फोटो सौजन्य: Freepik
भारतीय कार बाजारामध्ये गेली अनेक दशकांपासून मारुती सुझुकी कंपनीचे वर्चस्व आहे. कंपनीच्या भारतीय ग्राहकांना लक्षात ठेऊन निर्मिती केलेल्या कार देशातील ग्राहकांच्या पसंतीस पडतात. मात्र आता या कार परदेशातील ग्राहकांनाही आवडू लागल्या आहेत. सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये मारुती सुझुकीच्या एका कारने दबदबा निर्माण केला आहे. या कारची निर्यात जगभरात प्रचंड वाढली आहे. जाणून घेऊया या कारबद्दल
भारतीय ग्राहकांमध्ये मारुती सुझुकी अल्टो ही नेहमीच लोकप्रिय कार राहिली आहे. कारची किंमत ही ग्राहकांना परवडणारी आहेच तसेच कारही तिच्या विश्वासार्ह कार्यक्षमतेसाठी देखील प्रसिद्ध आहे. जर सप्टेंबर 2024 च्या देशांतर्गत कार बाजारातील विक्रीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, मारुती सुझुकी अल्टोने 8,655 युनिट्सच्या विक्रीसह टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहेच मात्र निर्यातीमध्ये या कारने अतिशय जबरदस्त कामगिरी केली आहे. अल्टोच्या सप्टेंबर महिन्यात 927.91 टक्के वार्षिक वाढीसह एकूण 442 युनिट्सची निर्यात करण्यात आली. सप्टेंबर 2023 मध्ये हा कार निर्यातीचा आकडा केवळ 43 युनिट्स होता.
फोटो सौजन्य- अधिकृत संकेतस्थळ
अल्टोमध्ये पेट्रोल आणि CNG दोन्ही पर्याय
मारुती अल्टो K10 मध्ये 1.0-लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 67bhp पॉवर आणि 89Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससहित येते. तसेच महत्वाचे म्हणजे कारमध्ये CNG पर्याय देखील उपलब्ध आहे, जो 57bhp पॉवर आणि 82Nm टॉर्क जनरेट करतो.
कमालीचा मायलेज
कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास , मारुती सुझुकीकडून दावा आहे की, कार मॅन्युअल प्रकारात 24.39 kmpl, ऑटोमॅटिक प्रकारात 24.90 kmpl आणि CNG प्रकारात 33.85 km/kg मायलेज देते. मारुती सुझुकी अल्टो K10 ही सध्या बाजारपेठेत चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
अल्टोमधील वैशिष्ट्ये
कारच्या वैशिष्टयांबद्दल विचार केल्यास अल्टोमध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते. याशिवाय डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि पॉवर ॲडजस्टेबल ORVM सारख्या सुविधाही देण्यात आल्या आहेत. कारमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने यात ड्युअल एअरबॅग्ज, एबीएस टेक्नॉलॉजी आणि रियर पार्किंग सेन्सर देण्यात आले आहेत.
किफायतशीर किंमत
या कारचे स्पर्धक हे Renault Kwid, Maruti Suzuki S-Presso आहेत. Maruti Suzuki Alto K10 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे तर या कारच्या टॉप व्हेरियंटची एक्स शो रुम किंमत 5.96 लाख रुपयांपर्यंत जाते. कारमधील वैशिष्ट्ये, उत्तम परफॉर्मन्स आणि परवडणाऱ्या किंमतीमुळे अनेक देशातील आणि विदेशातील ग्राहक ही कार विकत घेण्यासाठी आकर्षित होतात.