मुंबईतील राष्ट्रीय मिल मजदूर संघ येत्या ५ ऑक्टोबर रोजी अमृतमहोत्सवी वर्धापनदिन साजरा करीत आहे. ही घटना जशी मुंबईच्या बहुढंगी इतिहासाला साक्ष ठरते. तशीच ही वाटचाल म्हणजे एकूण कामगार चळवळीच्या प्रदीर्घ वाटचालीतील मैलाचा दगड ठरतो ! कामगार चळवळीच्या वाटचालीत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे मोलाचे योगदान आहे!
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या ७५ वर्षाच्या गौरवशाली वाटचालीचा मागोवा घेतला तर तिचा भक्कम पाया आद्य संस्थापक, कामगार महर्षी गं.द.आंबेकरजींनी घातला, तर सर्वाधिक काळ नेतृत्व करुन विद्यमान अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी विविधांगी कामातून तिच्यावर जणू कळसच चढविलाय, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरु नये! म्हणजे गं.द आंबेकर निवर्तल्यानंतर एकापाठोपाठ नेतृत्वपदी आलेल्या नामवंत नेतृत्वाने काहीच केले नाही, असा कृपया मूळीच अर्थ काढू नये!
आकाशातील चंद्रकोर जशी कलेकलेने प्रकाशत जाते आणि अंतिम काळे-नीळे आभाळ तेजोमय होते, तसे आजवरच्या मातबर नेतृत्वाच्या कामातून दिसून आले आहे! त्यात आंबेकरजीसह एस.के.पाटील, बाळासाहेब सावंत, अबिदाल्ली, बॅरिस्टर रजनी पटेल, वसंतराव होशिंग, भाई भोसले, हरिभाऊ नाईक, मनोहर फाळके, गोविंदराव आदिक, शंकरराव जाधव, रामचंद्र हुलावळे आदींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
ऋषितुल्य गं.द.आंबेकरजींचं नेतृत्व स्वातंत्र्यपूर्व काळातील! उच्च शिक्षण घेतल्यानंतर आंबेकर गोवर्धन मपारा, शं.गो.आठवले, कृष्णा खाडिलकर या तीन सहका-यांसह हिंदुस्थान मजदूर सेवक संघाने चालविलेल्या अहमदाबाद येथील कामगार कार्यकर्ते प्रशिक्षण वर्गात दाखल झाले. अर्थात या पाठीमागे त्या काळचे समाज सुधारक थोर गांधीवादी नेते शंकरराव देव आणि आचार्य भागवत यांची प्रेरणा महत्वाची ठरलीय.
हे कामगार प्रशिक्षण घेतल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी आंबेकरजींना त्यांच्या तीन मित्रांसह सेवाग्रामला जाऊन महात्मा गांधीजींचे मार्गदर्शन घेण्याची आज्ञा केली. आंबेकरजींनी गांधीजींचे आशीर्वाद घेऊन आपल्या सहकाऱ्यांसह गिरणी कामगार चळवळीत प्रवेश केला. ही घटना इथे नमूद करण्यामागे हेतू हाच की, आंबेकरजींच्या उत्तुंग नेतृत्वाला किती थोरा-मोठ्या राष्ट्रीय नेत्यांचे बळ लाभले होते, यांची प्रचिती येते. त्यांचे व्यक्तीमत्वही तसेच घडत गेले आहे.
“बोले तैसा चाले, त्यांची वंदावी पाऊले!” या तुकोबारायांच्या अभंग पंक्ती प्रमाणे त्यांचे जीवन घडत गेले आहे. ते वारकरी नव्हते. पण वास्तवात ते संतवृत्तीचे होते. विद्यार्थी दशेत त्यांनी क्रांतिकारकांची पत्रके पोहोचविण्याचे काम केले आहे. १९४२ च्या लढ्यात तर त्यांनी भाग घेतला आणि एक वर्ष कारावासाची शिक्षा भोगली. त्यापूर्वी १९३८ मध्ये गिरणी कामगार चळवळीत प्रवेश घेण्यापूर्वी त्यांनी होमिओपॅथी औषधोपचाराचे शिक्षण घेतले.
सायकलवरुन कामगारांच्या घरोघरी जाऊन आरोग्य उपचार सेवा केली. त्याकाळी पटकी, दमा, मलेरियासारख्या साथीने कामगार वर्ग ग्रासलेला असे. आंबेकर त्यांच्या उपचारासाठी धावून जात. कामगारांच्या वेदनांवर हळुवार फुंकर घालीत. कामगार संघटना उभी करणारे आंबेकरजींसारखे नेतृत्व जगाच्या पाठीवर पहायला मिळणे अशक्य आहे. त्यांनी स्वच्छता मोहीम, साक्षरता मोहिम यशस्वी केल्या. आंबेकरजींची कामगार चळवळ अधिकतर विधायक कामावर आधारीत होती. ते मुंबईत जेथे रहात, तेथे एका महारोग्याची सेवा त्यांनी केली आहे.
त्यांनी शास्त्रशुध्द पायावर आधारित पगारवाढ, बोनस, भरपगारी रजा इत्यादीचे फायदे मिळवून देऊन गिरणी कामगारांचा आर्थिकस्तर उंचाविला. प्रा.फंड, विमा संरक्षण, ग्रॅच्युइटी आशा अनेक मागण्यांचे पुढे कायद्यात रुपांतर झाले. पण त्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावून लढणारे, कामगारांचे हित जोपासणारे आंबेकर यांच्यासारखे नेतृत्व दुर्मिळच म्हणावे! त्या काळी कम्युनिस्ट चळवळीचे प्रस्थ होते.
