सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम एका नवीन पेड सब्सक्रिप्शनची चाचणी करत आहे. या नवीन अपडेटचे नाव इंस्टाग्राम प्लस असं असणार आहे. या नव्या अपडेटमध्ये इंस्टाग्राम स्टोरीजवर फोकस करणार आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी इंस्टाग्राम स्टोरीमध्ये काही नवीन फीचर्स जोडण्याची तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या अपडेटमध्ये स्टोरीचे ऑडियंस मॅनेज करणं, रीवॉच इनसाइट्स ट्रॅक करणं आणि इंस्टाग्राम स्टोरीचा कालावधी 24 तासांपेक्षा अधिक वाढवण्यासारख्या टूल्सचा समावेश आहे. नवीन अपडेट रिलीज करण्यात आल्यानंतर यूजर्सना स्टोरीचे दृषमानता आणि एंगेजमेंट वाढवण्याचा नवीन पर्याय मिळणार आहे. सध्या या नवीन फीचरची चाचणी सुरु करण्यात आली आहे. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, इंस्टाग्रामवर नवीन फीचर जोडण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत.
सोशल मीडिया सल्लागार मॅट नॅव्हारा यांनी थ्रेड्सवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, इंस्टाग्राम प्लस हे स्नॅपचॅट प्लससारखेच असणार आहे. यामध्ये यूजर्सना काही खास फीचर्स ऑफर केले जाणार आहेत. सध्या या नवीन इंस्टाग्राम अपडेटची चाचणी फिलीपींसमध्ये केली जात आहे. या नव्या अपडेटसाठी म्हणजेच इंस्टाग्राम प्लससाठी यूजर्सना दर महिना PHP 65 म्हणजेच सुमारे 100 रुपये खर्च करावे लागणार आहेत. एक स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये सब्सक्रिप्शन आपोआप रिन्यू होण्यापूर्वी एका महीन्याचे फ्री ट्रायल देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
शेअर करण्यात आलेल्या ईमेजबाबत विचार केला तर असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, इंस्टाग्राम प्लस मुख्य स्वरुपात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या स्टोरीजवर फोकस करणार आहे. यूजर्स त्यांच्या स्टोरीज वेगवेगळ्या लोकांच्या ग्रुपसोबत शेअर करू शकणार आहेत. तसेच यूजर्स लक्ष ठेऊ शकणार आहेत की, त्यांची स्टोरी किती वेळा पुन्हा - पुन्हा पाहिली आहे. तसेच स्टोरिज पाहणाऱ्यांच्या यादीतून यूजर्स कोणालाही सर्च करू शकणार आहेत. यानंतर यूजर्स पाहू शकतात की, एखाद्या यूजरने त्यांची स्टोरी किती वेळा पाहिली आहे. स्टोरी शेअर करण्यापूर्वी प्रीव्यू देखील पाहू शकता.
असा दावा केला जात आहे की, इंस्टाग्राम काही देशांमध्ये या नवीन अपडेटची चाचणी करत आहे. नवीन अपडेट वापरणारे सर्व यूजर्स स्टोरीसाठी ऑडियंसची अनलिमिटेड लिस्ट तयार करू शकणार आहेत. तसेच स्टोरी पाहण्याचा कालावधी 24 तासांपेक्षा जास्त वाढवला जाऊ शकतो. हे नवीन अपडेट अशा यूजर्ससाठी फायद्याचे ठरणार आहे, ज्यांना सतत उत्सुकता असते की त्यांची स्टोरी पुन्हा कोणी पाहिली आहे. आता इंस्टाग्राम या नव्या अपडेटबाबत अधिकृतपणे कधी घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.