची सुरुवातही याच केंद्रावर झाली होती. खेळाडूंसाठी अशा स्पर्धांचे महत्त्व मला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे विधान परिषद सदस्य म्हणून या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेला सर्वतोपरी सहकार्य मिळेल, याची मी खात्री देतो. शासनाकडून आवश्यक असलेली मदत उपलब्ध करून देण्यासाठीही मी प्रयत्नशील राहीन.”
६९ वी राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे?
६९ वी राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा पुण्यातील बालेवाडी-म्हाळुंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील नेमबाजी केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे.
किती वर्षांनंतर राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे?
तब्बल १० वर्षांनंतर राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेचे पुण्यात पुन्हा आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.