पाकिस्तानमध्ये महाभयंकर स्फोट
निवासी भागांना आगीचा वेढा
गुदमरून झाला मृत्यू
Hattar Industrial Estate gas blast video 2026 : पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तुनख्वा प्रांतातील हरिपूर जिल्हा गुरुवारी सायंकाळी एका भीषण दुर्घटनेने हादरून गेला. हरिपूरमधील प्रसिद्ध हत्तर औद्योगिक वसाहतीत (Hattar Industrial Estate) गॅस पाईपलाईनचा अत्यंत शक्तिशाली स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांची संख्या मोठी असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू आला आणि आगीच्या ज्वाळांनी आकाशाला गवसणी घातली.
ही दुर्घटना गुरुवारी संध्याकाळी ६:३० च्या सुमारास ग्रँड ट्रंक रोडजवळ असलेल्या एका कारखान्याजवळ घडली. 'सुई नॉर्दर्न गॅस'ची १६ इंची मुख्य पुरवठा वाहिनी अचानक फुटली आणि भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर लागलेली आग इतकी वेगाने पसरली की तिने जवळच असलेल्या निवासी वसाहतींमधील ३ ते ४ घरांना आपल्या कचाट्यात घेतले. आगीचे लोळ पाहून लोकांची एकच पळापळ झाली. या घटनेचा एक थरारक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये आगीच्या ज्वाला निवासी भागांना वेढताना दिसत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Cameroon Tour: ‘हुकूमशहा जगाचा विनाश…’ पोप लिओ यांचा ट्रम्पवर विखारी हल्ला; अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचीही आगपाखड
स्थानिक आपत्कालीन सेवा 'रेस्क्यू ११२२' आणि उपायुक्त वसीम अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतांमध्ये ७ लहान मुले आणि एका महिलेचा समावेश आहे. मोबीन (७ वर्षे), अस्मा (१४ वर्षे), अलीना (१६ वर्षे), इक्बाल (७ वर्षे), शाहिदउल्ला (९ वर्षे), आरिफ (१५ वर्षे), अली रझा (१८ वर्षे) आणि अब्दुल्ला रेहमान अशी मृतांची नावे समोर आली आहेत. बहुतांश मृत्यू हे आगीमुळे नव्हे, तर धुरामुळे श्वास गुदमरून झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे.
credit - social media and Twitter
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल ३ तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. बचाव पथकाने ४ महिला आणि ६ मुलांना आगीच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर काढले आहे. जखमींना तातडीने हरिपूर जिल्हा मुख्यालय रुग्णालय आणि 'आरएचसी कोट नजीबुल्ला' येथे दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update : एक मत अन् ठरलं जगाचं भवितव्य! रिपब्लिकनचा डेमोक्रॅट्सवर प्रहार; इराण युद्धावरून अमेरिका दोन भागात विभागली
पाकिस्तानमध्ये औद्योगिक अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. हरिपूरचे उपायुक्त वसीम अहमद यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पाईपलाईनचा स्फोट तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी निष्काळजीपणामुळे, याचा तपास पोलीस करत आहेत. पाकिस्तानमधील गॅस पाईपलाईन्स जुन्या झाल्या असून त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण खैबर पख्तुनख्वा प्रांतात संतापाची लाट पसरली आहे.