पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

नितीश कुमार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली.

    बिहार : बिहारमध्ये (Bihar Politics) एका दिवसात एक सरकार पडून दुसरे सरकार स्थापित झाले आहे. दोन्ही सरकारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar)यांनी मुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतली आहे. बिहारचे तब्बल 9 वेळा मुख्यमंत्रीपद भुषवणारे नितीश कुमार यांनी एकाच दिवसात राजीनामा देण्याचा आणि पुन्हा त्याच दिवशी मुख्यमंत्री होण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. नितीश कुमार यांचा शपथविधी सोहळा (Nitish Kumar Oath ceremony) पार पडला. पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली.

    एनडीए च्या समर्थनाने नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर महाराष्ट्राप्रमाणे दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपचे नेते सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर नितीश कुमार मत व्यक्त करताना म्हणाले, “मी सुरुवातीपासून एनडीएबरोबर होतो. पण आम्ही आमचे मार्ग बदलले. परंतु, आता पुन्हा एकदा आम्ही एकत्र आलो असून यापुढेही एकत्रच राहणार आहोत. आम्ही बिहारच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. मी जिथं होतो तिथंच (NDA) परत आलो आहे. आता पुन्हा इथं-तिथं जाण्याचा प्रश्नच येत नाही” अशी थोडक्यात भूमिका नितीश कुमार यांनी व्यक्त केली.

    इंडिया आघाडीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असणारे नितीश कुमार यांनी अचानक भाजपाची कास धरली. यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे. पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून नितीश कुमार यांची चर्चा होती मात्र, आता त्यांनीच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.  ‘आज आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काही मंत्री लवकरच शपथ घेतील,’ अशी माहिती देखील नितीश कुमार यांनी दिली आहे.