(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रणवीर सिंग अभिनीत ‘धुरंधर’ या चित्रपटाने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच ‘धुरंधर: द रिव्हेंज’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘धुरंधर: द रिव्हेंज’चा ट्रेलर होळीच्या निमित्ताने प्रदर्शित होणार असून त्यासाठी निर्मात्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काही वृत्तांनुसार हा ट्रेलर ३ मार्च रोजी, म्हणजेच उद्या, रिलीज केला जाण्याची शक्यता असल्याचे समजले आहे. होळीच्या निमित्ताने प्रेक्षकांना दिलेली ही खास भेट असणार आहे, असा दावा करण्यात येत आहे.
‘धुरंधर: द रिव्हेंज’च्या टीझरने चाहत्यांची केली निराशा
तसेच काही काळापूर्वी धुरंधर चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘धुरंधर २’चा टीझर प्रदर्शित केला होता. मात्र त्यात प्रेक्षकांना काहीही नवीन पाहायला मिळाले नाही. तो पाहिल्यानंतर अनेकांनी दिग्दर्शक आदित्य धर यांनी इतका फिका टीझर रिलीज करायला नको होता असे म्हटले, कारण त्यात आकर्षित असे काहीच पाहायला मिळाले नाही. अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली आहे.
मात्र इंडस्ट्रीतील सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य धर यांनी प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादातून बरेच काही शिकले असून ‘धुरंधर २’चा ट्रेलर अधिक प्रभावी पद्धतीने तयार केला आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांना केवळ थराराचा अनुभव देणार नाही, तर कथेबाबतही स्पष्ट कल्पना देईल, असे सांगितले जात आहे. ‘धुरंधर: द रिव्हेंज’ला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत असला, तरी चित्रपटासमोर आता मोठे आव्हान उभे राहणार आहे. कारण साऊथ स्टार यांचा नवा चित्रपट टॉक्सिक देखील त्याच दिवशी प्रदर्शित होत आहे, आणि या चित्रपटाची ‘धुरंधर २’ सोबत टक्कर होणार आहे.
काही ट्रेड विश्लेषकांच्या मते, या दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी हा बॉक्स ऑफिस क्लॅश टाळायला हवा होता, कारण त्याचा फटका दोघांनाही बसू शकतो. मात्र सध्याची परिस्थिती पाहता हा क्लॅश टळण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. ‘टॉक्सिक’ आणि ‘धुरंधर: द रिव्हेंज’चे प्रोमो आणि ट्रेलर ज्या पद्धतीने एकामागोमाग एक समोर येत आहेत, त्यावरून हा सामना अटळ असल्याचे स्पष्ट होत आहे.






