Syed Mushtaq Ali Trophy : सौराष्ट्रच्या पराभवाने पंजाबला सुपर लीगचं तिकीट; त्रिपुरा, यूपी आणि गुजरातचे विजयासह आव्हान संपुष्टात  (फोटो सौजन्य : आयएएनएस)
Sports

Syed Mushtaq Ali Trophy : सौराष्ट्रच्या पराभवाने पंजाबला सुपर लीगचं तिकीट; त्रिपुरा, यूपी आणि गुजरातचे विजयासह आव्हान संपुष्टात

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मध्ये तामिळनाडूने सौराष्ट्रचा 36 धावांनी पराभव केला. या निकालामुळे पंजाबने सुपर लीगमध्ये प्रवेश केला. समीर रिझवीच्या शतकाच्या जोरावर उत्तर प्रदेशने विजय मिळवला, तर गुजरात आणि त्रिपुरानेही विजयी शेवट केला.

Rakesh Khedekar
  • तमिळनाडूने सौराष्ट्रचा 36 धावांनी केला पराभव

  • समीर रिझवीचं शतक; उत्तर प्रदेशचा दणदणीत विजय

  • गुजरात आणि त्रिपुरानेही विजयासह संपवली मोहीम

Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली करंडक 2026 स्पर्धेत सौराष्ट्रला तमिळनाडूकडून 36 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचा फायदा पंजाबला झाला असून, त्यांनी सुपर लीग फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि गुजरात या संघांनी स्पर्धेत जरी विजय मिळवला असला तरी त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

पंजाबने 152 धावांचं लक्ष्य अवघ्या 13.1 षटकांत पूर्ण केलं होतं. त्यामुळे एलिट गट 'ब'मध्ये गुण आणि नेट रनरेटच्या बाबतीत त्यांनी सौराष्ट्रला मागे टाकलं. मात्र, पंजाबचं सुपर लीगमधील स्थान निश्चित होण्यासाठी सौराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्यातील सामन्याच्या निकालाची प्रतीक्षा होती.

सनी संधूचा धमाका; सौराष्ट्रचा पराभव

तमिळनाडूने प्रथम फलंदाजी करताना 193 धावांची मजल मारली. सनी संधूने अवघ्या 17 चेंडूंत सहा षटकारांसह 44 धावांची तुफानी खेळी केली. आंद्रे सिद्धार्थ (38), बालसुब्रमण्यम सचिन (37) आणि आर. राजकुमार (36) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिलं. सौराष्ट्रकडून चेतन सकारियाने तीन विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरात सनी संधूने पहिल्याच षटकात विश्वराज जडेजा आणि हरवंश सिंह यांना बाद करत सौराष्ट्रला धक्के दिले. प्रेरक मांकड आणि हार्विक देसाई यांनी प्रतिहल्ला करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर नियमित अंतराने विकेट पडत राहिल्या. सौराष्ट्रची अवस्था 92 धावांवर नऊ विकेट अशी झाली होती.

अशा परिस्थितीत जयदेव उनाडकट आणि चेतन सकारिया यांनी शेवटच्या विकेटसाठी 49 चेंडूंत 62 धावांची भागीदारी केली. उनाडकटने 40 धावांची खेळी केली. टी-20 क्रिकेटमध्ये अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करताना केलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. मात्र, सौराष्ट्रचा संपूर्ण संघ 154 धावांत गारद झाला. संधूने चार विकेट घेतल्या.

विशेष म्हणजे, सौराष्ट्रने स्पर्धेतील पहिले चार सामने जिंकले होते. मात्र, त्यानंतर सलग तीन सामन्यांत मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

समीर रिझवीचं शतक; यूपीचा विजय

उत्तर प्रदेशने मिझोरामचा सहा विकेट्सनी पराभव केला. या सामन्यात समीर रिझवीने 46 चेंडूंत नाबाद 100 धावांची खेळी केली. 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशची अवस्था तीन षटकांत तीन बाद पाच अशी झाली होती. मात्र, रिझवी आणि प्रशांत वीर यांनी नाबाद 110 धावांची भागीदारी करत संघाला 16.4 षटकांत विजय मिळवून दिला. प्रशांतने नाबाद 27 धावा केल्या. यापूर्वी मिझोरामने मनेंद्र सिंहच्या 56 धावांच्या जोरावर 149 धावा केल्या होत्या. कुलदीप यादवने दोन विकेट घेतल्या.

गुजरात आणि त्रिपुराचाही विजय

गुजरातने गोव्यावर 32 धावांनी मात केली. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना पाच विकेट्सच्या मोबदल्यात 194 धावा केल्या. आशुतोष शर्माने अवघ्या 18 चेंडूंत नाबाद 48 धावा ठोकल्या. आर्य देसाईने 47, तर कर्णधार उर्विल पटेलने 18 चेंडूंत 38 धावा केल्या. प्रत्युत्तरात गोव्याला नऊ विकेट्स गमावत 162 धावाच करता आल्या. कर्णधार अभिनव तेजराणाने 58 धावांची खेळी केली.

दुसरीकडे, त्रिपुराने अटीतटीच्या सामन्यात आसामला पाच धावांनी पराभूत केलं. त्रिपुराने नऊ विकेट्स गमावत 170 धावा केल्या. मणिशंकर मुरासिंहने 28 चेंडूंत 47, तर अरिंदम बर्मनने 19 चेंडूंत 36 धावा केल्या. प्रत्युत्तरात आसामला सहा विकेट्स गमावत 165 धावांपर्यंतच मजल मारता आली.

सुपर लीगमध्ये आठ संघांमध्ये चुरस

लीग फेरी संपल्यानंतर बडोदा, राजस्थान, दिल्ली, आंध्र, केरळ, मुंबई, विदर्भ आणि पंजाब या आठ संघांनी सुपर लीगमध्ये प्रवेश केला आहे. या संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.

गट 1 : बडोदा, दिल्ली, केरळ आणि विदर्भ

गट 2 : राजस्थान, पंजाब, आंध्र आणि मुंबई

प्रत्येक संघ आपल्या गटातील अन्य तीन संघांविरुद्ध सामने खेळणार आहे. दोन्ही गटांतील अव्वल संघांमध्ये 6 डिसेंबर रोजी अंतिम सामना रंगणार आहे. सुपर लीगमध्ये संघांना मागील फेरीतील गुण किंवा विक्रमांचा फायदा मिळणार नाही. सर्व संघांना नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. गुण समान असल्यास निकाल नेट रनरेटच्या आधारे ठरवला जाईल.

पुणे कोर्ट हल्ल्यामागील धक्कादायक ट्विस्ट! पहिलं टार्गेट होतं..., पण किवळे बाहेर येताच बदलला प्लॅन.

Climate Change : मुसळधार पाऊस पडूनही नद्या आणि तलाव का पडत आहेत कोरडे ? जगभरातील नद्यांचा प्रवाह 5.7 टक्क्यांनी घटला

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये! आढावा बैठक घेत दिले 'हे' निर्देश, म्हणाल्या, "हे खपवून..."

IND vs NZ: एका खेळीत विक्रमांची रांगच पार! केन विल्यमसनला पछाडलं, कोहलीलाही टाकलं मागे; Tom Lathamची WTC मध्ये ऐतिहासिक कामगिरी

Delimitation and Women Reservation Bill: मोदी सरकारचा मोठा डाव यशस्वी; ठाकरे-पवारांनंतर काँग्रेसचे खासदारही भाजपच्या गळाला?