सौजन्य - नवराष्ट्र टीम
उपमुख्यमंत्री अजित पवार काही वेळातच बारामती विमानतळावर पोहोचणार होते. त्यामुळे अजित पवारांच्या विमानाची वाट बारामती शहरातील विविध पदाधिकाऱ्यांसह शासकीय अधिकारी व त्यांचे सुरक्षा रक्षक देखील पाहत थांबले होते. विमानतळापासून धावपट्टी संपते, त्या ठिकाणाच्या अगदी जवळून स्फोटाचा आवाज आला, आणि त्यानंतर विमानतळावरील सर्व यंत्रणेची पळापळ सुरू झाली, यामध्ये अजित दादांबरोबर नेहमी सावलीप्रमाणे बरोबर असणारे त्यांचे सुरक्षारक्षक इम्तियाज मोमीन हे देखील होते.
मोमीन घटनास्थळी पोहोचल्यानंतर, अजित पवार या अपघातात गेल्याचे कळाल्यानंतर , मोमीन अचानक खाली बसले. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनाही धक्का बसला. मोमीन यांच्यासह सर्वजण रडू लागले. दुपारी उशिरापर्यंत मोमीन, जळालेल्या विमानाच्या अवशेषाकडे बघून रडत होते. यावेळी माध्यमांनी त्यांना प्रतिक्रियेसाठी विचारणा देखील केली, मात्र ते प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नव्हते, मोमीन यांच्याबरोबर त्यांचे दुसरे अंगरक्षक सहकारी देखील होते, ते देखील भावनाविवश झाले होते.
हे सुद्धा वाचा : प्रशासनावर मजबूत पकड अन्…; अजित पवारांच्या निधनानंतर निलम गोऱ्हेंची प्रतिक्रीया
ताफ्यातील प्रत्येक जण हळहळला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रत्येक सभेच्या ठिकाणी बाजूला उभे असणारे मोमीन यांना अनेक जण ओळखतात. अजितदादा गेल्याच्या धक्क्यातून ते अजून देखील सावरले नसल्याचे आज दुसऱ्या दिवशी स्पष्ट झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील प्रत्येक जण हळहळत होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिलेले व सध्या बारामती एमआयडीसीच्या प्रमुख अधिकारी पदाची जबाबदारी असलेले हनुमंत पाटील हे देखील रडत होते.






