पांढरा शुभ्र शर्ट आणि पॅण्ट, काळीभोर दाढी-मिशा, कपाळावर ठसठशीत लाल गंध आणि ओठांवर हासू, असं प्रसन्न व्यक्तिमत्व लाभलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस. ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. सात महिन्यातल्या मुख्यमंत्री शिंदे यांचा हा प्रवास बघितला तर महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर सुसाट निघाल्याचे दिसून येते.
मी सामान्यांचा मुख्यमंत्री आहे, असे मुख्यमंत्री शिंदे कायम सांगत असतात. त्याची प्रचिती त्यांच्या कार्यशैलीतून दिसून येते. सामान्यांमध्ये त्यांच्याविषयी असलेले कुतूहल, आपुलकी आणि आपल्यातलेच एक मुख्यमंत्री यामुळे त्यांना भेटायला आलेल्यांमध्ये शहरी, ग्रामीण भागातील महिला, पुरुष, युवावर्गाची संख्या मोठी आहे.
शासकीय बैठक असो, जाहीर सभा असो मुख्यमंत्र्यांच्याभोवती गर्दी ही ओसरत नाही. शहरी असो वा ग्रामीण भागातील सामान्यातल्या सामान्य माणसाला त्यांना थेट भेटता येते यामुळे आपले म्हणणे एकून घेणारे आणि प्रसंगी त्यावर तात्काळ उपाययोजना करणारे मुख्यमंत्री लाभल्याचे सामान्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येते. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून मंत्रालयात आलेल्या सामान्य नागरिकाला आस असते ती मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीची. मुख्यमंत्री या जनतेची भेट घेतल्याशिवाय मंत्रालय सोडत नाहीत. बऱ्याचदा दिवसभरातल्या बैठका संपवून रात्री आठ, साडेआठपर्यंत ते भेटीसाठी आलेल्या प्रत्येकाला भेटतात. त्यांची निवेदने स्वीकारतात.
शासकीय बैठक कोणत्याही विभागाची असेना मुख्यमंत्र्यांचे विभागाच्या सचिवांना नेहमी एकच सांगणे असते ते म्हणजे सामान्य माणूस केंद्रित ठेऊन निर्णय घ्यायचे. सामान्यांना दिलासा देण्याचं काम आपल्या विभागातून झाले पाहिजे, या तळमळीतून ते सचिवांना आणि अधिकाऱ्यांना सांगत असतात.
वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवासाचा निर्णय हा समाजातील ज्येष्ठांचा सन्मान करणारा ठरला आहे. अल्पावधीतच या योजनेचा कोट्यवधी ज्येष्ठांनी लाभ घेतला आणि घेत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमुळे तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी आरोग्य उपचार, तीर्थयात्रा यासाठी प्रवास करणे सुलभ झाले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त घेतलेल्या या निर्णयाचा लाभ ज्येष्ठांना होत आहे.
शेती आणि शेतकऱ्यांबद्दल मुख्यमंत्री नेहमीच संवेदनशील दिसून येतात. मुख्यमंत्रिपदी आल्यानंतर पहिल्याच विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी विधानसभेत बळीराजाला केलेले भावनिक आवाहन सर्वांची मने जिंकून गेली. आत्महत्येचा मार्ग पत्करू नका असे आवाहन करणारे पत्रदेखील त्यांनी शेतकऱ्यांना लिहिले. या सर्व कृतीतून त्यांचे संवेदनशील मन दिसून येते.
त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी एनडीआरएफच्या दुप्पट मदत देखील केली. निकषांमध्ये बसत नसतानाही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.
सामान्य माणूस, कष्टकरी, कामगार, शेतकरी, महिला, बालक, युवावर्ग यांना प्राधान्य देतानाच राज्यात निर्माणाधीन असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देतानाच राज्यात औद्योगिक उभारणीसाठी देश-विदेशात त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. नुकताच दावोस येथे झालेला जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने झालेल्या दौऱ्यातून महाराष्ट्राला सुमारे १ लाख ५५ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले.
आरोग्याला प्राधान्य देतानाच सामान्य जनतेला मोफत आणि दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरणाचे प्रयत्न सुरू केले आहेत. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून १४० प्रकारच्या चाचण्या मोफत आणि उपचारही मोफत केले जात आहेत. मुंबईमध्ये सुमारे दीडशे दवाखाने सुरू झाले असून महाराष्ट्रात ७०० दवाखाने सुरू करण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग करण्याचा निर्णय घेणारे कदाचित महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असणार आहे. याचे श्रेयदेखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या संवेदनशील मनाला जाते. युवांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योगांच्या विस्तारासोबतच शासकीय विभागातील रिक्त पदांच्या भरतीला मुख्यमंत्र्यांनी चालना दिली आहे.
गरजू, रुग्ण, अपघातग्रस्त यांच्या मदतीसाठी धावून जाणारे मुख्यमंत्री सर्वांनी पाहिले आहेत. आपल्या राज्यातील नागरिकांच्या वाहनाला परराज्यात अपघात झाला तरी मुख्यमंत्री सवता फोन करून त्या राज्यातल्या प्रशासनाशी संपर्क साधतात आणि जखमींच्या उपचाराबाबत विनंती करतात. वैद्यकीय मदतीच्या बाबतीत त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही.
गेल्या सहा महिन्यात राज्यातील विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना ज्याप्रकारे गती दिली जात आहे. मुख्यमंत्री स्वत: अशा महत्वाच्या प्रकल्पांच्या कामांना प्रत्यक्ष भेटी देत आहेत त्यामुळे विकासपुरूष अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा पाहिलेलं स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात आणले आहे. त्याचबरोबर मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, एमटीएचएल यासारखे प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री वॉर रुममध्ये त्याचा आढावा घेतात.
जनसेवेसाठी दिवसाचे २४ तासही कमी पडतात अशी धारणा असणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांना लोकनाथाची उपमा समर्पक ठरते….
– अजय जाधव, मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी