जगभरामध्ये पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचे नवनवीन पर्याय विकसित केले जात आहेत. इव्ही कार हळूहळू लोकांपर्यंत पोहचत आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोल हाही एक चांगला पर्याय आहे. ज्यामुळे पेट्रोलचा वापर कमी करता येऊ शकतो. भारतामध्ये पेट्रोल मिश्रित इथेनॉलचे वापर आधीच सुरु झाले आहे. आता सरकारकडून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याची टक्केवारी वाढवण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. सरकारने ऑक्टोबर 2025 पूर्वी E20 ( पेट्रोलमध्ये 20 टक्के मिश्रण) चे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने सरकार आक्रमकपणे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातील इथेनॉल-मिश्रित डिझेलचे भविष्य आणि त्यावर सुरु असलेल्या संशोधनावर भाष्य केले आहे.
नुकत्याच झालेल्या 12 व्या CII ( Confederation of Indian Industry ) या बायोएनर्जी समिटमध्ये मंत्री नितीन गडकरी यांनी घोषित केले की देशात डिझेलमध्ये 15 टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे संशोधन प्रगतीपथावर आहे. याचा अर्थ असा की, देशात लवकरच डिझेलवर आधारित असलेली वाहने इथेनॉल-मिश्रित डिझेलवर चालणार आहेत. यामुळे केवळ इंधिनाची किंमत कमी होणार नाही तर कार खरेदीदारांना या डिझेल वाहनाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. आताच्या काळात पेट्रोल आणि डिझेलवरील कारच्या उत्पादनाबाबात, भारतामधील प्रमुख कार उत्पादकांचे लक्ष्य हे पेट्रोलवर आधारित कार उत्पादनाकडे जास्त आहे. मात्र डिझेलमधील या संशोधनामुळे कार उत्पादक डिझेल वाहनांच्या निर्मितीवरही भर देऊ शकतात.
जर पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉलचा वापर केला गेला तर जीवाश्म इंधनावर मोठ्या प्रमाणात असणारे देशाचे अवलंबित्व कमी होणार आहे. महत्वाचे म्हणजे इथेनॉल हे देशामध्ये तयार करण्यात येते. नितीन गडकरी यांनी वाहन निर्मात्यांना फ्लेक्स-इंधन इंजिन विकसित करण्यास सांगितले आहे, जे इथेनॉल इकोसिस्टम तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सरकारकडून सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये इथेनॉल पंप उभारण्यात येत आहेत.
सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून सीएनजीलाही प्रोत्साहन दिले जात आहे. सरकार बायोमासद्वारे सीएनजी निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. परिवहन मंत्रालयाकडून इथेनॉल मिश्रित डिझेलच्या उपलब्धतेबद्दल लवकरच अधिक माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.