फोटो सौजन्य: X.com/@BMW
येत्या 18 मार्च 2026 रोजी BMW त्यांची नवीन इलेक्ट्रिक कार BMW Neue Klasse i3 जागतिक स्तरावर सादर करण्याच्या तयारीत आहे. ही कंपनीच्या नवीन Neue Klasse सिरींजमधील दुसरी कार असून यापूर्वी या मालिकेतली BMW iX3 ही SUV सादर करण्यात आली होती. नवीन i3 ही प्रत्यक्षात BMW 3 Series या लोकप्रिय सेडानचे इलेक्ट्रिक व्हर्जन असेल. यापूर्वी i3 हे नाव एका छोट्या हॅचबॅक कारसाठी वापरले जात होते, मात्र ती कार 2022 मध्ये बंद करण्यात आली होती.
Autocar India च्या अहवालानुसार, या कारमध्ये सुमारे 108 kWh NMC बॅटरी पॅक देण्यात येण्याची शक्यता आहे, जो ड्युअल मोटर सेटअपसह येऊ शकतो. BMW iX3 मध्ये ही बॅटरी 569hp पॉवर आणि 645Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या दाव्यानुसार iX3 ची WLTP रेंज 805 किमी पर्यंत आहे. सेडान कारमध्ये SUV च्या तुलनेत एरोडायनामिक ड्रॅग कमी असल्यामुळे नवीन i3 एका चार्जमध्ये iX3 पेक्षा अधिक अंतर पार करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवीन i3 ही BMW च्या अत्याधुनिक बॅटरी आर्किटेक्चरवर आधारित आहे. या EV मध्ये 400kW पर्यंत DC फास्ट चार्जिंग आणि 22kW पर्यंत AC चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. याशिवाय या कारमध्ये BMW ची Heart of Joy कंट्रोल युनिट देण्यात येणार आहे, जी BMW Dynamic Performance Control सिस्टमसह काम करत ड्रायव्हिंगशी संबंधित सर्व प्रक्रिया मिलिसेकंदात नियंत्रित करते.
2023 मध्ये सादर करण्यात आलेल्या BMW Vision Neue Klasse कॉन्सेप्ट कारमधून या i3 च्या डिझाइनची झलक मिळाली होती. कारच्या पुढील भागात BMW ची सिग्नेचर किडनी ग्रिल असेल, जी आता LED लाइट्ससह आकर्षक दिसणार आहे. याशिवाय गेल्या वर्षी झालेल्या IAA Mobility Show मध्ये i3 चा प्री-प्रोडक्शन प्रोटोटाइपही सादर करण्यात आला होता.
या कारचे बॉडी पॅनेल कॉन्सेप्टच्या तुलनेत अधिक स्मूथ असतील आणि C-पिलरवरील BMW ची खास हॉफमिस्टर किंक डिझाइन कायम ठेवण्यात येणार आहे. मागील बाजूस Vision Neue Klasse प्रमाणे ट्रेपेजॉइडल टेल-लॅम्प मिळू शकतात.
या कारचे इंटीरियर साधे पण अत्याधुनिक असेल, ज्याची झलक BMW iX3 मध्येही पाहायला मिळते. यामध्ये एक खास पॅनोरामिक डिस्प्ले दिला जाईल जो कारच्या विंडस्क्रीनच्या संपूर्ण रुंदीपर्यंत पसरलेला असेल. मनोरंजन आणि वाहनाच्या सेटिंग्ससाठी 17.9 इंचाची मोठी टचस्क्रीन देण्यात येईल, जी BMW च्या नवीन OS X ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.
नवीन i3 च्या माध्यमातून BMW जागतिक EV सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा देण्याच्या तयारीत आहे. या कारची थेट स्पर्धा Audi A4 e‑tron,Tesla Model 3 आणि Mercedes‑Benz C‑Class EV यांसारख्या प्रीमियम इलेक्ट्रिक कार्सशी होण्याची शक्यता आहे.






