भारतातील सर्वात युवा आमदाराची सगळीकडेच चर्चा, खरेदी केली तब्बल 3 कोटींची कार
देशातील नेत्यांना नेहमीच आकर्षक आणि आलिशान कार आपल्या कार कलेक्शनमध्ये समाविष्ट करण्याची आवड असते. यात तरुण नेते सुद्धा कमी नाहीत. यातही खासकरून मर्सिडीजच्या कार फक्त नेत्यांनाच नाही तर अनेक सेलिब्रेटी मंडळींना सुद्धा भुरळ पाडत असतात. आजही रस्त्यांवर मर्सडिजची कार दिसली की अनेकांच्या नजर त्यावर रोखल्या जातात. अशीच एक मर्सडिजची इलेक्ट्रिक कार भारतातील सर्वात तरुण आमदाराने विकत घेतली आहे, ज्यामुळे सगळीकडे याची चर्चा रंगली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
मर्सिडीज-बेंझने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये प्रसिद्ध G-Wagen चे इलेक्ट्रिक व्हर्जन, G580 EQ लाँच केले आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीने त्याच्या पॉवरफुल लूक आणि फीचर्समुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतेच भारतातील सर्वात तरुण आमदार रोहित मयनामपल्ली हे या कारचे पहिले खरेदीदार बनले आहेत. डॉ. रोहित मयनामपल्ली तेलंगणाच्या राजकारणात खूप सक्रिय आहेत. तेलंगणातील या आमदाराच्या कारचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रोहित मयनामपल्ली यांनी ही इलेक्ट्रिक एसयूव्ही डीप ब्लॅक कलरमध्ये खरेदी केली आहे. या इलेक्ट्रिक कारचा लूक जी-वॅगनच्या आयसीई व्हर्जन सारखेच आहे. या कारचे फ्रंट ग्रिल, हेडलॅम्प आणि बंपर G63 आणि G400d सारखे आहेत. या एसयूव्हीच्या बॉक्सी डिझाइनमध्ये वाहन उत्पादकांनी कोणताही बदल केलेला नाही.
या मर्सिडीज कारच्या प्रीमियम फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात दोन 12.3-इंच डिस्प्ले आहेत. यापैकी एक इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी आहे आणि दुसरा या कारचा इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे. या कारमध्ये इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल सीट्स देण्यात आल्या आहेत. या ईव्हीमध्ये मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, हीट आणि कूल सीट्स सारखी अनेक फीचर्स देण्यात आली आहेत.
मर्सिडीज-बेंझ G580 EQ च्या ICE व्हर्जनप्रमाणे, ही इलेक्ट्रिक कार ऑफ-रोडिंगसाठी देखील डिझाइन करण्यात आली आहे. या कारमध्ये चारही चाकांसाठी चार मोटर्स आहेत. G580 EQ मध्ये 116 kWh बॅटरी पॅक आहे, जो 587 PS पॉवर निर्माण करतो आणि 1,164 Nm टॉर्क जनरेट करतो. मर्सिडीजच्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीची सर्टिफाइड रेंज 473 किलोमीटर आहे.
या मर्सिडीज कारमध्ये फास्ट चार्जिंग फीचर आहे, ज्याच्या मदतीने ही कार अवघ्या 32 मिनिटांत चार्ज करता येते. ही कार फक्त पाच सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. या कारचा टॉप स्पीड 180 किमी प्रतितास आहे. मर्सिडीजच्या या नवीन इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत तब्बल 3 कोटी रुपये आहे.