फोटो सौजन्य - Social Media
सिट्रोएन इंडियाने भारतीय बाजारपेठेत अपडेटेड ë-C3X इलेक्ट्रिक कार सादर केली असून, बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस (BaaS) पर्यायामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मालकी अधिक सुलभ आणि परवडणारी करण्याचा प्रयत्न केला आहे. या नव्या मॉडेलमुळे ग्राहकांना बॅटरीचा खर्च वेगळा भरता येणार असल्याने सुरुवातीची गुंतवणूक कमी होणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, BaaS पर्यायासह ë-C3X ची प्रारंभिक किंमत 6.89 लाख रुपयांपासून सुरू होते, तर नियमित एक्स-शोरूम किंमत 10.25 लाख रुपयांपासून आहे. बॅटरीसाठी प्रति किलोमीटर 2.26 रुपयांपासून EMI पर्याय उपलब्ध असून, देखभाल खर्चही केवळ 19 पैसे प्रति किलोमीटर इतका असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
स्टेलांटिस इंडियाचे ऑटोमोटिव्ह ब्रँड्सचे संचालक कुमार प्रियांश यांनी सांगितले की, ë-C3X ही केवळ नवीन इलेक्ट्रिक कार नसून भारतात EV मालकी अधिक सोपी आणि सुलभ बनवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. आरामदायी प्रवास, आकर्षक डिझाइन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम या वाहनात करण्यात आला आहे. नव्या ë-C3X मध्ये सिट्रोएनची प्रसिद्ध अॅडव्हान्स्ड कम्फर्ट सस्पेन्शन प्रणाली आणि आरामदायी सीट्स देण्यात आल्या आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामुळे ‘फ्लाइंग कार्पेट राईड’सारखा अनुभव मिळतो. इलेक्ट्रिक पॉवरट्रेनमुळे कमी आवाज आणि कंपनरहित ड्रायव्हिंगचा लाभही प्रवाशांना मिळतो.
डिझाइनच्या बाबतीत या कारमध्ये LED हेडलॅम्प्स, LED डे-टाइम रनिंग लाइट्स (DRLs), R15 डायमंड-कट अलॉय व्हील्स, इलेक्ट्रिक अॅडजस्ट आणि ऑटो-फोल्ड ORVMs, फ्रंट व रिअर स्किड प्लेट्स तसेच नवीन X-बॅजिंग देण्यात आले आहे. यामुळे कारला अधिक प्रीमियम आणि आधुनिक लूक मिळतो. केबिनमध्ये 10.25 इंचांची इन्फोटेनमेंट स्क्रीन, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, 7 इंच TFT डिजिटल क्लस्टर, ड्युअल-टोन लेदरेट सीट्स, इलेक्ट्रिक ब्लू इंटेरिअर थीम आणि LED इंटेरिअर लॅम्प्स यांचा समावेश आहे. याशिवाय वायरलेस चार्जर, इलेक्ट्रोक्रोमिक इनसाइड रिअर व्ह्यू मिरर आणि 40 हून अधिक रिमोट अॅक्सेस फीचर्ससह कनेक्टेड कार 2.0 तंत्रज्ञानही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने ë-C3X मध्ये सहा एअरबॅग्स, ABS सह EBD, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स, स्पीड-सेंसिटिव्ह ऑटो डोअर लॉक आणि विविध अॅडव्हान्स्ड ड्रायव्हिंग अलर्ट फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच फ्लोअर-माउंटेड बॅटरी आणि उच्च-शक्तीच्या स्टील स्ट्रक्चरमुळे वाहनाची स्थिरता आणि सुरक्षितता वाढवण्यात आली आहे. कारमध्ये 2450 मिमी व्हीलबेस, प्रशस्त केबिन आणि 315 लिटरची बूट स्पेस देण्यात आली असून, दैनंदिन वापरापासून ते लांबच्या प्रवासापर्यंत विविध गरजा लक्षात घेऊन तिची रचना करण्यात आली आहे. भारतीय हवामानाचा विचार करून तयार केलेली क्लायमेट कंट्रोल प्रणाली उष्ण वातावरणातही प्रभावी थंडावा देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे.
सिट्रोएन ë-C3X सह इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार वाढवण्यासाठी कंपनीने किफायतशीर मालकी, आधुनिक तंत्रज्ञान, आरामदायी प्रवास आणि सुरक्षितता यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. या गाडीची बुकिंग देशभरातील सिट्रोएन डीलरशिप्स तसेच कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली असून, भारतीय ग्राहकांसाठी ही एक आकर्षक इलेक्ट्रिक पर्याय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






