ऋषि कपूर व नीतूने चेंबूरच्या आर. के. काॅटेजमध्ये फार काळ राहण्यापेक्षा वांद्र्याच्या पाली हिलवरील गुलजार यांच्या बोस्कियाना बंगल्याजवळ बंगल्यात राहणे पसंत केले. ऋषि कपूर सिनेमात तर नीतू आपली रणवीर व रिध्दीम्मा यांच्या पालनपोषणात रमली.
तिची आणि आईची महत्वाकांक्षा होती की, बालकलाकार म्हणून वाटचालीचं आता तारुण्यातील पाऊल म्हणून ‘बाॅबी गर्ल’ची संधी मिळावी. आर. के. फिल्मच्या चित्रपटात नायिका म्हणजे जणू जॅकपाॅट. दिग्दर्शक राज कपूरला स्क्रीन टेस्टही दिली. तोपर्यंत तिने बेबी सोनिया नावाने ‘सूरज’ (१९६६) पासून वाटचाल सुरु करुन दस लाख, पवित्र पापी, घर घर की कहानी (यात चक्क दुहेरी भूमिकेत), वारीस या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. राज कपूरची ‘बाॅबी ब्रेगेन्झा’ ख्रिश्चन होती. राज कपूरने डिंपल कापडियाची निवड केली….
आता योगायोग कसा ते बघा, ‘बाॅबी’च्या प्रदर्शनाच्या दिवशीच म्हणजेच २८ सप्टेंबर १९७३ रोजी नीतू सिंगचा पहिला चित्रपट के. शंकर दिग्दर्शित ‘रिक्षावाला’ (मुंबईत मेन थिएटर मराठा मंदिर. चक्क पन्नास वर्ष पूर्ण ) झळकला. पहिला नायक रणधीर कपूर. हा मसालेदार मनोरंजक चित्रपट दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटाची रिमेक होता. बेबी सोनिया म्हणून काम करत असताना कॅमेरा म्हणजे काय, दिग्दर्शकाच्या सूचना म्हणजे काय, सेटवरचे वातावरण कसे असते, मोठे स्टार्स कसे असतात/ वागतात याचा अनुभव असल्याने आता वयात आल्यावर नीतू सिंग म्हणून पहिल्याच चित्रपटात झक्कास सहजपणे अदाकारी करुन दाखवून समिक्षक, प्रेक्षक व चित्रपटसृष्टीचेही लक्ष वेधून घेतले.
हीच गोष्ट रंगत रंगत गेली. ‘बाॅबी’चा राजा (ऋषि कपूर)ची ती त्याचा पुढचाच चित्रपट ‘जहरिला इन्सान’मध्ये नायिका झाली. हे नाते प्रत्येक चित्रपटासह विकसित होत गेले. हीच नायिका ऋषि कपूरची मैत्रिण आणि मग ‘खेल खेल मे’ करत करत प्रेयसी झाली. ‘जिंदा दिल’ वय असल्याने त्यांचे स्वभाव जुळले, एकमेकांचा सहवास आवडू लागला. ते पडद्यावरही दिसे. एकिकडे ‘कभी कभी’, ‘अमर अकबर ॲन्थनी’, ‘रफू चक्कर’, ‘दुसरा आदमी’ ‘झूठा कहीं का’ वगैरे चित्रपटात ‘जोडीने काम करताना’ ती कपूर खानदानाची सून बनणार आणि सिंगची नीतू कपूर बनणार हे स्पष्ट झाले आणि मग घडलेही तसेच.
