फोटो सौजन्य: @MuskElon3312 (X.com)
जगभरात अनेक दमदार ऑटो कंपन्या आहेत, ज्यांच्या कार्सना नेहमीच डिमांड असते. यातीलच एक आघाडीची आणि लोकप्रिय ऑटो कंपनी म्हणजे टेस्ला. टेस्लाने जगभरात दमदार कार्स लाँच केल्या आहेत. आता तर कंपनी लवकरच भारतीय मार्केटमध्ये सुद्धा आपले पहिले पाऊल ठेवण्यास सज्ज होत आहे. मात्र, याच सुपरहिट कंपनीची एक इलेक्ट्रिक कार फ्लॉप होण्याच्या मार्गावर आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
जगातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कारपैकी एक म्हणजे Tesla Cybertruck. टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क यांनी या कारचा जोरदार प्रचार केला. यासोबतच, त्याच्या फीचर्सबद्दल देखील बरीच प्रसिद्धी झाली होती. मात्र, या कारला हवा तास ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला नाही.
जेव्हा एलोन मस्कने पहिल्यांदा सायबरट्रक सादर केला तेव्हा त्यांनी त्याचे वर्णन फ्यूचरिस्टिक कार म्हणून केले. CNN च्या वृत्तानुसार, सायबरट्रक केवळ टेस्लाची आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरला नाही तर कंपनीच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसला.
टेस्ला सहसा त्यांच्या मॉडेल्सच्या विक्रीचे आकडे सार्वजनिकपणे जाहीर करत नाही, परंतु कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल-जून 2025) टेस्लाच्या एकूण ग्लोबल डिलिव्हरीत 13.5% टक्क्यांची घट दिसून आली आहे, जी आतापर्यंतची सर्वात मोठी तिमाही घट असल्याचे मानले जात आहे.
सायबरट्रकची विक्री टेस्लाच्या इतर मॉडेल्सच्या कॅटेगरीत लपलेली आहे, ज्यामध्ये Model S, Model X, आणि Cybertruck चा समावेश आहे. या कॅटेगरीची विक्री 21,500 वरून 10,400 युनिट्सवर आली आहे, म्हणजेच तब्बल 52% ची घट दिसून येते, जे थेट या कारचे अपयश दर्शवते.
सायबरट्रकची किंमत सुमारे $80000 ते $100000 (68.40 लाख ते 85.50 लाख रुपये) आहे, ज्यामुळे ती सामान्य खरेदीदारांच्या आवाक्याबाहेर जात होती. लवकरच, इलेक्ट्रिक वाहनांवरील कर सवलती अनेक मार्केटमध्ये संपुष्टात येऊ शकतात, ज्यामुळे या कारची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
एलोन मस्कने सुरुवातीला 500 मैलांच्या रेंजचा दावा केला होता, परंतु प्रत्यक्षात ही कार फक्त 200 मैल देण्यास सक्षम ठरली. अनेक वेळा सायबरट्रक परत मागवण्यात आला आहे, ज्यामध्ये चालत्या ट्रकवरून स्टील पॅनेल पडल्याचा एक प्रसंग देखील समाविष्ट आहे.
टेस्लाच्या Model 3 आणि Model Y सारख्या इतर कार अजूनही बाजारात चांगला परफॉर्मन्स देत आहेत, परंतु सायबरट्रकची यांच्या इतकी विक्री होताना दिसत नाही आहे. टेस्लाला आता Rivian, Ford, आणि GM सारख्या कार उत्पादकांकडूनही कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. यासोबतच, चिनी कंपनी BYD टेस्लाला मागे टाकत आहे.