संपाशिवाय काहीच मिळत नाही, ही खरी वस्तुस्थितीही होती. पण आंबेकरजींनी शांतता आणि संयमी गांधी विचारातू संघटना चालवली. त्याकाळी मुंबईत जवळपास ५५ ते ६० गिरण्या होत्या. त्यातील अडीच-तीन लाख गिरणी कामगारांचे यशस्वी नेतृत्व त्यांनी केले, यावरून त्यांचे नेतृत्व सर्वमान्य यशस्वी ठरले, हे सिद्ध होते. राष्ट्रीय स्तरावर इंटक स्थापनेत पुढाकार घेतला. इंटकचे अध्यक्षस्थान भूषविले. कामगारांना संघटीत करण्याचे त्यांचे काम महाराष्ट्रासह, मद्रास, आंध्र, गोवापर्यंत पोहोचलेले दिसते. त्यांनी “आय.एल.ओ”त देशातील कामगारांचे प्रतिनिधीत्व केलं. राज्य, राष्ट्रीय स्तरावरुन जागतिक स्तरावर संघटनेचे नाव लौकीक केले.
आज गोरेगाव येथे ‘गोकुळधाम’ आणि दहिसर येथे ‘आनंदनगर’ या मोठ्या कामगार वसाहती दिमाखात उभ्या आहेत, हे आंबेकरजींनंतर आलेल्या नेतृत्वाने त्यांचा वारसा पुढे नेल्याचे जीवंत उदाहरण आहे. खंडाळा येथे आंबेकर यांनी लावलेल्या कामगार शिक्षणरुपी वृक्षांचे रुपांतर आज अद्यावत महावृक्षात झालेले दिसत आहे.
पुढे “बीआरआय अक्ट” रद्द कराण्याची मागणी झाली, १९८२ च्या संपात उद्योगाची घडी विस्कटली. एक लाख कामगार बेकार झाले. या विरूद्ध मुंबई ते दिल्लीपर्यंत संघटनेनं कामगारांचा लढा उभा केला. युनियनच्या मान्यतेला आव्हान देण्यात आले, जागतिकीकरणाच्या लाटेत अनेक गिरण्यावर बंदचे सावट आले, या सर्वांविरूद्ध संघटना कधी मैदानावर, तर कधी न्यायालयात खंबीरपणे लढली आणि घवघवीत यश संपादन केले आहे! लाखभर कामगारांना कोट्यवधी रुपयांची देणी मिळवून दिली आहेत, हे विशेष काम म्हणावे!
बदलत्या काळाची पावले ओळखून संघटना पुढे जात राहिली आहे, यात सर्वाधिक काळ नेतृत्वाची संधी लाभलेल्या विद्यमान अध्यक्षांचा सिंहांचा वाटा आहे. आज गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावरीत लढ्यात असो, नाही तर देशातील कामगारांच्या ज्वलंत प्रश्नां वरील आंदोलनात असो, ती फ्रंट फुटवर काम करीत आहे. देशातील बंद एनटीसी गिरण्यांच्या लढ्याचे तर सचिनभाऊ अहिर राष्ट्रीय स्तरावर अध्यक्ष म्हणून नेतृत्व करीत आहेत, ही बहुमान संपादन करणारी गोष्ट आहे.
राज्यातील असंख्य असंघटित कामगारांना संघटित करण्याचे शिवधनुष्य तर तिने केव्हाच उचलले आहे. त्यात टॅक्सी, रिक्षा, ओला, नाका कामगार, घरेलु महिला आदी असंघटित कामगारांचा समावेश होतो. त्याशिवाय संघटना संगणक, टंकलेखन- लघुलेखन, महिला प्रशिक्षण केंद्र, अद्यावत वाचनालय आदी उपक्रम राबवून, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या वाटा सुलभ करीत आहे. आंबेकर प्रतिष्ठान कॅटरिंग कॉलेजची स्थापना करण्यात येऊन तर कामगारांच्या मुलांसाठी जागतिक स्तरावर रोजगार निर्माण केला गेला आहे. सहकारी क्षेत्रात राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघ तर नवनवीन उपक्रम प्रस्थापित करीत आहे.
आंबेकर श्रम संशोधन संस्थेने तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन-कामगार प्रशिक्षणात नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. कामगारांच्या कला, क्रीडा गुणांना स्पर्धेच्या माध्यमातून वाव देत आहे. तेव्हा आजतरी काळाच्या कसोटीवर उतरलेली कामगार संघटना म्हणून तिने आपले नाव समाज मनावर कोरले आहे, हे स्पष्ट आहे. परेल येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाची वास्तू गेली ७५ वर्षे आज दिमाखात उभी आहे, हीच या गौरवशाली वाटचालीची साक्ष आहे! १९४७ साली स्थापन झालेली ही संघटना युगेनयुगे इतिहास घडवेल असा केवळ विश्वास नव्हे तर खात्री वाटते!
-गोविंदराव मोहिते
(अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाच्या औचित्याने)






