टॅक्सी नंबर ९२११ (नौ दो ग्यारह) हा नाना पाटेकर आणि जॉन अब्राहम या दोघांचा चित्रपट येऊन गेला. दोघेही सारख्या स्वभावाचे व्यक्ती. एकाकडे बराच अभाव, तर दुसरा श्रीमंत तरीही ईरेला पेटणारा स्वभाव. दोघांची योगायोगाने टक्कर होते आणि तिथून संघर्ष सुरु होतो. हा संघर्ष इतकं टोक गाठतो की दोघेही आपल्याकडे होते, नव्हते सगळं गमावून बसतात.
थोडक्यात या चित्रपटाची ही पटकथा. त्यावेळी बहुधा तो चित्रपट खूप चालला नाही, पण सध्या महाराष्ट्रात सुरु असलेला असाच राजकीय चित्रपट सध्या तुफान चालतोय. कोण कोणामुळे राजकारणातून नौ दो ग्यारह होईल, हे सांगणे कठीण आहे. दोघेही ईरेला पेटले आहेत.
शेंडी तुटो अथवा पारंबी या भूमिकेतून एकमेकांशी भांडताहेत. शह-काटशहांचे राजकारण रंगले आहे. उद्धव ठाकरे यांची स्टाईल वेगळी आणि एकनाथ शिंदे यांची वेगळी असली तरीही दोघे ईरेला पेटलेले सारख्याच म्हणजे संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. अस्तित्वाची लढाई दोघांसाठीही आहे. फक्त शिंदे यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस, भाजप उभी आहे.
अंधेरीत विधानसभेची पोटनिवडणूक मतदारांचा कौल येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काय असेल, हे जाणून घेण्याची लिटमस टेस्ट आहे. अंधेरी मतदारसंघात सगळ्या जाती-पातीची आणि विविध पक्षांना मानणारी लोकं असल्यामुळे हा मतदारसंघ एकूण मुंबईचा, मुंबईकरांचा कौल काय असेल, हे सांगण्यास बऱ्यापैकी समर्थ आहे. त्यामुळेच चिन्ह, पक्षाचे नाव आणि आता ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीतील राजीनाम्याचा अडसर इथपर्यंत राजकारण येऊन पोहचले.
कोणतीही संधी उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या हाती द्यायची नाही, याच उद्देशाने गेल्या तीन महिन्यांपासून सरकार राबवले जातेय. त्याचा व्हायचा तो परिणाम अद्याप मुंबईतील शिवसेनेवर झालेला दिसत नाही आणि तो ईप्सीत परिणाम दिसत नाही तोपर्यंत सध्याचे राजकारण थांबणार नाही, हे नक्की.
दसरा मेळाव्याची चर्चा अद्याप मुंबईत सुरु आहे. पोलिसांनी दोन्ही मैदानांची क्षमता स्पष्ट केल्यानंतरही गर्दी कोणाकडे जास्त होती, हा सध्या चर्चेतील ट्रेंडींग विषय आहे. त्यात आता अंधेरी पोटनिवडणुकीची भर पडली. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला ऋतुजा लटके यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली.
निवडणूक लढवायचीय तर महापालिकेतील नोकरीचा राजीनामा त्यांना द्यावा लागेल, आणि तो राजीनामा मंजूर झाला नाही तर ऋतुजा यांना निवडणूक लढवता येणार नाही, हे अगदी सरळ आहे. दरम्यान ऋतुजा यांना शिंदे गटाने आपल्याकडे येण्याची गळ घातली, मंत्रीपद वगैरे देण्याचे आश्वारसन दिले, या कांड्याही पिकल्या.
एकीकडे ४० आमदार, सगळेच खासदार, पदाधिकारी, कार्यकर्तेच नव्हे तर पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि नाव गमावून बसलेल्या उद्धव ठाकरे विरुद्ध सगळं काही मिळवून सरकार चालविणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यामागे महाशक्ती उभी करणारे देवेंद्र फडणवीस अशी ही लढत आहे.
या लढतीसाठी अंधेरीचे मैदान ठरलेय. आपल्याकडे काहीच नाही, हे वारंवार सांगून सहानुभूती गोळा करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे तर आपली भूमिकाच कशी न्यायोचित हे पटवून देण्याचा शिंदे गटाचा आटापिटा सुरु आहे. अनेक मेळावे, अनेक सभा, दौरे आणि कार्यक्रम पार पडले.
