मुळात सिंह हा काही माणसाळलेला प्राणी नाही तो घराघरात वावरू शकत नाही. सिंह म्हणजे काही पाळीव प्राणी नव्हे. सर्कशीत दिसणारे सिंह गरीब दिसू शकतात व शांत सौम्य भासू शकतात, पण जंगलात त्याची “स्वयंमेव मृगेंद्रता”, प्रकट झाल्याशिवाय कशी राहील? पण नेमका तोच आग्रह सध्या काही लोकांनी धरलेला आहे. आमचा आधीचा सिंह सौम्य प्रकृतीचा आहे पण मोदींनी त्याला आक्रमक आणि हिंस्त्र बनवला आहे, असे मंडळी जोराजोरात सांगू लागलेली आहेत.
भारताचे राष्ट्रीय प्रतीक चिन्ह असणारे सम्राट अशोकाच्या स्तंभावरील चार सिंह हे नेमके कसे आहेत? ते शांत सौम्य आहेत? की ते जंगलातील सिंह दिसतात तसेच उग्र आणि हिंस्र आहेत? अशी नाहक चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कोणत्याही गोष्टीत काहीतरी दोष शोधता आला तर ते शोधण्याचे काम काही विरोधी पक्षीय मंडळी करताना दिसतात. हा त्यातलाच एक प्रकार आहे.
नवे संसद भवन आणि त्या अनुषंगाने केंद्र सरकारे हाती घेतलेली केंद्रीय सचिवालय इमारतींची पुनर्रचना, तसेच इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन या देशाचे प्रतीक मानल्या गेलेल्या मध्यवर्ती विभागाची पुनर्रचना (सेंट्रल व्हीस्टा) या साऱ्याच बाबी वादग्रस्त ठरवण्याचे हरप्रयत्न झाले. प्रत्येक विषय न्यायालयाकडेही वारंवार नेला गेला. पण त्याचा काही परिणाम होत नाही हे दिसताच आता नाहक वाद उकरून कढल्याचे दिसते.
मुळात मोदींच्या आधी दहा वर्षापासून संसद भवनाच्या पुनर्रचनेवर विचारविनिमय सुरु होता. अनेक संसदीय समित्यांनी, राज्यसभेच्या सभापतींनी तसेच लोकसभेच्या पूर्वाद्यक्षांनी नव्याने संसदभवन बांधण्यासाठी अहवाल दिले होते. मोदींनी अनेक रखडलेल्या योजनांना चालना देण्याचे काम केले, त्यात त्यांनी केंद्रीय सचिवालयांची बांधणी, संसदभवनाची उभारणी आदी सेंट्रल व्हिस्टा कामांना चालना दिली.
आता नव्या संसद भवनाचे बांधकाम पूर्णत्वाकडे जात असताना त्याच्या मध्यवर्ती घुमटाकार छताच्या शिखरस्थानी सार्वभौम प्रजासत्ताकाचे प्रतीक असणारी चार सिंहांची प्रतिकृती बसवली गेली. संसद भवनाच्या अन्य कामांप्रमाणेच हेही राष्ट्रीय प्रतीक भव्य आणि देखणे आहे. तब्बल साडेएकवीस फुटांची प्रतीकृती असून त्याचे वजन साडेनऊ हजार किलो भरते. तितका भार सोसणारा पोलादी आधार त्याखाली दिला आहे.
हे कांस्य (ब्रांझ) धातूचे ओतीव शिल्प तयार कऱण्याचे काम गेले नऊ महिने सुरु होते आणि ते काम केंद्र सरकार वा मोदींनी अथवा भाजपने काही शिल्पकारांना सोपवले नव्हते. संसदभवनाची उभारणी करणाऱ्या टाटा कंपनीने शिल्पकार शोधले व ते काम करून घेतले. मानचिन्हाची नवी प्रतिकृती औरंगाबाद, जयपूर आणि दिल्ली अशी तीन ठिकाणी बनली असून आपल्या औरंगाबादचे शिल्पकार सुनील देवरे व दिल्ली जयपूरच्या लक्ष्मी व्यास यांनी ते काम केले आहे.
राष्ट्रीय मानचिन्हाची प्रतिकृती ६.५ मीटर उंचीची असून कांस्य धातूमध्ये बनवलेली आहे. मूळ अशोक स्तंभावरील शिल्पाच्या तिप्पट आकाराचे हे नवे प्रतीक बनले आहे ही बाब अधोरेखित करणे आवश्यक आहे. कारण त्यामुळेच त्याच्या दिसण्यात, भासण्यात फरक पडतो आहे.
शिल्पकार देवरे सांगतात की, अनेक महिने काम करून आम्ही सारनाथमधील मूळ सिंहमुद्रेची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे. टाटा कंपनीने हे कंत्राट दिले होते. केंद्र सरकार वा भाजपाशी आमचा संबंधच नव्हता. अशोक स्तंभाचे प्रारूप करून आम्ही सादर केले, त्याला मान्यता मिळाल्यावर ओतकाम हाती घेतले गेले.
मुळात आपण जे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारले तो अशोकस्तंभ इसवी सनापूर्वी अडीचशे वर्षांपूर्वी घडवला गेला. अखंड काळ्या दगडात कोरलेले ते चार सिंह असून उत्तरप्रदेशातील वाराणसीजवळ सारनाथ हे अशोकाच्या अनेक ठिकाणांपैकी एक महत्वाचे ठिकाण आहे. असे अनेक स्तंभ त्याने साम्राज्याच्या विविध विभागात बसवले होते. त्यावर राजाज्ञा कोरल्या होत्या.
