अग्निवीरांसाठी लष्कराचे कडक नियम! सेवेदरम्यान लग्न केल्यास...; वाचा नवीन गाईडलाईन (Photo Credit- X)
काय आहे लष्कराचा नवीन नियम?
सेवेदरम्यान लग्नावर बंदी: जोपर्यंत एखादा अग्निवीर भारतीय लष्करात कायमस्वरूपी सैनिक म्हणून नियुक्त होत नाही, तोपर्यंत त्याला लग्न करता येणार नाही. चार वर्षांच्या सेवेच्या काळात लग्न करणे हे थेट अपात्रतेचे कारण ठरेल.
चयन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा
चार वर्षांची सेवा संपल्यानंतरही कायमस्वरूपी निवडीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण ४ ते ६ महिने लागतात. जोपर्यंत अंतिम निवड यादीत नाव येत नाही आणि परमानंट अपॉइंटमेंट मिळत नाही, तोपर्यंत अग्निवीरांना अविवाहित राहणे अनिवार्य आहे. जर एखाद्या अग्निवीराने चार वर्षांच्या सेवेदरम्यान किंवा निवड प्रक्रिया सुरू असताना लग्न केले, तर तो कायमस्वरूपी सेवेसाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. अशा उमेदवारांना निवड प्रक्रियेतून पूर्णपणे बाद केले जाईल.
अग्निवीर योजनेची सद्यस्थिती
ही योजना २०२२ मध्ये सुरू करण्यात आली होती. आता पहिली बॅच त्यांची चार वर्षांची सेवा पूर्ण करण्याच्या जवळ आहे, त्यामुळे हे नियम अधिक स्पष्ट करण्यात आले आहेत. किती जण होणार परमानंट? लष्कराच्या नियमांनुसार, प्रत्येक बॅचमधील केवळ २५ टक्के अग्निवीरांनाच त्यांच्या गुणवत्ता (Merit), शारीरिक क्षमता आणि कामगिरीच्या आधारावर कायमस्वरूपी सैनिक बनण्याची संधी मिळेल.
कायमस्वरूपी नियुक्तीनंतर सूट
लष्कराने स्पष्ट केले आहे की, एकदा का अग्निवीराची निवड कायमस्वरूपी सैनिक म्हणून झाली की, त्याला लग्नाचे पूर्ण स्वातंत्र्य असेल. नियुक्तीनंतर विवाह करण्यावर कोणतेही निर्बंध नसतील आणि ते आपल्या वैयक्तिक जीवनाचे निर्णय घेऊ शकतील.