अगदी विधिमंडळाचे अधिवेशनही झाले या सगळ्या ठिकाणी दोन्हा बाजुने हेच दोन मुद्दे मांडले. तरीही अद्याप मराठी मनाचा कौल कोणालाच कळलेला नाही. शिवसेनेचा स्वभाव संघर्षाचा आहे, असे आपण म्हणत असतानाच सारख्या स्वभावाचे दोन गट झाले आणि ते एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यातून संघर्ष अटळ आहे.
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत अंधेरी मतदारसंघातून रमेश लटके यांना उमेदवारी दिली. त्यांना ६२ हजार मतं पडली. तर त्यांचा थेट सामना झाला होता भाजपचे बंंडखोर उमेदवार मुरजी पटेल यांच्याशी. पटेल यांनी ४५ हजार मतं घेतली होती. यापूर्वीची म्हणजे भाजप – शिवसेना युती नसलेली २०१४ ची निवडणूक पाहिली तर लटके यांना ५२ हजार ८१७ तर भाजपचे उमेदवार सुनील यादव यांना ४७ हजार ३३८ मतं पडली होती.
या मतदारसंघात एकूण आठ प्रभाग येतात. पैकी ४ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे, २ भाजपकडे आणि १ काँग्रेसकडे आहे. या आकडेवारीवरुन असे स्पष्ट होते की शिवसेना आणि भाजप यांच्यातच येथे लढत आहे. गेल्यावेळी अपक्ष लढलेले मुरजी पटेल यांचेच नाव भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून पुढे आले. यातच २०१९ मध्ये शिवसेनेला रोखण्यासाठी पटेल यांची बंडखोरी कशी झाली असेल, हे स्पष्ट होते.
निवडणुकीचा सगळाच इतिहास डोळ्यासमोर आहे. निवडणुकीचे चिन्ह गोठवले गेले, पक्षाचे नावही गेले. एका अर्थाने पक्षच निघून गेला. तरीही शिवसेनेला जाग आली नाही, हे ऋतुजा यांच्या राजीनाम्याच्या लटकलेल्या मुद्द्यावरुन ध्यानात येते. गेल्या सहा महिन्यापासून ऋतुजा यांनाच उमेदवारी द्यायची हे शिवसेनेचे नक्की होते. मग तेव्हापासूनच त्यांच्या राजीनाम्याची तयारी करुन घ्यायला हवी होती. पण त्यावेळी सत्ता निघून जाईल, अशी पुरसटशी कल्पनाही नसल्यामुळे ठाकरे गट गाफिल राहीला.
या गाफिलपणातूनच लटके यांची उमेदवारी धोक्यात आली. राजीनाम्यावरुन लांबलेल्या विषयामुळे आता सर्वसामान्यांना या सगळ्या राजकारणाची चीड येऊ लागली आहे. चर्चेचा रोख कोणत्याही पक्षाकडे असला तरीही जाऊ दे आपल्याला काय त्याचं, असं म्हणून समारोप होऊ लागला आहे. कारण नेत्यांचे वैयक्तिक अहं दुखावले आहेत. ते शांत करण्यासाठीचा हा संघर्ष आहे, हे लोकांना कळून चुकले आहे.
अंधेरी निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना समोरासमोर येणार तरीही चिन्हाचा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही. काँग्रेसचे स्वातंत्र्योत्तर काळात तीन वेळा चिन्ह बदलले. भाजपचा जनता पक्ष होताना पणतीचे कमळ झाले. अनेक पक्षांची नावे बदलली, चिन्ह गोठवले गेले, बदलले. ७० च्या दशकात ज्यावेळी ग्रामीण भागापर्यंत पत्र पोहचणेही दिव्य होते, त्या काळात बदललेले चिन्ह सगळ्याच पक्षांनी काही दिवसात मतदारांपर्यंत पोहचवले होते. आतातर सोशल मीडिया हाताशी आहे. संपर्काचा, माध्यमांचा वेग वाढला आहे. त्यामुळे बदललेल्या चिन्हाचा फार बाऊ करून शिवसेनेने वाटचाल करणे आवश्यक आहे. त्याच – त्याच मुद्यांना लोक कंटाळले आहेत.
विशाल राजे
vishalvkings@gmail.com