Skoda Kylaq ठरतेय भारतीयांची आवडती कार
Skoda Auto Volkswagen India Private Limited (SAVWIPL) ने Skoda Kylaq या सब-4 मीटर SUV च्या 50,000 युनिट्सचे उत्पादन एका वर्षात यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. हा टप्पा कंपनीच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमावरील ठाम वचनबद्धतेचे प्रतीक मानला जात आहे. 2025 मध्ये कंपनीने नोंदवलेल्या 36 टक्के वर्ष-दर-वर्ष वाढीत Kylaq चे योगदान महत्त्वाचे राहिले आहे.
या उपलब्धीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी Skoda Auto Volkswagen India चे अभिनंदन करत ‘मेड इन इंडिया’ उपक्रमाला दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.
SAVWIPL चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष अरोरा यांनी सांगितले की, Kylaq च्या 50,000 युनिट्स उत्पादनाचा टप्पा पार करणे हे ग्राहकांनी या वाहनावर दाखवलेल्या विश्वासाचे द्योतक आहे. MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आलेल्या Kylaq ला भारतासह जागतिक बाजारातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कायलाकच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने चाकण येथील उत्पादन प्रकल्पाची क्षमता 30 टक्क्यांनी वाढवली असून, लोकलायझेशनचा स्तर अधिक उंचावण्यासाठी स्थानिक पुरवठादारांसोबत सहकार्य वाढवले आहे. हा उपक्रम Skoda Auto Volkswagen समूहाच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाचा भाग आहे.
तयारी सुरू झाली! टेस्टिंगदरम्यान पहिल्यांदाच दिसली Hyundai Creta ची नवी जनरेशन
Skoda Kylaq ही SAVWIPL ची पहिली सब-4 मीटर SUV असून, ती भारतातील इंजिनिअरिंग, डिझाइन आणि उत्पादन क्षेत्रातील वाढत्या क्षमतांचे प्रतिबिंब मानली जाते. उत्पादन विस्तार, स्पर्धात्मक किंमत धोरण आणि दीर्घकालीन पुरवठा भागीदारीवर कंपनीचे धोरणात्मक लक्ष केंद्रित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.