मूळ अशोकस्तंभावर चार सिंहांच्या खाली चौकोनी पाया असून त्याच्या चारही बाजूंनी हत्ती, बैल घोडा व सिंह ही बल, धैर्य, बुद्धी व चपलतेची प्रतिके असून उलट्या कमळाकृतीवर सिंह व हा पाया विराजमान आहे. त्यावर मंडुकोपनिषदातील, ‘सत्यमेव जयते’, हे वचन कोरले आहे. अठ्ठावीस आऱ्यांचे चक्रही विराजमान आहे. हेच बुद्धीस्ट परंपरेतील धम्मचक्र किंवा धर्मचक्र. ही सारी प्रतिके बौद्ध धर्माशी जशी निगडित आहेत तशीच ती अशोकाच्या कार्याशीही निगडित आहेत.
२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय प्रजासत्ताकाने चार सिंहांचे शिल्प हे राष्ट्रीय मानचिन्ह म्हणून, तर ‘सत्यमेव जयते’ हे घोषवाक्य म्हणून स्वीकारले आहे. तसेच अशोक चक्र भारताच्या ध्वजावरही अंकित आहे. संसद भवनावर लक्षणीय जागी चार सिंहाचे प्रतीक स्थापित केले गेले तेव्हा सहाजिकच भारतीय परंपरेनुसार तिथे पूजा केली गेली आणि त्या राष्ट्रीय मानचिन्हाचे अनावरण पार पडले. त्यावेळी लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपसभापती, पंतप्रधान तसेच काही केंद्रीय मंत्री हजर होते. पण तिथे विरोधी पक्षीय नेते का नव्हते, असा सवाल काँग्रेस आणि अन्य नेत्यांनी उपस्थित केला आहे.
एकतर हा समारंभ संसदेने आयोजित केलेला नव्हता. कारण अद्याप संसद भवनाचे काम पूर्ण झालेले नाही. दुसरे म्हणजे लोकसभेत कोणत्याही विरोधी पक्षाचे दहा टक्केसुद्धा खासदार निवडून आलेले नाहीत, त्यामुळे तिथे अधिकृतरीत्या विरोधी पक्ष नेता हे पद रिक्तच आहे.
थोडक्यात वादाचे मोहोळ सहज उठलेले नाही तर मुद्दाम उठवलेले दिसते ! संसदेत सिंहाकृती बसवल्या तेव्हाच्या छायाचित्रामध्ये मोदींच्या मागे दिसणाऱ्या प्रतिकृतीमधील सिंह अधिक आक्रमक आणि आक्राळविक्राळ दिसत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. मुळात मोदींनी असे छायाचित्र काढले हेच अनेकांच्या रोषाचे करण दिसते !! मूळ मानचिन्हाच्या रचनेमध्ये बदल करून मोदी सरकारने राज्यघटनेचे उल्लंघन केल्याचा आरोप विरोधकांनी केला. पण ही प्रतिकृती घडवणाऱ्या शिल्पकारानेच ते सारे मुद्दे खोडून काढले आहेत.
त्या छायाचित्रात मोदींच्या मागील प्रतिकृतीमध्ये दिसणारे सिंह अधिक आक्रमक दिसत असून ते सारनाथ येथील मूळ अशोक स्तंभावरील शिल्पापेक्षा खूप वेगळे दिसत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तसेच, या प्रतिकृतीमध्ये कुठेही सत्यमेव जयते हे मूळ मानचिन्हावर असणारं वाक्यदेखील नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
दुसरा अधिक गंभीर आक्षेप प्रत्यक्ष सिंहमुद्रेच्या स्वरूपाविषयी आहे. या मुद्रेतील सिंह मूळ सिंहांच्या तुलनेत निष्कारण दात विचकणारे, बटबटीत, आक्रमक असल्याची टीका विशेषतः काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि आपच्या नेत्यांनी केली आहे. या संदर्भात संसद भवनाच्या निर्मितीचे काम करणाऱ्या केंद्रीय नगरविकास खात्याचे मंत्री हरदीपसिंग पूरी यांनी म्हटले हे की सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंहमुद्रेची हुबेहूब नवी प्रतिकृती आहे.
मूळ प्रतिकृती १.५ मीटर उंचीची आहे; तर, संसदेच्या नव्या इमारतीच्या दर्शनी भागावर बसवलेली मानचिन्हाची प्रतिकृती ६.५ मीटर उंचीची आहे. छोटा आकार आणि वेगवेगळ्या कोनातून काढलेल्या छायाचित्रांमुळे सारनाथची सिंहमुद्रा शांतचित्त वाटते, तर मानचिन्हाची नवी प्रतिकृती उग्र भासते.
केंद्रीय नागरी विकासमंत्र्यांचे म्हणणे आहे की, सौंदर्य प्रत्येकाला वेगवेगळ्या स्वरूपात दिसते. विरोधकांना चारही सिंह संतप्त आणि आक्रमक दिसत असतील तर ती त्यांची सौंदर्याकडे पाहण्याची दृष्टी असेल. सिंहांच्या चेहऱ्यावर संताप दिसतो की, आत्मविश्वास हे ज्याचे-त्याने ठरवावे. सिंहमुद्रेची नवी प्रतिकृती ३३ मीटर उंचावर बसवण्यात आली असून त्याकडे खालून पाहिले तर सिंहांचे दात दिसू शकतात. सारनाथमधील मूळ प्रतिमा जमिनीवर ठेवलेली आहे. मानचिन्हाची प्रतिकृती मूळ सिंहमुद्रेइतकी लहान केली तर, दोन्हींमध्ये कोणताही फरक दिसणार नाही!
अनिकेत जोशी
aniketsjoshi@hotmail.com