“शाळा, कॉलेजचं नव्हे तर रस्त्यात येणारे जाणारेही मला ‘पुष्करची आई’ म्हणूनच ओळखतात आणि हीच माझी महत्त्वाची ओळख आहे. पुष्करचे सगळे करताकरता या आयुष्याला एक वेगळेच वळण लागून गेले. बराचसा अनुभव गाठीशी आला आणि त्यातूनच ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन’ ही दिव्यांगांसाठीची संस्था उभी राहिली.” हे सांगताना नूतन गुळगुळे यांचा स्वर भरून आला.
जन्मापासूनच नूतन यांची जडणघडण शैक्षणिक वातावरणात झाली. आई-वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे अभ्यासात त्या हुशार होत्याच; परंतु खेळातही तेवढ्याच प्रवीण होत्या. पदवीनंतर एका खाजगी कंपनीत नोकरी करत असतानाच १९९४ साली विनायक गुळगुळे यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. विवाहानंतर दोन वर्षांनी मातृत्वाची गोड चाहूल देत त्यांच्या पहिल्या अपत्याचा, पुष्करचा जन्म झाला आणि त्यांच्या आयुष्यात आकस्मिकरीत्या एक वेगळंच वळण आलं.
पुष्कर नऊ महिने, नऊ दिवस असे पूर्ण दिवस घेऊन जन्मला. त्याचं वजन केवळ ८०० ग्रॅमच होतं. बाळ व्यवस्थित होतं, हा मात्र एक चमत्कारच होता. रुग्णालयातून दहा-बारा दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आलं आणि आई म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्या एका वेगळ्या आयुष्याला सुरुवात झाली. वजन फारच कमी असल्यामुळे पुष्करची प्रचंड काळजी घ्यावी लागणार होती. त्यामुळे सर्वप्रथम नूतन यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.
पुष्करची शारीरिक वाढ उत्तम होत होती. मात्र सातव्या महिन्यापर्यंत बाळाच्या सामान्यपणे होणाऱ्या शारीरिक हालचाली होत नसल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी पुन्हा डॉक्टरकडे धाव घेतली. त्यावेळी पुष्कर ‘सेलेब्रल पालसी’ग्रस्त मूल असल्याचं निदान झालं. नूतन यांच्यासाठी हे धक्कादायक आणि नवीनच होतं. मात्र बौद्धिकदृष्ट्या तो कसा आहे, हे तो थोडा मोठा झाल्यावरच समजणार होतं. हे सत्य पचवत आपल्या दिव्यांग बाळाला सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणे, या एकाच ध्येयाकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. “शालेय तसंच महाविद्यालयीन जीवनात असताना खेळामुळेच माझ्यात संयम आणि जिद्द हे गुण अंगी आले. शांतपणे जराही न ढळता ‘मला जिंकायचंच आहे’ हे ध्येय मी नेहमीच ठेवलं. त्यामुळे आयुष्यात आलेलं हे आव्हानही मी हसतमुखाने स्वीकारलं,” असं नूतन यांनी सांगितलं.
सातव्या महिन्यानंतर पुष्करच्या शारीरिक हालचालीत सहजता यावी, तो उभा रहावा म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला व्यायाम देण्यात आला. या कालावधीत एक समाधानाची बाब नूतन यांच्या ध्यानात आली ती म्हणजे पुष्करचा मेंदू सामान्य मुलाप्रमाणेच सक्षम होता. याविषयी त्या म्हणाल्या, “पुष्कर ऐकतोय, बोलतोय… हे पाहून वेगवेगळी गाणी आम्ही त्याला ऐकवायचो. तसंच त्याला पुस्तकं वाचून दाखवायचो. पुष्कर साडेतीन वर्षांचा झाल्यावर ज्युनिअर केजीसाठी पार्ल्यातील एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आम्ही त्याला प्रवेश घेतला. दोन्ही पाय आणि डावा हात यावर सेलेब्राल पालसीचा परिणाम असला तरी त्याची आकलनशक्ती मात्र उत्तम होती. उजव्या हाताने तो मोठ्या अक्षरात लिहायचा. वर्गातील इतर मुलांबरोबर तो फार खूश असायचा. त्याची शाळा, व्यायाम हे सर्व करताना सकाळी पाच वाजता आमचा जो दिनक्रम चालू व्हायचा, तो रात्री झोपेपर्यंत असायचा. ही जणू आमची परीक्षाच होती.”