दुसरीकडे पहावे तर नीतू सिंग राजेश खन्ना (चक्रव्यूह, महाचोर), जितेंद्र (धरमवीर, प्रियतमा, चोरनी), अमिताभ बच्चन (अदालत, द ग्रेट गॅम्बलर, याराना) इत्यादी नायकांची नायिका झाली. अगदी ऋषि कपूरचा काका शशी कपूरचीही ती नायिका झाली. (दीवार, शंकरदादा). सावनकुमार दिग्दर्शित ‘हवस’ (अनिल धवन), अब क्या होगा (शत्रुघ्न सिन्हा) तसेच अन्य चित्रपटातही तिने भूमिका साकारत आपली कारकीर्द खुलवली. सत्तरच्या दशकात नायिकेने ‘ग्लॅमरस दिसणं’, छान मोकळेपणाने हसणं याला जरा जास्तच महत्व आले त्यात नीतू सिंग एकदम परफेक्ट होती. यश चोप्रा, मनमोहन देसाई, रवि टंडन, बासू चटर्जी अशा मोठ्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करायला तिला मिळाले आणि तिने ते एन्जाॅय केल्याचे पडद्यावर आले तर मग आणखीन काय हवे. तिचा अभिनयाशी थोडाफार संबंध आला तो ज्योती स्वरुप दिग्दर्शित ‘चोरनी’ या चित्रपटात. हा चित्रपट दुलाल गुहा दिग्दर्शित ‘दुश्मन’ (१९७२) ची नायिकाप्रधान आवृत्ती. मूळ चित्रपटात राजेश खन्नाला ‘गुन्ह्याची शिक्षा म्हणून कुटुंबाचा सांभाळ करण्याची शिक्षा’ ठोठावण्यात येते. तीच गोष्ट यात शहरी करुन नीतू सिंगला शीर्षक भूमिका मिळाली. आपण छान दिसणं/ हसणं/ नाचणं यासाठीच चित्रपटात काम करतोय असाच तिचा बाणा दिसला. आणि त्यात ती यशस्वी ठरली. नीतू सिंग गीत संगीत व नृत्यात फारच खुलायची. ती आपली भरभक्कम बाजू असल्याची तिला जाणीव असावी. ‘खेल खेल मे’मधील खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो आणि एक मै और एक तू ही गाणी पाहताना त्यात तिने समरसून भाग घेतल्याचे जाणवेल. प्यार के दिन आये काले बादल छाये (महाचोर), झूठा कहीं का मुझे ऐसा मिला (झूठा कहीं का), तुमको मेरे दिलने (रफू चक्कर), जीवन के हर मोड पर (झूठा कहीं का), तेरे चेहरे से नजर नही हटती (कभी कभी) अशी तिची अनेक गाणी याचा प्रत्यय देतात. ऋषि कपूरसोबतच्या प्रेम दृश्यात/ प्रेम गीतात ती अभिनय नव्हे तर खरं प्रेम करतेय असे जाणवतेय तर यापेक्षा त्यांच्या अफेअर्सचा आणखीन भक्कम पुरावा कशाला हवा? जोडी जमली छान, शोभलीही छान.
लग्न झाल्यावर ती कपूर खानदानात रमली. ऋषि कपूर व नीतूच्या लग्नाचे विशेष म्हणजे, या लग्नाच्या स्वागत समारंभाच्या निमित्ताने अनेक वर्षांनी नर्गिसजी राज कपूरसमोर आल्या. अर्थात सोबत सुनील दत्त होतेच. त्यांचं लग्न झाल्यावर राज कपूर व नर्गिस यांचे ‘दिग्दर्शक व नायिका आणि त्यात गाॅसिप्स’ यांचे नाते संपुष्टात आले होते. ऋषि कपूर व नीतूच्या लग्नातील गाजलेली फोटो बातमी म्हणजे दत्त दाम्पत्याने त्या दोघांना दिलेला आशीर्वाद.
ऋषि कपूर व नीतूने चेंबूरच्या आर. के. काॅटेजमध्ये फार काळ राहण्यापेक्षा वांद्र्याच्या पाली हिलवरील गुलजार यांच्या बोस्कियाना बंगल्याजवळ बंगल्यात राहणे पसंत केले. ऋषि कपूर सिनेमात तर नीतू आपली रणवीर व रिध्दीम्मा यांच्या पालनपोषणात रमली. अधूनमधून ऋषि कपूरसोबत एखाद्या फिल्मी इव्हेन्टसला दिसायची. एकदा तर तिनेच म्हणे ऋषि कपूरला जुही चावलाशी फ्रेन्डशीपचा गोड सल्ला दिला. अशी मैत्रिण त्याला मनाने तारुण्यात ठेवेल म्हणे. असेलही कदाचित खरं. कपूर खानदानात काहीही शक्य आहे. याच ऋषि कपूर व नीतूने अमिताभच्या एका वाढदिवसानिमित्ताच्या इव्हेन्टसमध्ये अभिषेक बच्चन कपूर खानदानाचा जावई तर करिश्मा कपूर बच्चन खानदानातील सून बनणार अशी भारी घोषणा केली होती. पण ही गोष्ट हवेत असतानाच हे नाते तुटले. नीतूने लव्ह आज कल (२००९) पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. जुग जुग जिओच्या वेळेस (२०२१) अनिल कपूरसोबत रिलॅक्स मूडमध्ये काम केले. ऋषि कपूरच्या निधनानंतर (३० एप्रिल २०२०) नीतू निराश होणे स्वाभाविकच होते. त्यातून सावरली. आलिया भट्ट सून म्हणून घरात आली. आता नीतू कपूर आजी म्हणून छान वावरतेय.
या सगळ्यात तिने आपला फिटनेस छान जपलाय. ती फळे घ्यायला मार्केटमध्ये जाते अशी क्लिप भरपूर व्हायरल झाली.
‘रिक्षावाला’ चित्रपटापासूनचा नीतू कपूरचा छानसा प्रवास ऋषि कपूरच्या निधनाचा दुर्दैवी धक्का पचवून दिलखुलासपणे सुरु आहे. पन्नास वर्ष आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यात ती यशस्वी ठरलीय याचं आपण कौतुक करुयात…- दिलीप ठाकूर