पुढे माध्यमिक शिक्षणासाठी अंधेरीतील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलमध्ये पुष्करला प्रवेश मिळाला. नूतन दिवसभर त्याच्या शाळेच्या बाहेर बसून असायच्या. मधल्या सुट्टीत जाऊन त्याला भरवणं आणि सायंकाळी जिममध्ये जाऊन पुष्करला व्यायाम देणं, हे चक्र सातत्यानं चालू होतं. आईच्या या कष्टाला पुष्करनेही साथ देत पुढे दहावीला ७० टक्के तर बारावीला ६५ टक्के प्राप्त करून उत्तम यश मिळवलं. मुलाच्या या यशाबद्दल त्या म्हणाल्या, “दिवसभराच्या धावपळीत संध्याकाळी दोन तास पुष्कर अभ्यास करत असे. मी त्याची रीडर होते. शाळेच्या परवानगीने मी त्याच्या वह्या, प्रकल्प पूर्ण करत असले तरी परीक्षा मात्र स्वतःच्या हाताने द्यायचा त्याचा आग्रह असायचा. असं करून एवढं शिक्षण त्याने चिकाटीने पूर्ण केलं. परमेश्वर एक गोष्ट काढून घेतो तर दुसरी देतोही.”
पुढे डहाणूकर महाविद्यालयातून मार्केटिंगमध्ये पुष्कर ‘बीएमएस’ झाला आणि नंतरची दोन वर्ष त्याने ‘एमकॉम’ही केलं. एवढं करूनही वेगळं काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा असलेल्या पुष्करने मराठी दिग्दर्शक संजय जाधव यांच्या अकादमीत चार महिन्यांचा फिल्म एडिटिंगचा कोर्स केला. पुढे अपूर्वा मोतीवाले या नावाजलेल्या फिल्म एडिटरच्या प्रशिक्षणाखाली तो फिल्म एडिटिंगही करू लागला. पुष्करची दुचाकी चालविण्याची इच्छा लक्षात घेऊन नूतन यांनी अथक प्रयत्नांनी त्याला ड्रायव्हिंगचं रीतसर प्रशिक्षणही दिलं.
नूतन अभेद्य भिंतीसारख्या त्याच्या पाठीशी राहिल्याच. परंतु “पुष्कर, हे तू स्वतंत्र करायचं आहेस. ज्यांचं कोणीच करणारं नाही ते कसं करत असतील?” याची जाणीव करून देत त्यांनी पुष्करला एक आत्मविश्वासही मिळवून दिला.
पुष्करच्या जन्मानंतर ‘पुष्करची आई’ हीच त्यांची ओळख बनली. याविषयी त्या अभिमानाने म्हणाल्या, “पुष्करच्या शाळेत दिव्यांग मुलं आली की त्यांच्या पालकांना शाळेने माझा संपर्क क्रमांक देण्यास सुरुवात केली. त्यांना हवी असलेली माहिती मी पुरवू लागले. त्यांच्या अनेक अडचणी सोडवू लागले. मार्गदर्शन करू लागले. माझं सतत चाललेलं हे काम बघून माझे पती विनायक गुळगुळे यांनी मी दिव्यांगांसाठी एक संस्था स्थापन करावी असं सुचवलं.”
२०१४ साली त्यांनी रीतसर विरार, अर्नाळा येथे दिव्यांगांसाठी ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन’ ही संस्था स्थापन केली. संस्थेच्या माध्यमातून ‘दिव्यांगांचे पालकत्व : एक आव्हान’ असे सेमिनार घेण्यास त्यांनी सुरुवात केली. दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी रिसोर्टला पिकनिक सुरू केल्या. शाळा आणि घर या चौकटीबाहेरही ‘तुमचं मुलं कसं खेळतंय’ याचा त्यांच्या पालकांना आत्मविश्वास मिळवून दिला. या मुलांचं कोणीतरी कौतुक केलं पाहिजे या उद्देशाने नूतन यांनी ‘ध्येयपूर्ती पुरस्कार’ नावाचा आगळावेगळा उपक्रमही सुरू केला, जो गेली आठ वर्षं सातत्याने चालू आहे. तसंच या मुलांचं आणि त्यांच्या पालकांचं समुपदेशनही संस्थेमार्फत केलं जातं.
येत्या वर्षात अर्नाळा येथेच ‘स्वानंद सेवा सदन’ हा दिव्यांगाश्रम त्या सुरू करीत असून कोविडमध्ये जोडीदार गमावल्यामुळे एकल पालकत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या पालक आणि त्याच्या ‘दिव्यांग’ बालकांकरिता या आश्रमात वसतिगृह, आरोग्य सुविधा आणि प्रशिक्षण या सुविधा देण्यात येणार आहे. “दिव्यांग मुलाला वाढविताना एवढं ज्ञान मिळालं आहे की इतरांनाही याचा उपयोग व्हावा म्हणून याच कार्यात मी स्वतःला वाहून घेतलंय. माझ्या पतीची आणि मुलाची मोलाची साथ या प्रवासात आहे.” असं नूतन यांनी सांगितलं. नूतन यांच्या या असामान्य कार्याची दखल घेऊन ‘माय होम इंडिया’ या संस्थेने ‘वन इंडिया अवॉर्ड-२०२२’ या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं आहे.
-अनघा सावंत (anaghasawant30@rediffmail.com)